PM मोदी मुंबईत येण्याआधीच राजकीय वादंग; अटल सेतूच्या उद्घाटनावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 11:54 AM2024-01-12T11:54:50+5:302024-01-12T13:16:52+5:30

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील स्थानिक आमदार-खासदारांची नावे नव्हती.

Political Controversy Before PM Modi Arrives in Mumbai uddhav Thackerays Shiv Sena Boycotts Inauguration of Atal Setu | PM मोदी मुंबईत येण्याआधीच राजकीय वादंग; अटल सेतूच्या उद्घाटनावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बहिष्कार

PM मोदी मुंबईत येण्याआधीच राजकीय वादंग; अटल सेतूच्या उद्घाटनावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बहिष्कार

PM Narendra Modi Mumbai Visit ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन होणार आहे. मात्र या उद्घाटन कार्यक्रमाआधी राजकीय वादंग निर्माण झाले असून या कार्यक्रमाला ऐनवेळी निमंत्रण देण्यात आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे. स्थानिक आमदार, खासदारांनाही रात्री उशिरा आणि आज सकाळी निमंत्रण पाठवण्यात आलं, असं सांगत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे असतात. मात्र पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील स्थानिक आमदार-खासदारांची नावे या निमंत्रण पत्रिकेवर नव्हती. तसंच या कार्यक्रमासाठीचे निमंत्रणही ऐनवेळी पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला असून आम्ही उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

आज उद्घाटन होत असलेल्या अटल सेतूची काय आहेत वैशिष्ट्ये?

अटल सेतूसाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याची एकूण लांबी 22 किलोमीटर असून यापैकी 16.5 किलोमीटरचा भाग समुद्रात आणि सुमारे 5.5 किलामीटरचा भाग जमिनीवर उन्नत स्वरूपात आहे. यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत. पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग हा जोडला गेला आहे आणि पूर्व-पश्चिम असणारा वरळी-शिवडी उन्नतमार्ग हा भविष्यात अटल सेतू प्रकल्पास जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई सागरी किनारा रस्त्याद्वारे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना अटल सेतूद्वारे विनाथांबा मुख्य भूमीकडे जाणे शक्य होणार आहे. साहजिकच प्रवासाचे अंतर कमी झाल्याने आणि एक तासाहून अधिक प्रवास वेळेची बचत होणार असल्याने हरितगृह वायू उत्सर्जन सुद्धा कमी होणार आहे.

पुलाच्या दुसऱ्या बाजूला, नवी मुंबईतील उलवे येथील शिवाजीनगर, उरण-पनवेल राज्य महामार्ग आणि मल्टीमॉडेल कॉरिडॉरवर चिर्ले येथे आंतरबदल (इंटरचेंज) करण्यात आले आहेत. याद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, पुणे किंवा गोवा येथून प्रवासी जड वाहने सहजतेने मुंबईत प्रवेश करू शकतील. हा सेतू मार्ग विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जाणार असल्याने यामधील अंतर कमी होणार आहे. या प्रकल्पामध्ये भारतातील पहिल्या ओपन रोड टोलिंग प्रणालीचा देखील वापर करण्यात आला आहे.

अटल सेतू उभारताना पर्यावरणाचा समतोल विचार करण्यात आला आहे. या क्षेत्रात स्थलांतरीत पक्ष्यांचा विशेषत: फ्लेमिंगोंचा नैसर्गिक अधिवास असल्याने प्रकल्पाच्या समुद्रातील भागात खारफुटी व दलदल इत्यादी पर्यावरणीय वैशिष्ट्यांना कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता एमएमआरडीएने घेतली आहे. सुरक्षेची बाब लक्षात घेऊन बंद पडलेली वाहने नेण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्गिका, ॲण्टी-क्रॅश बॅरियर्स असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम, तसेच पक्ष्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये ध्वनी अडथळे (साऊंड बॅरिअर्स) लावण्यात आली आहेत. भूकंप, चक्रीवादळ, वाऱ्याचा दाब आणि भरती-ओहोटीच्या प्रभावामध्ये टिकून राहण्यासाठी या प्रकल्पास सक्षम बनविण्यात आले असून सागरी सेतूचे घटक पुढील 100 वर्षांपर्यंत टिकून राहण्यासाठी गंजरोधक सामग्रीपासून बनवलेले आहेत.

सागर, जमीन आणि दलदल अशा तीनही भागांमध्ये उभारलेला सुमारे 21 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी तीन स्थापत्य कंत्राटदार, एक इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिम कंत्राटदार, विविध 10 देशांतील विषयतज्ज्ञांनी आपले योगदान दिले असून 1500 हून अधिक अभियंते, तर सुमारे 16500 कुशल मजुरांनी तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र काम केले आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे 1.2 लाख टन स्टील वापरण्यात आले आहे. इतक्याच स्टीलमध्ये चार हावडा ब्रिज उभारले जाऊ शकतात. प्रकल्पासाठी आठ लाख 30 हजार क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर झाला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी लागलेल्या काँक्रीट पेक्षा हे सहापट अधिक आहे. तर, या प्रकल्पात वापरण्यात आलेले स्टील आयफेल टॉवरमध्ये वापरले गेलेल्या स्टीलच्या 17 पट अधिक आहे. सुमारे एक हजार खांबांवर उभारल्या गेलेल्या या मार्गावर 100 किमी प्रती तास वेगाने प्रवास करता येणार असून दररोज सुमारे 70 हजार वाहने वाहून नेण्याची याची क्षमता आहे.
 

Web Title: Political Controversy Before PM Modi Arrives in Mumbai uddhav Thackerays Shiv Sena Boycotts Inauguration of Atal Setu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.