Without us: - The story of a different movement in Mexico | विदाउट अस:- मेक्सिकोतल्या एका आगळ्या वेगळ्या आंदोलनाची कहाणी

विदाउट अस:- मेक्सिकोतल्या एका आगळ्या वेगळ्या आंदोलनाची कहाणी


- कलीम अजीम

बालपणी शाळेत निबंध असायचा जर-तरचा. जर पाणी/हवा/सूर्य/चंद्र  नसता तर जग कसं असतं.  लिहिताना वेळेचं भान सोडून आपण कल्पनेत रमून कागदं भरत असू. अलीकडे सायन्स फिक्शन सिनेमांनी आपल्या कल्पनाविश्वात अधिकची भर टाकली. वास्तविक, हवामानबदलामुळे निसर्गातील काही घटक खरंच भूतकाळ होणार आहेत. दुसरीकडे समाजात फोफावणा-या अनीतीमुळेदेखील काही गोष्टी अदृश्य होतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मेक्सिकोत महिलादिनी असाच एक प्रयोग राबविण्यात आला. यातून जगाला एका भयाण धोक्याची जाणीव झाली. 9 मार्चला मेक्सिको शहरात सार्वजनिक जगातून स्रिया एकाएकी अदृश्य  झाल्या. त्या दिवशी मेक्सिकोत रस्त्यावर, गल्लीबोळात अगदी कुठेही एकही महिला दिसली नाही. 
शाळा, कॉलेज, महाविद्यालयं, मॉल्स, मल्टिनॅशनल कंपन्या, कारखाने, व्यावसायिक प्रतिष्ठानं सगळीकडे महिला अदृश्य होत्या. बाजारात,  सिनेमागृहात, शॉपिंग सेंटर, पार्लर, रेल्वे, बसेस, सार्वजनिक स्थळं यापैकी कुठेही महिला दिसत नव्हत्या. नोकरी आणि कामाच्या ठिकाणी एकही महिला पोहोचली नाही. हे असं का? असा प्रश्न एकटय़ा मेक्सिकोलाच नाही तर संपूर्ण जगाला पडला.
- महिलांविरोधात वाढलेल्या लैंगिक हल्ल्याचा निषेध म्हणून मेक्सिकोतील महिलांकडून 24 तासांचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. महिलांनी सर्वच ठिकाणी कामावर बहिष्कार घातला. प्रतीकात्मक स्वरूपात महिला नाहीशा झाल्यानं साहजिकच जगभराचे डोळे मेक्सिकोवर खिळले. ‘विदाउट अस’ अर्थात ‘आमच्याशिवाय एक दिवस’  अशी थीम.  वाढते लैंगिक अत्याचार आणि पुरुषी व्यवस्थेविरोधातल्या या आंदोलनाची होती. महिला जगातून गायब झाल्या तर पुरुषांचं आयुष्य कसं होईल याची झलक या आंदोलनातून महिलांना दाखवून द्यायची होती. या आंदोलनाचे पडसाद अर्जेटिना, चिली आणि लॅटिन अमेरिकेच्या अनेक देशात उमटले. ठिकठिकाणी महिलांनी प्रतीकात्मकरीत्या संपात सहभाग नोंदवला. चोहीकडे पुरुषच पुरुष दिसत होते. एरवी महिलांनी गजबजलेली स्थळं ओस पडली होती. शासकीय कार्यालयात महिलांच्या खुर्च्या  रिकाम्या  होत्या. त्यावर आंदोलनाला समर्थनाचे स्टिकर चिकटवलेली होती. महिलांशिवायच्या या जगानं एक पॉझ घ्यावा, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महिलांशिवाय रिकामे असलेल्या टेबल-खुर्च्या , महिलांशिवायची सार्वजनिक ठिकाणांच्या फोटोंनी सोशल मीडियावर एकच गर्दी केली होती.
मेक्सिकोच्या ‘एल युनिव्हर्सल’ या मोठय़ा वृत्तपत्रत सदर लिहिणा-यावाली पाउला रोजास यांनी आपली जागा रिकामी सोडली होती. त्या जागेवर महिलांच्या या आंदोलनाचं समर्थन करणारा एक हॅशटॅग टाकला होता. अल जझिरानं  केलेल्या वार्ताकनामध्ये म्हटलं आहे की, हा इतिहासातला सर्वात मोठा संप होता.
नेमकं झालं तरी काय?
- मेक्सिकोतील मीडिया रिपोर्ट्स पाहिले तर लक्षात येतं की, तिथे दरदिवशी तब्बल दहा महिलांवर लैंगिक हल्ले होतात. न्यू यॉर्क टाइम्सच्या मते जानेवारी 2019 ते सप्टेंबर्पयत तब्बल 2,833 महिलांच्या हत्या झालेल्या आहेत. सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात मेक्सिकोत महिलांविरोधात होणा:या गुन्ह्यांच्या संख्येत 137 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारी सांगते की, गॅँगवॉरमधील बहुतेक हल्ल्यात महिला बळी पडल्या आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार हिंसाचारात पीडित महिलांपैकी 4क् टक्क्यांहून अधिक महिलांना त्यांचा गुन्हेगार माहीत होता.
