Work from home, housework, and work for home! Kovid has added a new Mantra for all | घरून काम, घरकाम आणि घरासाठी काम! कोविड काळातील 'कर्मयोग' 

घरून काम, घरकाम आणि घरासाठी काम! कोविड काळातील 'कर्मयोग' 

-डॉ.प्राची जावडेकर 

- डॉ.पल्लवी मोहाडीकर-कासंडे

या लेखात जे लिहिले आहे त्याचे साधर्म्य जर आपल्या सध्याच्या जगण्याशी आहे असे वाटले .. तर बरोबर आहे. तो निव्वळ योगायोग नाही. अनेकांशी बोलून हा लेख तयार झाला आहे. ज्यांनी ज्यांनी मनमोकळेपणाने आपली मते मांडली त्यांचे मन:पूर्वक आभार.
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात  ‘घरून काम, घरकाम आणि घरासाठी काम’ हे तीन शब्द वरचेवर आपण ऐकत आहोत. घरातून काम करत असल्याने पुरुषांवर अनेकविध जबाबदा?्या येत आहेत. त्या विषयीचे विनोद, अनुभव, कविता असे काही बरेच सोशल मीडियावर वाचायला मिळत आहे. यामुळे की काय घरकाम या संकल्पनेला अजून एक संकल्पना जोडीदार म्हणून मिळाली आहे, ती म्हणजे घरासाठी काम.  ‘घरकाम’ म्हणजेच   ‘घरासाठी काम’ असते, हे नवे समीकरण तयार झाले आहे. त्याआधी घरकाम ही घरातल्या गृहिणीची जबादारी, तिचे काम, तिचे आद्य कर्तव्य असे काहीसे अर्थ अलिखित स्वरूपात पण प्रत्येकाच्या  मनात होते. अगदी गृहिणींच्याही मनात असेच होते. पण या लॉक डाऊन च्या काळात एरवी या गृहिणीला थोडी फार जी मदत मिळत होती मदतनीस बायकांच्या रूपात, ती सुद्धा बंद झाल्याने घरातल्या प्रत्येकावर काही ना काही काम करण्याची वेळ आली.
विदिशा मिश्र यांनी त्यांच्या पुस्तकात दिल्याप्रमाणो आज विविध व्यावसायिक स्तरावर काम करणा-या महिलांचे प्रमाण 27टक्के आहे आणि पुरुषांचे 92टक्के आहे. पण तरी घराघरातील स्त्री आजही छोटी मोठी अर्धवेळ नोकरी, लघु, घरगुतीव्यवसाय अथवा आपले छंद, आवड यातून काही ना काही कमावणारी आहे. खूप पैसे कमावणो हे उद्दिष्ट दरवेळी नसले तरी आपल्या मानसिक, बौद्धिक विकासासाठी आपण काहीतरी करावे हे आज प्रत्येक गृहिणीचे मत आहे. तिला स्वत:साठी मोकळा वेळ हवा आहे. या लॉक डाऊन मुळे हा मोकळा वेळ तिच्या हातातून मात्र निसटला आहे. जरी मदत मिळते आहे घरी तरी ती मात्र या घरकामात जास्तच अडकली आहे.
याविषयी काही मैत्रिणींशी फोनवरून संवाद साधला तर अनेक नोकरी करणा-याआणि आता घरून काम करणा-या मैत्रिणीनी अनेक कहाण्या सांगीतल्या. एक म्हणाली,  ‘कधी नव्हे ते माझ्या नोकरीसाठी घरचे तयार झाले होते, रात्रीचा ताजा स्वैपाक करून देणारी बाई मिळाली होती, एक महिना झाला न झाला तो हा लॉक डाऊन. पुन्हा सगळे जैसे थे. सुरुवातीच्या काळात सर्वानी मान्य केले, मोजके करू, जे असेल ते खाऊ. पण आता या वाढलेल्या आणि अनिश्चित लॉक डाऊनच्या काळात पुन्हा थोड्या थोड्या मागण्या वाढल्या आहेत. मदत नक्कीच करत आहेत सगळे, पण मदत ही मदत राहाते, मूळ काम आणि पसारा मुख्यत: घरच्या बाईलाच आवरावा लागतो. घर कसं नीट नेटकं ठेवायचं, कामं कशी आवरायची ते समजणे किंवा समजावून सांगणे नेहमीच शक्य होत नाही. घरातील कामाच्या शिस्तीचे गांभीर्य शिकवता येत नाही. ते कुणालाही मनातून पटावे लागते!’
एकत्र कुटुंबात राहणा-या गृहिणी थोड्या वैतागलेल्या वाटल्या.  ‘संपतच नाही काम’ ही एक तक्रार आहे. थोडीफार मदत नक्कीच आहे पण संसाराचा पसाराच इतका आहे की काय काय कमी होणार? या कुटुंबात जर घरून काम करणारी - वर्क फ्रॉम होम- गृहिणी असेल तर  ‘एरवी ऑफिस मध्ये जाऊन काम करतेस त्यापेक्षा जास्ती काम करतेस’, असेही त्यांना ऐकायला लागते आहे. नातवंडांची जबाबदारी त्यामुळे आजी आजोबांवर येते आहे. 
एक दोन घरी, माहेरी आलेल्या मुली या लॉकडाऊन मध्ये तिथेच राहिल्या होत्या. सुरुवातीला माहेरपण उपभोगल्यानंतर आता वहिनीला मदत करत आहोत असे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. 
विभक्त कुटुंबातील गृहिणी-  म्हणजे तीन किंवा चार माणसे- त्यांचेही म्हणणे फारसे काही वेगळे नाही. त्यांनीही,  ‘आम्ही मात्र अगदी मिनिट मिनिट कोणत्या ना कोणत्या कामात गर्क’, असेच गा-हाणे  व्यक्त केले आहे. खूप मोकळा वेळ हा फक्त सोशल मीडिया च्या विनोदातला भाग आहे असे ही त्यांचे म्हणणे  आहे.

