Women are careful when dealing with the online world .. because there is danger! | महिलांनी ऑनलाइन जगात वावरताना सावधान.. कारण इथे धोका आहे!
महिलांनी ऑनलाइन जगात वावरताना सावधान.. कारण इथे धोका आहे!

- प्रशांत माळी

डिजिटल आणि इंटरनेट माध्यमातील तंत्नज्ञान वापरून नेटवर्किग, व्यावसायिक कामकाज, मत-प्रदर्शन यासारख्या अनेक गोष्टींचा लाभ महिला मोठय़ा प्रमाणावर घेत आहेत. पण त्यांच्या या उत्साही सायबर सहभागामुळे महिला सायबर पीडित होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. सायबर गुन्हे आणि त्याद्वारे महिलांची केली जाणारी छळवणूक तसेच त्यासंबंधीचे कायदे आणि अधिकार हा सायबर गुन्हे शाखेतील आव्हानात्मक असा विषय बनला आहे. महिलांच्या बाबतीत सायबर स्टॉकिंग, हॅकिंग, ऑनलाइन बदनामी, इलेक्ट्रॉनिक ब्लॅकमेलिंग, मॉर्फड पोर्नोग्राफिक इमेजेस, रिव्हेन्ज पोर्न आणि इतर अनेक गुन्हे घडू लागले आहेत. इतरही अनेक युक्त्या वापरून एखाद्या महिलेला दमदाटी करणं, तिच्या वैयक्तिक आयुष्यावर आपलं नियंत्रण ठेवणं आणि तत्सम अनेक शारीरिक आणि भावनिक इजा पोहोचविणारे गुन्हे अतिशय राजरोसपणो आपल्या आजूबाजूला घडत आहेत. आश्चर्य म्हणजे, संबंधित गुन्हेगार आपली ओळख लपवून हे गुन्हे करतात आणि लपवलेल्या ओळखीमुळे त्यांना शिक्षादेखील होत नाही.
विविध सोशल नेटवर्किग साइट्सने सामाजिकीकरणाचं नवीन रिंगण दृढ केलेलं सर्वज्ञात आहेच आणि या रिंगणातील प्रवेश सर्वासाठी खुला असल्या कारणानं महिला या मुक्तीचा पुरेपूर आणि मनसोक्त फायदा घेताना दिसतात.  ऑनलाइन जगात महिला त्यांचा अनुभव जगासोबत वाटू शकतात आणि सोशल नेटवर्किगच्या या फायद्यामुळे अनेक महिला त्यांच्या यशोगाथा त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातील अडचणी किंवा गा -हाणी या व्यासपीठाद्वारे मांडतात. ब-याच महिला या नवीन सामाजिकरणाच्या मार्गाचा, ‘तणाव-मुक्ती’चं माध्यम म्हणून वापर करतात. नेटवर्किग करून समदु:खी मित्न-मैत्रिणी बनवल्या जातात, एकसारख्या विचारसरणीच्या व्यक्तींची ओळख वाढवून त्यांच्यासोबत एकेमकांच्या आयुष्यातील आनंदी तसेच दु:खी क्षणांची देवाण-घेवाण केली जाते. इतकंच नाही तर, वैयक्तिक किंवा सामाजिक आयुष्यातील संघर्षानासुद्धा इथे वाचा फोडली जाते. 
प्रेमाचं नाटक करून केली जाणारी फसवणूक फार पूर्वीपासून प्रचलित आहे. प्रेमाचं, लग्नाचं वचन देऊन, विविध आमिषं दाखवून महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांच्याकडून आपल्या आर्थिक तसेच शारीरिक वासना पूर्ण करायच्या, हे या फसवणुकीचं मूळ स्वरूप. आजही हे फसवणुकीचे प्रकार सर्रास चालू आहेत. मात्न आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात फसवणुकीचं तंत्नदेखील बदललं आहे. म्हणजेच प्रेमाच्या फसवणुकीनं ऑनलाइन रूप धारण केलं आहे. सध्या ऑनलाइन डेटिंग तथा ऑनलाइन मॅट्रिमोनिअल फ्रॉडचं प्रमाण अवाजवी वाढलं आहे. 
