Zoya And Bindiya those two extremes characters in the film Ranjhana | रांझना चित्रपटातील दोन टोकाच्या त्या दोघी

रांझना चित्रपटातील दोन टोकाच्या त्या दोघी

- माधवी वागेश्वरी 

रांझना ही वर्ष 2013 मधील फिल्म आनंद एल. राय यांनी दिग्दर्शित केली  होती. दक्षिणोतील, तमिळ फिल्म्समधील गुणी अभिनेता धनुषची ही पहिली फिल्म होती. हिंदी चित्रपटात धनुषनं काम करणं आणि ए. आर. रेहमानचं कमालीचं सुंदर संगीत यामुळे ही फिल्म विशेष गाजली. तसे पाहता या सिनेमामध्येही अनेकवेळा हिंदी सिनेमांमध्ये पाहिलेली एक लव्हस्टोरीच आहे; परंतु याची लेखक, दिग्दर्शकानं जी हाताळणी केली आहे त्यातून त्याचे वेगळेपण दिसून येते. खरे पाहता ‘रांझना’ या नावाप्रमाणो झोया (सोनम कपूर)च्या प्रेमात अगदी लहानपणापासून पागल  झालेल्या कुंदन (धनुष)ची ही गोष्ट आहे. एकूणच प्रेमात वेडय़ा झालेल्या मुलांची मुली कशा वाट लावतात याचं यथार्थ चित्रण या सिनेमात केलेलं  आहे. यातील मुख्य स्री व्यक्तिरेखा आहे झोया, तर दुसरी सहायक स्त्री व्यक्तिरेखा आहे बिंदिया (स्वरा भास्कर). 
 

झोया 

 

बनारससारख्या हिंदूबहुल धार्मिकस्थळ असणा-या शहरात राहणारी झोया. तिच्या अब्ब्बू आणि अम्मीची ती एकुलती एक लेक असल्यानं लाडाची आहे. वडिलांसोबत गच्चीवर पतंग उडवणं, शाळेत जाणं, मैत्रिणींसोबत पाणीपुरी खाणं, असं तिचं छान हसरं आयुष्य सुरू असताना तिच्या प्रेमात पागल     झालेला कुंदन पंडित. ती नववीत आणि तो दहावीत असताना तिनं त्याला हो म्हणावं म्हणून सरळ तिच्या समोर हाताची नस कापून घेतो. तेव्हा मात्र झोया विरघळते. घरी मात्र हे प्रकरण समजल्यावर वडील तिला बनारस सोडून अलिगडला शिकायला पाठवतात आणि तिथून नंतर ती दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जाते. ती कुंदनचं प्रेम (?) कधीच विसरून नवीन मुलाच्या (अभय देओल)  प्रेमातही पडलेली असते. ‘समानता’,  ‘गरिबी’ यांच्या मोठय़ा सामाजिक अंगानं बाता मारणारी झोया प्रत्यक्षात मात्र हिंदू बॉयफ्रेण्डला मुस्लीम नाव सांगायला लावते आणि त्याचं तिला काहीही वाटत नाही. कुंदनचं प्रेम मात्र तिला ‘गवार’  आणि ‘जाहील’ वाटतं. त्याचं दरवेळी नस कापून घेणं तिला मूर्खपणाचं वाटतं; पंरतु जेव्हा तिचं लग्न मोडतं तेव्हा तीदेखील नसच कापून घेते. तिला पहायला आलेल्या डॉक्टर मुलाशी लग्न होऊ नये म्हणून पुन्हा ती कुंदनचाच वापर करते. पुढे तिनं कॉलेजच्या एका ग्रुप सोबत काम करून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय आणि तिचं  वागणं विसंगत होत राहातं. 
झोयासारख्या ब-याच मुली असतात ज्या स्वत:चा मतलब साध्य करण्यासाठी त्यांच्या मागे पागल झालेल्या मुलांचा वापर करून घेतात. खरं तर त्या मुलांनादेखील हे माहिती असतं, की ही परी काही आपल्याला मिळणार नाही; परंतु प्रॉब्लेम हा असतो की त्यांना ‘तू गर्लफ्रेण्ड बनली नाही तरी चालेल; पण निदान फिलिंग तरी  दे’ हे हवं असतं. ज्यानं सगळ्याची माती होते. झोयाला स्वत:ची मतं नाहीत. ती  सुंदर आहे. तिला परीक्षेत मार्कसुद्धा पडतात किंवा ती  जेएनयूमध्ये शिकणा-या मुलासोबत वाददेखील घालू शकते; पण त्या वादाला चिंतनाची कुठलीही बैठक नाही. विचार करायला किंवा भविष्यात काय करायचं यासाठी तिला तिच्या मेलेल्या बॉयफ्रेण्डची गरज लागते आणि कुंदनकडून तर तिची सगळी कामं होतच राहातात.  
बिंदिया