अनेक सुपरवूमन प्रकारातल्या गृहिणी तसेच नोकरदार स्त्रिया म्हणतात की आजही बहुतेक कामे त्या एकट्याच करतात. पण या गृहिणी अशा की ज्यांची बालपणं सामायिक नळ आणि सामायिक शौचालये असणा-या  चाळींमध्ये गेली. पिण्याच्या पाण्याचा एकच नळ, पाणी एकदाच येणार या परिस्थितीमध्येही सर्व कष्ट करून आज बंगला किंवा मोठ्या ब्लॉक मध्ये राहणा-या  या गृहिणी..  ‘आम्ही लहानपणी अशा वाढलो म्हणून आजच्या या लॉकडाऊन मधल्या सतत काम या परिस्थितीमध्ये मस्त तरलो’, असे सांगतात.. परंतु हे आदर्श प्रत्यक्षात आणणे आज सर्वांना शक्य नाही ,
काही आज्जी मंडळींशी बोलणे झाले. काही एकत्र कुटुंबातील आहेत तर काही पतिपत्नी  एकटे राहणारे आहेत. त्यांना अगदी समाधान वाटते आहे. मुले दूर, परदेशी किंवा एक किंवा दोन्ही मुलीच. त्यामुळे एकटे राहणारे. अशा महिलांना मात्र आपल्या पतीकडून आश्चर्यकारकरित्या खूप मदत मिळत आहे.   ‘आम्हाला आमचे हे बाहेर पडू देत नाहीत, खरेदीला स्वत: ते जातात’, असे काहींनी सांगीतले.काहींनी डबे लावले आहेत, त्यामुळे स्वयंपाकाची गडबड नाहीच, पण इतर आवराआवरी यातही पुरुष मंडळी मदत करत आहेत याचे या आज्जी मंडळींना पूर्ण समाधान आहे. आपल्या बायकोने इतकी वर्ष घरासाठी किती केले ते समजले हो ह्यांना यावेळी, असे काहीसे म्हणणे आहे. म्हणजेच घरकाम आणि घरासाठी काम यांच्या व्याख्या नकळत यांच्या बाबतीत एकरूप झाल्या आहेत. आणखी हे बंद बंद किती दिवस चालेल माहित नाही पण यापुढेही मदत मिळेल आम्हाला पुरुषांकडून, हा विश्वास  व्यक्त होत आहे.
वरील सर्व उदाहरणांवरून असे लक्षात येईल की घरकाम आणि घरासाठी काम या संकल्पना अजूनही वेगळ्या आहेत. पण आता त्या एकच व्हायला हव्या आहेत, तरंच गृहिणी आणि नोकरदार स्त्रिया यांना त्याचा खरा उपयोग होईल. 
खरे म्हणजे अनेक घरातील कामे जर पुरुषांनी करून पाहिली तर फार कौशल्याची आवश्यकता नसते,  फक्त डोळे उघडे ठेवून ते नीट करायची गरज असते हे त्यांना अगदी सहज पटेल. 
मग आता ज्या मित्रंनी भांडी घासून आणि घराची स्वच्छता करून पहिली असेल त्यांना हे जाणवायला काहीच हरकत नाही, की एरवी ताटाला साबण पावडर राहिली म्हणून निर्धास्तपणे  वैतागून कामवाल्या बाईला किंवा घरातल्या गृहिणीला आपण नावे ठेवतो पण त्याचे खरे कारण काय असते.?  तसेच भांडी शेवटी आपल्यालाच घासायला लागतात म्हणून मग कमीत कमी भांड्यांमध्ये कसे भागवायचे हे आज उमगते आहे पण इतके वर्ष हे सर्व लाड आणि नखरे आपली सौ / आई नोकरी करत असेल किंवा नसेल, पण आपल्यासाठी म्हणून आनंदाने करते आहे.
  ‘कमीतकमी गोष्टीत भागवायला शिकलो’ असेही आज सर्वत्र बोलले जात आहे. एका सोशल मीडिया वर एका मैत्रिणीने जाहीर प्रश्न टाकला की लॉक डाऊन संपला की पहिली खरेदी काय करणार? अनेक कॉलेज मधल्या तरुण मुलींचे उत्तर   ‘ब्युटीपार्लर मध्ये जाणार’ असे दिसले, काही पुरुष मंडळींनी  ऑनलाईन राहण्यासाठी आवश्यक गॅजेट्स तर काही गृहिणींनी घरातील वस्तू अशी उत्तरे दिली. पण एक उत्तर मात्र मनाला फार भावले.   
‘खरेदी तर दूरच, पण  मला माङया घरातल्या काही वस्तू विकायच्या आहेत!’- हे ते उत्तर! 
त्यावर अनेकांनी मान्य, कदाचित आम्हीही असेच करू’, असेही म्हटले. खरेच असे घडेल का माहित नाही, पण असा विचार व्हावा हे फार महत्वाचे वाटले.
 प्राधान्य कशाला द्यायचे यावर पुन्हा विचार करायची आवश्यकता निर्माण झाली आहे, किंबहुना बहुतेक सर्वच हा विचार करत आहेत. एरवी जे आपण आपल्या संसारात इतके सारे भरून ठेवले आहे त्याची खरंच गरज आहे का आपल्याला, असा विचार आपण सर्वच करत आहोत. मग कपडे, भांडी, दागदागिने हे किती मर्यादित लागते, हे जर पुरते समजले असेल, तर आपले प्राधान्यक्रम बदलतील का? 
एक दोन सुखवस्तू स्थितीतल्या मैत्रिणींशी या विषयांवर चर्चा करताना असे निष्कर्षास आले की सध्या 40 ते 50 हजाराला झाडणे आणि पुसणे हे काम करणारे रोबो मिळतात. म्हणजे ही तर माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेन ची किंमत. !! बाप रे, नकोच मग ते दागिने, त्यापेक्षा अशा वस्तू आता चालतील!.
मंडळी, हे सगळे संवाद कोणत्या चित्रपटातले किंवा कथेतले नाहीत. हे असे काही प्रमाणात घडण्याची शक्यता आहेच. तपशील जितके व्यक्त केले गेले ते कदाचित तसेच नसतील पण आज जगण्यासाठी खरेच कशाची आवश्यकता आहे यावर नक्की विचार केला जात आहे.
- वर्क फ्रॉम होम ही या लॉकडाऊन काळाने सर्वाच्या सवयीची केलेली आणखी एक संकल्पना!
- त्याविषयी अधिक या लेखाच्या उत्तरार्धात : पुढच्या मंगळवारी!