डेटिंग अँप्स फ्रॉड 
भारतामध्ये आंतरराष्ट्रीय डेटिंग अँप्स, भारतीय डेटिंग वेबसाइट्स आणि मोबाइल अँप्लिकेशन्स या सा-यां नी अल्पावधीतच भरपूर लोकप्रियता मिळवलेली दिसून येते. देशभरातील बदलत्या चालीरीती, आचार-विचार यांचा अचूक मागोवा घेऊन परदेशी कंपन्यांनी आपले पाय भारतामध्ये घट्ट रोवायला सुरुवात केली आहे. आपल्या देशाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही युवा पिढीमध्ये मोडत असल्या कारणानं साहजिकच डेटिंग अँप्सची लोकप्रियता अतिशय जास्त आहे. आणि नेमक्या याच कारणामुळे डेटिंग अँप्सद्वारे घडणारे गुन्हे वाढत चालले आहेत. या गुन्ह्यांना बळी पडणा-यांमध्ये महिलावर्ग प्रकर्षानं दिसून येतो. बळी पडणा-यां बहुतांश महिला या उच्चशिक्षित असतात. त्यांची आर्थिक परिस्थितीदेखील चांगली असते आणि या महिला अर्थातच तंत्नज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करतात. साधारणपणो, घटस्फोटित किंवा एकटय़ा राहणा-या  महिला अशा प्रकारच्या फ्रॉड्सना सहजपणो बळी पडतात. हे फसवणूक करणारे लबाड फार निरागसपणो फसवणुकीची सुरुवात करतात. सोशल मीडिया साइट्स, इ-मेलद्वारे एखाद्या मुली/महिलेसोबत संपर्क करायचा मग हळूहळू आपापल्या माहितीची देवाण-घेवाण करून त्यातून एकमेकांच्या वागण्याचं किंवा बोलण्याचं साम्य काढायचं. कधी कधी उगीच कोणत्या तरी समारंभाचा संदर्भ देऊन आपली ओळख कशी जवळची आहे, असं भासवायचं. असे अनेकविध मार्ग अवलंबवून कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्कॅमर्स आपले सावज गाठतात. काही स्कॅमर्स आपली खोटी प्रोफाइल सोशल मीडियावर आकर्षक पद्धतीनं तयार करतात आणि आपलं सावज आपणहून जाळ्यात फसेल याची वाट पाहतात आणि एकदा का एखादी मुलगी वा स्री त्या जाळ्यात आली, की लागलीच आपलं प्रेम व्यक्त करतात. ब-याच प्रकरणांमध्ये हे प्रेमवीर परदेशात राहत असल्याचं सांगतात आणि आपल्याला कोणत्या तरी वेगळ्या देशीस्थित व्हायचे आहे किंवा ती मुलगी जिथे वास्तव्य करते तिथे कायमस्वरूपी राहावयास यायचं आहे, असं सांगतात आणि त्याकरिता तिच्याजवळ पैशांची मागणी करतात. खरं तर ते कधीच कुठे येत नाहीत अगर जात नाहीत.   पैसे मागताना सहसा बँकेतून व्यवहार करण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. कारण बँकेतून एकदा व्यवहार झाला की मग पैसे परत जाण्याचा काही मार्गच उरत नाही. याशिवाय काही प्रकरणात असंदेखील होतं की, स्कॅमर्स संबंधित मुलीला त्यांच्याकरवी पैसे पाठवतात आणि ते पैसे दुस:या व्यक्तीला हस्तांतरित करण्यास सांगतात. अशा केसमध्ये पैशांची ही अफरातफर अवैध स्वरूपाची असते आणि या अवैध अफरातफरीमध्ये त्या मुलीचा/महिलांचा मोहरा म्हणून वापर केला जातो. 