या चित्रपटातील बिंदिया ही जी व्यक्तिरेखा आहे तिला पूर्ण सिनेमाभर तिच्या प्रिय (?) मित्रंद्वारे (म्हणजेच कुंदन आणि मुरारी)  केवळ वाईट वागवलं   गेलेलं आहे. त्यात कुंदननं तिचा कितीही अपमान केला तरी  शेवटी तिला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. का तर ती त्याच्यावर प्रेम करते. संपूर्ण सिनेमाभर तिचा एकदाही आत्मसन्मान जागा होत नाही. ती फक्त त्याला शिव्या देते बास! झोयाला पहायला आलेल्या मुलाशी  तिचं  लग्न होऊ नये यासाठी बिंदियाचा वापर कुंदन, मुरारी आणि झोयादेखील कसा करून घेतात हे तर फारच वाईट आहे. या विशिष्ट प्रसंगाची हाताळणी  विनोदी पद्धतीनं केलेली असली तरी  शेवटी  त्यातून लेखक, दिग्दर्शक काय सुचवत आहेत हे महत्त्वाचं होतच. एका मुलीच्या प्रेमासाठी दुस:या मुलीचा वाट्टेल तसा उपयोग करायचा. सूड उगवायला तुझ्याशी लग्न करतो असं सांगून लग्नाला यायचं नाही असे सगळे प्रकार करायचे. 
कितीही वेळा नस कापली तरी, कितीही मूर्खपणा केला तरी मुरारी आणि कुंदनची मैत्री तुटत नाही; पण झोया आणि बिंदियाची मात्र मैत्री होत नाही. कुंदनला झोया आवडते आणि बिंदियाला कुंदन आवडतो, म्हणून बिंदिया आणि झोयाची मैत्री कशी काय होऊ शकते? या आपल्याकडील सर्व हिंदी सिनेमातील स्त्री व्यक्तिरेखा समजण्यातला अपरिपक्वपणा आहे. मुद्दा हा नाही की सगळ्याच बायका काय गळ्यात गळे घालून एकमेकींच्या मैत्रिणी होतात का? बायकादेखील मतलबी असतात, स्वार्थी असतात, षडरिपू यांनासुद्धा  आहेत. मुद्दा हा आहे की शेवटी 
पुरु ष कसा चांगला होता, किती प्रेमात निष्ठावान होता हे सिद्ध करायला स्त्री व्यक्तिरेखा चुकीच्या,  गरजू आणि वाईट दाखवाव्या लागतात. अजूनही ही विविध अंगानं स्त्री कळण्याची ‘तयारी बस ‘तुम’तक  नव्हे तर ‘मुझ’तकच आहे.

(लेखिका चित्रपट आणि दृश्य माध्यमाच्या अभ्यासक आहेत.)

madhavi.wageshwari@gmail.com

 


 

Web Title: Zoya And Bindiya those two extremes characters in the film Ranjhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.