-----------------------

घरकामाचे गणित

1. आजही महिलांनी अनेक क्षेत्रत आघाडीची पदे भूषवली असूनही घरातल्या कामासाठी पुरुष दररोज सरासरी 2क् ते 5क् मिनिटे देतो.
2. तर बाहेर जाऊन काम करणारी असो किंवा नसो, एक महिला सरासरी 350 मिनिटे या घरातल्या कामाला देते. 
3. हे घरातले काम स्वयंपाक धरून नाही. फक्त स्वच्छता आणि आवराआवरी इत्यादी आहे. म्हणजेच फार कौशल्याचे नाही 
4. पण घराचे व्यवस्थापन ज्यावर अवलंबून आहे अशा कामासाठी आज किमान साडेपाच ते सहा तास देणो आवश्यक आहे.
5. मग मित्रांनो सांगा की फक्त आजच्या या लॉक डाऊनच्या काळातच नव्हे तर एरवीही, नोकरीचे आठ तास व घरकामाचे 6-7 किमान तास असे जर रोज 15-16 तास एक स्त्री काम करू लागली तर ते किती ताणाचे आहे! 
6. कारण या कामात, घरी आणि ऑफिसमध्ये सुद्धा आसपासच्या माणसांना समजून घेणे हे अध्याहृत आहेच ना. 


(डॉ प्राची जावडेकर, या ज्येष्ठ शिक्षणतज्‍ज्ञआणि संशोधक आहेत. )

pracheepj@gmail.com

(डॉ पल्लवी मोहाडीकर-कासंडे, या मानसतज्ञ आणि समुपदेशक आहेत. )

Web Title: Work from home, housework, and work for home! Kovid has added a new Mantra for all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.