मॅट्रिमोनियल वेबसाइटचं व्यासपीठ वापरून त्याद्वारे सायबर गुन्हे करणा:या तीन नायजेरियन तरुणांविरोधात दिनांक 30 नोव्हेंबर 2019 रोजी पुण्याच्या न्यायालयाने तीन वर्षाचा कारावास आणि त्याचबरोबर पाच लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. संबंधित गुन्ह्यामध्ये न्यायालयानं आरोपींना माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कलम 66-क, 66-ड सह भारतीय दंड विधानाअंतर्गत कलम 419, 420, 34 तसेच फौजदारी प्रक्रि या संहितेअंतर्गत कलम 428 अन्वये शिक्षा ठोठावली असून, त्याद्वारे मॅट्रिमोनियल साइट्सचा गैरवापर करून केल्या जाणा:या फसवणुकीविरोधी समाजात चांगलाच पायदंडा घालून दिला आहे.
जिव्हाळा दाखवून फसवणूक
या बाबतीत सोशल मीडिया साइट्सद्वारे मैत्री केली जाते. स्कॅमर्स कोणत्या तरी दूरदेशी स्थित असतो आणि मग त्या मैत्रीचे थोडय़ा दिवसांतच जिव्हाळ्याच्या नात्यामध्ये रूपांतर होते. मग वेबकॅमवरून चॅटिंग सुरू असताना अचानक स्कॅमरच्या वेबकॅममध्ये काही तरी अडचण येऊन तो पुन्हा पूर्ववत चालू केला जातो. मग भावनेच्या भरात त्या मुलीकडून तिच्या गोपनीयतेचा भंग होईल अशी, तिच्या नकळत, अश्लील कृत्ये घडवून आणली जातात. असं सगळं झाल्यावर स्कॅमर्स आपलं खरं रूप दाखवतात. दुस-या दिवशी किंवा काही वेळातच त्या मुलीला असं सांगितलं जातं की, ‘जे काही कृत्य तिनं वेबकॅमसमोर केलं ते सर्व चित्रीत करण्यात आलं असून, तो व्हिडीओ जर सगळीकडे पसरू नये असं वाटत असेल तर खात्यामध्ये अमुक एक रक्कम जमा करावी.’ मुलीनं/महिलेनं एकदा का पैसे देणं सुरू केलं की मग  जोवर मुलगी नकार देत नाही तोवर पैशांची मागणी वाढतच जाते. 
खोटय़ा डेटिंग वेबसाइट्स
दुर्दैवानं  सगळ्याच डेटिंग साइट्सवर काहीअंशी तरी खोटय़ा प्रोफाइल्स बनवल्या जातातच. स्कॅमर्स त्यांच्या काही ना काही क्लृप्त्या वापरून लोकांना फसवण्यासाठी सज्ज होतातच. त्यामुळे प्रत्येक मुलीनं आणि महिलेनं डेटिंग साइट्सचा वापर करताना दक्षता घेणं गरजेचं आहे. यासाठी, मुलाची वैयक्तिक माहिती पडताळण्याऐवजी त्याच्या प्रश्नांमध्ये आर्थिक बाबींशी निगडित असे किती प्रश्न येत आहेत याकडे बारीक लक्ष द्यावं. त्यानंतर आपण आपली प्रोफाइल अतिशय साधी, कमी शब्दांची आणि आपल्या फोटोविरहित ठेवलेली असताना जर एकसारखे मेसेज येत असतील, तर तुम्ही एखाद्या फेक किंवा खोटय़ा साइटचे शिकार होत आहात, असे समजण्यास काही हरकत नाही.
काही वेळा, अस्सल असणा:या साइट्सद्वारेसुद्धा फसवणूक होण्याची शक्यता असते. ही फसवणूक आपल्या बाबतीत होऊ नये, यासाठी ऑनलाइन डेटिंग साइट्सद्वारे आपण कोणासोबत कशा प्रकारचा संवाद साधला पाहिजे, संवाद साधत असताना समोरची व्यक्ती कशी उत्तर देत आहे, त्या व्यक्तीच्या लिहिण्यामध्ये कशा आणि किती चुका आढळत आहेत, अशा अनेक बाबींचा अतिशय बारकाईनं अंदाज घेणं खूप महत्त्वाचं आहे.
 

