-नीरजा पटवर्धन


कपड्यांची कथा! पण या सगळ्या कथेचा आपल्या आयुष्याशी कुठे संबंध येतो?’ - हुशार मकूनं हुशार प्रश्न विचारला. ठकू समजावून सांगू लागली. 

अंगावर ल्यायलेली प्रत्येक गोष्ट, कपाटातली प्रत्येक वस्तू या सगळ्या कथेचा एक भाग आहे.  आपलं कपाट उघडून पाहा. सत्नाशेसाठ प्रकारचे कपडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कापडं, वेगवेगळ्या प्रकारची पद्धत आहे. ठरावीक ठिकाणी घालायचे ठरावीक कपडे आहेत. ‘मेरावाला क्रीम’पासून म्हणाल तितके रंग आणि छटा आहेत. आपण मध्यमवर्गीयच आहोत, काटकसरीही आहोत; पण कपड्यांचं कपाट भरून वाहतंय. 
काही पिढय़ांच्या मागे अगदी जुजबी कपडे असायचे. रोजचे दोन-तीन, एखाददोन ठेवणीतले आणि ऐपतीप्रमाणे अजून एखादा दुसरा कपड्याचा जोड ही परिस्थिती बहुतेक सर्वच मध्यमवर्गीय माणसांची. गरिबाच्या घरात गाठी आणि ठिगळं मारलेल्या किंवा जोड लावलेल्या साड्या. बारकी पोरं अर्धी उघडीच.  एकूणात माणशी एका बोचक्याचा ऐवज. 

 

जुनी माणसं कशी थोडक्यात समाधानी होती हे सांगायला ही प्रस्तावना नाही. तेव्हाची माणसं समाधानी नक्कीच नव्हती नाहीतर आज आपली कपाटं भरून वाहिली नसती. 
आहे त्या स्थितीत समाधानी न राहण्यातूनच मानवानं वेगवेगळे शोध लावले. शिवणाचं मशीन, विजेवर चालणारं माग, बटणं किंवा नाड्यांऐवजी झिप या गोष्टींचे शोध लागले आणि एक कपडा बनायचा वेग कैकपटीनं वाढला. कपड्यांची उपलब्धता वाढली आणि किमती कमी झाल्या. सामान्यांच्या घरात कपड्यांची संख्या वाढली.  

माहितीच्या देवाणघेवाणीची साधनं विकसित होत गेली. हातानं प्रती काढून माहिती प्रसारित करण्यापासून सुरुवात होऊन तार, फोन, फॅक्स असे करत करत आता गाडी आंतरजालापर्यंत आली. दळणवळण घोडागाडी, सांडणीस्वार, मोठे जहाज, रेल्वे, बसेस, विमानं अशा साधनांनी वेगवान होत गेलं. इतर सर्व माहितीबरोबर कपड्यांच्या पद्धती आणि प्रत्यक्ष कपडे, दागिने वगैरेही जगभर पोहोचू लागले. वाढत्या वेगाबरोबर किमती परवडतील अशा मापात यायला लागल्या. माणसाला शरीर सजवायच्या वैविध्याची हौस होतीच. कपाटात दोन खण वाढवायची गरज पडलीच. 

आणि मग आले कृत्रिम धागे. अमाप प्रमाणात कपड्यांचं उत्पादन यातून शक्य झालं. हे घडायच्या थोडंच आधी जगानं दोन महायुद्ध आणि त्यातून निर्माण झालेला अभाव सोसला होता. त्यामुळे या अमाप उत्पादनाचं प्रचंड जोरात स्वागत झालं. किमती अशा आल्या की अगदी जेमतेम उत्पन्न असलेल्या गटालाही हौसेमौजेचे चार वेगवेगळे कपडे असणं शक्य झालं, तर तुमची-आमची कपाटं भरून वाहण्याकडे वेगानं वाटचाल सुरू झाली. 

आता आपल्या कपाटात हातमागाचे शुद्ध सुती कापड असलेले कुडते असतात, एखादी इरकल असते, एखादी पैठणी, एखादी बनारस, एखादी जोडाजोड साडी असते. ही कापडं आणि त्यांचे रंग भारतीय वस्त्नकलेच्या वारशाचा एक धागा असतो. धिबिडगा वापराच्या जीन्स असतात ज्याच्या रंगाचे नाते काही पिढय़ांपूर्वीच्या आपल्याच निळीशी असते. पूर्वी स्त्रियांसाठीही पुरुषांसाठीच्याच आकाराने बनणार्‍या जीन्स आणि इतर ट्राउझर्स आता स्त्रियांसाठी म्हणून वेगळ्या बनू लागलेल्या आहेत. जीवशास्त्नीय लिंग, लिंगभाव आणि त्याप्रमाणे ठरणारं समाजातलं स्थान यासंदर्भात घडत गेलेल्या बदलांचं प्रतिबिंब म्हणावं असा हा ट्राउझर्सच्या आकारातला बदल म्हणता येऊ शकतो. 

