"बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून"; त्या विधानावरुन रोहित पवारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 03:03 PM2024-03-19T15:03:26+5:302024-03-19T15:05:40+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असले तरी शरद पवार हेच आमचं श्रद्धास्थान असल्याचं स्वत: अजित पवार हेही सांगतात.

"But the gun is off Ajitdada pawar's shoulder"; Rohit Pawar's anger from that statement of bjp chandrakant patil | "बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून"; त्या विधानावरुन रोहित पवारांचा संताप

"बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून"; त्या विधानावरुन रोहित पवारांचा संताप

मुंबई - भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट शरद पवारांचे नाव घेऊन त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. आगामी निवडणुकीत शरद पवारांचा पराभव हेच लक्ष्य असून त्यांचा पराभव हाच आमच्यासाठी जास्त वजनदार असल्याचं म्हटलं. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पलटवार करण्यात आला आहे. शरद पवारांचा पराभव करणं हे कपटी भाजपचं लक्ष्य असल्याचं चंद्रकांत दादांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं, मात्र बंदुक अजित पवारांच्या खांद्यावरुन चालवली जात असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असले तरी शरद पवार हेच आमचं श्रद्धास्थान असल्याचं स्वत: अजित पवार हेही सांगतात. त्यामुळे, शरद पवार यांच्यावर थेट टीका अजित पवार गटाकडून टाळली जात आहे. मात्र, महायुतीत सोबत असलेल्या भाजपा नेत्यांकडून राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोबत असतानाही थेट शरद पवारांना लक्ष्य केलं जात आहे. राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या शेजारीच बसल्या असता चंद्रकात पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता, चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेचा व्हिडिओ शेअर करत, आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  

सहा दशकं महाराष्ट्राची व देशाची सेवा करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांचा पराभव करणं हे कपटी भाजपचं लक्ष्य असल्याचं चंद्रकांत दादांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं, पण त्यासाठी बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून चालवायचीय, असे म्हणत रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही भाजपची निती जगजाहीर आहे. त्यामुळं ज्यांनी आपल्याला या स्थानापर्यंत पोचवलं त्या आदरणीय पवार साहेबांच्या पराभवासाठी आपला वापर करुन द्यायचा की नाही, हे आता अजितदादांनीच ठरवायचंय आणि त्यांना ठरवता येत नसेल तर त्यांच्यासोबत असलेल्या पण आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ते ठरवावं. शिवाय पवार साहेब ही व्यक्ती नाही तर विचार आहे, तो संपवणं भाजपला कदापि शक्य नाही, हेही भाजपाने लक्षात ठेवावं, असेही रोहित पवार यांनी म्हटलं. 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील

''तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष केला आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर, राजकारणात तराजू लावायचा असतो, काय वजनदार आहे, काय हलकं आहे, असं म्हणत, आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त वजनदार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. यावेळी, त्यांनी चुटकी वाजवून हातवारेही केले. २०१९ चं सरकार कुणामुळे गेलं?, आज तुम्ही घरात फूट वगैरे म्हणता, पण २०१९ मध्ये लोकांनी मतदान करुन १६१ जागा दिल्या होत्या. तरीही तेव्हा शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. मग, ती फूट नव्हती का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, पवारांचा हिशेब चुकता करण्याची संधी मला आणि माझ्या कार्यकर्त्यांनी मिळाली, असेही पाटील यांनी म्हटले. यावेळी, रुपाली चाकणकर त्यांच्या शेजारीच बसलेल्या होत्या. 

Web Title: "But the gun is off Ajitdada pawar's shoulder"; Rohit Pawar's anger from that statement of bjp chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.