फसवणुकीसाठी मॅट्रिमोनिअल वेबसाइट्स 

डेटिंग साइट्सबरोबरच गुन्हेगार मॅट्रिमोनियल साइट्सदेखील मोठय़ा प्रमाणात  वापरताना दिसतात. या ठिकाणी स्कॅमर्स सहसा घटस्फोटित आणि एकटय़ा राहणा-या महिलांना आपली शिकार बनवतात. त्यांना लग्नाचं वचन देऊन, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून मोठी रक्कम मागतात. एकदा का ही मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली की, हे स्कॅमर्स त्या महिलेला तिची झालेली फसवणूक समजण्याआधीच गायब होतात. या गुन्ह्यामध्ये स्कॅमर्स आपली ओळख लपवूनच ठेवतो, पैसेदेखील कोणा तरी ति-हाईत व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यात येतात, जेणोकरून ख-या गुन्हेगाराची ओळख कोणासमोरही येणार नाही. खोटी प्रोफाइल तयार करणं ही एक अत्यंत सोपी बाब आहे. शिवाय, सर्वाच्या सोयीसाठी बँकांनी खातं उघडणीच्या पद्धतीदेखील साध्या आणि सुखकर करून ठेवल्या आहेत. या सगळ्यामुळे होतं असं की, सायबर गुन्हेगार साध्या सरळ सोयींमध्ये दडलेल्या पळवाटा शोधून आपला फायदा करून घेतात आणि त्याद्वारे राजरोसपणो निरपराध लोकांना छळतात.
मला असं वाटतं की, ज्यावेळी महिला अशा वेबसाइट्सचा वापर करतात त्यावेळी त्यांनी स्वत:च जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे. ज्या व्यक्तीसोबत आपण बोलत आहोत त्यावर आंधळा विश्वास न ठेवता त्यानं सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची खातरजमा करून घेणं हे प्रथम कर्तव्य आहे. ब-याचदा हे स्कॅमर्स मुलींना/महिलांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळतात आणि त्याच पैशांनी त्या मुलींसाठी भेटवस्तू खरेदी करून त्यांना आनंदी करतात. त्यामुळे जर एखादा तुम्हाला सतत भेटवस्तू देत असेल आणि तुमच्याकडे पैशांची मागणी करीत असेल तर सावध व्हा !
मॅट्रिमोनिअल साइट हाताळताना..
*  मॅट्रिमोनिअल साइटवर प्रोफाइल बनविताना महिलांनी स्वतंत्न असे इ-मेल बनवावे जे फक्त त्या साइटकरिताच वापरले जातील. कारण बहुतेकदा नेहमीच्या इ-मेल आयडीवर इतर महत्त्वाची माहिती लिंक करून ठेवलेली असते आणि त्या माहितीच्या सुरक्षेखातर नवीन इ-मेल आयडी बनवणं केव्हाही चांगलंच. 
*  चांगला उद्देश ठेवून संपर्क ठेवणारी माणसे नेहमी समोरच्या व्यक्तीला तिच्या कलेनं बोलण्याचे किंवा वागण्याचे स्वातंत्र्य देतात. 
त्यामुळे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती सांगण्यासाठी कोणीही जबरदस्ती तर करीत नाहीत ना, तसेच तुमच्या दैनंदिन जीवनावर कोणी लक्ष तर ठेवून नाही ना, याची काळजी घ्यावी.
*  मॅट्रिमोनिअल साइट्सवर संवाद साधत असताना असे काही प्रश्न करा ज्यावरून समोरचा माणूस तुमच्या योग्यतेचा आहे की नाही याची कल्पना तुम्हाला येईल. 
 जर तुम्ही ऑनलाइन बोलत असताना एखादी व्यक्ती तुमच्या जवळ असलेल्या मालमत्तेची, पैशांची किंवा तुमच्या पगाराबाबतची विचारणा करत असेल, तर ताबडतोब अशा व्यक्तीचा संपर्क संपवा. 
*  ऑनलाइन प्रोफाइल संबंधित माहिती, म्हणजेच तुमचे यूजरनेम, पासवर्ड कधीही कोणालाही सांगू नका. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. तुमच्याबद्दलची संवेदनशील माहिती उघड करू नका.
 * मॅट्रिमोनिअल साइट्सद्वारे अगर ऑनलाइन डेटिंग अँपद्वारे कोणतंही नातं निर्माण करण्यापूर्वी त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटणं, शहानिशा करणं गरजेचं आहे.

(लेखक मुंबई उच्च न्यायालयात वकील असून, सायबर कायदा आणि सुरक्षा तज्ज्ञ आहेत.)  

 

 

Web Title: Women are careful when dealing with the online world .. because there is danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.