 

स्त्रिया घरगुती वा शेतीचे कष्ट किंवा शोभेची बाहुली एवढय़ाच भूमिकांमधून बाहेर आल्या आहेत/ येत आहेत, हे स्त्रियांच्या बाकी कपड्यांच्यातही दिसतंच.  वावरासाठी सुटसुटीत अशा कपड्यांना पसंती, पूर्ण जामानिमा करायला कमीत कमी वेळ लागेल असे कपडे, आभूषणं आणि केशरचना हे सर्व बदल स्त्रियांचं समाजातलं बदलत चाललेलं स्थान, भूमिका यांचंच प्रतिबिंब आहे. केवळ बाह्य कपडेच नाहीत तर अंतर्वस्त्राचा प्रवासही हेच दाखवतो. शरीराला विशिष्ट आकार यावा म्हणून ठरावीक मापाच्या पिंज-यात म्हणजे कॉर्सेटमध्ये शरीर बांधून ठेवण्यापासून ते जास्तीत शरीराच्या नैसर्गिक आकाराप्रमाणे, हालचालींना सुटसुटीत अशी अंतर्वस्त्नं हा खूप मोठा प्रवास आतल्या कपड्यांनी केला आहे. प्रत्येक बदलाच्या मागे सामाजिक आणि राजकीय कारणं आहेत. 

जगभरात राजकीय आणि सामाजिक उलथापालथ कपड्यांच्या कथेला नाट्यमय वळण द्यायला कारणीभूत झालेली आहे. उदाहरणादाखल बघायचं तर युरोपात सामान्यांचे समजले जाणारे रंग आणि इतर वैशिष्ट्य  फ्रेंच राज्यक्रातीनंतर (1790 चे दशक) अमीर उमरावांच्या कपड्यांमध्ये मानाचं स्थान मिळवून बसली.  

आपल्याकडचं उदाहरण बघायचं तर स्वदेशीच्या चळवळीतून प्रतिष्ठा पावलेलं जाडंभरडं खादीचं कापड तत्त्व म्हणून अनेक एतद्देशीय श्रीमंतांनीही आपलंसं केलं. स्वातंत्र्यानंतर आपली तत्त्वं सिद्ध करायला खादीच्या कपड्यांचा वापर सुरू झाला. या कपड्यांशिवाय राजकारणात प्रवेश मिळत नसावा अशी शंका यावी इतके सगळे राजकीय नेते खादीमय असत, अजूनही असतात. या सगळ्यामुळे खादीमध्येच भरपूर वैविध्य मिळायला लागलं. मग खादीचे रंगीत कुडते हा चित्नकार, पत्नकार वगैरेंचा गणवेश होऊन गेला,  तर स्व. पंतप्रधान इंदिरा गांधींमुळे हातमागाच्या साड्या हा भारतीय विदुषींचा गणवेश झाला. 

कृत्रिम धागे, ते रंगवायच्या पद्धती, कृत्रिम डाय यांच्यामुळे आधीपर्यंत न मिळालेल्या रंगांच्या छटा कपड्यांमध्ये मिळू लागल्या. महायुद्धांनी बदललेले जगाचे संदर्भ आणि आधुनिक चित्नकलेचा उदय यांनी पाश्चिमात्य जगाची सौंदर्यदृष्टी ब-याच प्रमाणात बदलली. आजवर कपड्यांमध्ये न बघितलेले आकार 1950-60 मध्ये कपड्यांमध्ये आले. 

1960-70 च्या दशकात उदयाला आलेली हिप्पी विचारसरणी, त्यांचं संगीत आणि त्यांचा कपड्यांवर पडलेला प्रभाव हे सामाजिक तत्त्वज्ञान आणि कपडे यांची सांगड घातले गेलेले आधुनिक काळातलं सगळ्यात मोठ्ठं उदाहरण  म्हणता येईल. अमेरिकेत उदय झालेल्या या विचारसरणीच्या मुळाशी आशियाई तत्त्वज्ञान, युरोपातली सामान्यांची वा भटक्यांची जीवनशैली असे धागे होते. पूर्व युरोपातले विशिष्ट भरतकाम केलेले पारंपरिक शर्ट्स, भारतातले बांधणी पद्धतीनं रंगवलेले कापड, सैलसर कुडते अशा सगळ्या गोष्टी हिप्पी लोकांच्या कपड्यांच्यातही दिसून येतात. 

 

गेल्या पंचवीस-तीस वर्षांत जगभरात वाढत चाललेल्या मूलतत्त्ववादी कट्टर विचारांमुळे अनेकांना आपापल्या कळपाच्या (धर्म, पंथ, जात इत्यादी) खुणा अंगावर बाळगणं अनिवार्य वाटू लागलं आहे. याची अनेक ढळढळीत उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघत असतोच. 

आपल्या अंगावरच्या प्रत्येक वस्तूच्या मागे अशी एकेक कथा आहे. आपण रोज आपल्या अंगावर उद्याच्या इतिहासाचं एकेक पान लेऊन वावरत आहोत. 
गेल्या वर्षभरात कपड्यांच्या इतिहासाची काही मोजकी पानं वाचकांसमोर मांडली. अजून गमतीजमतीची बरीच पानं आहेत; परंतु आता थांबायला हवं. माणसाच्या कातडीवरचं आवरण आणि त्याचा इतिहास हे मानवाच्या इतिहासातलं अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे ही जाणीव करून देत या लेखमालेचा समारोप करत आहे. सर्व वाचकांचे मनापासून आभार!

(समाप्त)

(लेखिका वेशभूषाकार असून, या विषयात ‘जॉजिर्या’ विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स केलेले आहे.)

sakhi@lokmat.com

Web Title: Yet another history page of Clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.