मेट्रोच्या पाच कंत्राटदारांना महापालिकेची जप्तीची नोटीस; ३२६ कोटींचा मालमत्ता कर थकविला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 09:29 AM2024-04-17T09:29:37+5:302024-04-17T09:32:33+5:30

मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी ३२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे.

about 326 crore property tax has not paid by five contractor working in connection with mumbai metro rail | मेट्रोच्या पाच कंत्राटदारांना महापालिकेची जप्तीची नोटीस; ३२६ कोटींचा मालमत्ता कर थकविला

मेट्रोच्या पाच कंत्राटदारांना महापालिकेची जप्तीची नोटीस; ३२६ कोटींचा मालमत्ता कर थकविला

मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी ३२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. येत्या सात दिवसांत कर भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी अंतिम नोटीस महापालिका प्रशासनाने जारी केली आहे. तत्पूर्वी या कंत्राटदारांना मार्च महिन्यात नोटीस जारी करून २१ दिवसांच्या आत करभरणा करण्यास सांगितले होते. तरीही कंत्राटदारांनी अद्यापही कर भरलेला नाही.

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमआरसीएल) वतीने मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे सुरू आहेत. यासाठी एमएमआरसीएलकडून मेसर्स सीईसी-आयटीडी, मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही, मेसर्स डोगस सोमा, मेसर्स एचसीसी-एमएमएस-१, मेसर्स एचसीसी-एमएमएस-२ या कंत्राटदार कंपन्यांना मेट्रोचे काम करण्यासाठी वडाळा ट्रक तळ, भूखंड क्रमांक ८ टप्पा २ आणि ३ या ठिकाणी कास्टिंग यार्डसाठी भूखंड उपलब्ध करून दिले आहेत.

१)  पाचही कंत्राटदारांकडे मिळून ३२६ कोटी २२ लाख ६९ हजार ८४६ रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. पालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडून वारंवार सूचना देऊनही यापैकी चार कंत्राटदारांनी आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून अद्यापर्यंत करभरणा केलेला नाही.

२)  एचसीसी-एमएमसी या कंत्राटदाराकडे आर्थिक वर्ष २०१०-११ पासून मालमत्ता कर थकीत आहे. एमएमआरसीएल आणि संबंधित कंत्राटदारांमधील करारानुसार, या भूखंडाच्या वापरासंबंधीचे कर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. 

सात दिवसांत कर न भरल्यास...

पालिका प्रशासनाच्या वतीने मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम २०३ नुसार, १६ मार्च रोजी संबंधित कंत्राटदारांना २१ दिवसांच्या आत करभरणा करण्याची नोटीस जारी केली. ही २१ दिवसांची देय मुदत १५ एप्रिल रोजी संपली तरी करभरणा न केल्याने पालिकेने सात दिवसांची अंतिम नोटीस जारी केली आहे. या सात दिवसांच्या कालावधीत करभरणा न केल्यास त्यांच्यावर मालमत्तेची अटकावणी आणि जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: about 326 crore property tax has not paid by five contractor working in connection with mumbai metro rail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.