अल जझिराच्या वृत्तात मेक्सिको शहरातील चित्रकार सोफिया वेडनर म्हणतात, ‘मेक्सिकोमध्ये अशी एकही महिला नाही जिला कधी लैंगिक हिंसाचाराचा    अनुभव आला नसेल,’ माध्यमातून प्रसारित झालेल्या बातम्यांचा आधार घेतला तर असं दिसून येतं की, महिलांच्या खुनाचा प्रत्येकी दहापैकी एक खटला निकाली निघतो. त्यातही शिक्षा होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे.
मेक्सिकन सरकारची आकडेवारी पाहिल्यास असं लक्षात येतं की, देशात महिला सर्वात जास्त असुरक्षित आहेत. तिथे महिलांना कौटुंबिक अत्याचाराला तर सामोरं जावं लागतंच शिवाय कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक छळाला सामोरं जावं लागणा-यामहिलांची संख्या मोठी आहे. मेक्सिकोत ऑटोमोबाइल सेक्टर, कारखाने, गारमेण्ट आणि खासगी क्षेत्रत मोठय़ा संख्येनं महिला काम करतात. सगळीकडे अत्याचाराच्या बाबतीत सारखीच परिस्थिती आढळून आलेली आहे.
वॉशिंग्टन पोस्टमधील एका प्रतिक्रियेत स्थानिक महिला नुनेझ म्हणतात, ‘मेक्सिकोमध्ये महिलाविरोधात हिंसाचार पसरतच आहे, आज देशात असं कोणतंही राज्य नाही जिथे महिलांसाठी जगणं सुरक्षित असेल.’ अल जझिराच्या मते चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात तब्बल 32क् महिलांच्या हत्या करण्यात आल्या. यातल्या 79 हत्या या लैंगिक गुन्ह्यातून घडलेला वंशविच्छेद म्हणून नोंदवल्या गेल्या आहेत. गेल्या महिन्यात फातेमा आल्ड्रिगेट नावाच्या सातवर्षीय बालिकेची हत्या झाली. बांधकाम साइटवर प्लॅस्टिकच्या पिशवीत तिचा मृतदेह आढळला. काही दिवसांपूर्वी 25 वर्षीय इनग्रीड एस्केमिला या महिलेची क्रूररीत्या हत्या झाली. तिच्या जोडीदारानं तिच्यावर चाकूचे वार करून नृशंसपणो तिची हत्या केली. दुस-यादिवशी मृतदेहाचे भयानक फोटो काही मेक्सिकन वृत्तपत्रंनी पहिल्या पानावर 
छापले. या घटनेनंतर देशभरातील महिलांमध्ये संतापाची लाट उसळली. यातूनच हे आंदोलन उभं राहिलं.
आंदोलनाच्या त्या दिवशी
8 मार्चला मेक्सिकन महिला लॅटिन अमेरिकेतल्या महिलांच्या हत्येच्या निषेधार्थ एकवटल्या होत्या. चिली देशातही महिला मेडिकल युनिफॉर्म, कारखान्याचा आणि स्कूल युनिफॉर्म घालून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. चिली मेक्सिकोत झालेल्या आंदोलनात प्रत्येकांच्या हातात गमावलेल्या व्यक्तीच्या प्रिय वस्तू होत्या. लाल आणि गुलाबी रंगाचे कपडे घालून या महिलांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं 
होतं. 
विविध वयोगटातील अनेक महिला कबरीवर लावल्या जाणा-या सुळावर (क्रॉस) मृत व्यक्तीचं नाव लिहून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मेक्सिको सिटीत झालेल्या या  आंदोलनात लाखो महिलांनी हातात क्रॉस, कपडे, फुलं, सॅण्डल, चित्रं घेऊन सहभाग नोंदवला. सोशल मीडियावर ‘इनग्रीड’ हॅशटॅग गाजत होता. पेंटिंग्ज, फुलं, मृत मुलींना श्रद्धांजली वाहणारे फोटो, स्लोगन या हॅशटॅगवरून फिरत होते.महिलांच्या हाती ‘आम्हाला जिवंत ठेवा’ किंवा ‘आज लढा द्या म्हणजे उद्या आपण मरणार नाही’, असे फलक होते. 
दुस-या  दिवशी म्हणजे 9मार्च रोजी महिलांना एका दिवसासाठी अदृश्य होण्याचं आवाहन करत लाक्षणिक संप घडवून आणण्यात आला. त्यादिवशी महिला अक्षरश: सार्वजनिक जीवनातून गायबच झाल्या. न्यायव्यवस्थेची अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचारानं ग्रस्त झालेल्या प्रशासनाविरोधात हा संप होता.
 महिलांशिवाय दिवसाचा आर्थिक परिणाम
महिलांच्या अदृश्य आंदोलनाचा मेक्सिकोतल्या सार्वजनिक क्षेत्रला सर्वाधिक फटका बसला.  ‘बिझनेस ग्रुप कॉन्सानको सर्वितुर’च्या निरीक्षणानुसार मेक्सिकोला 24 तासांच्या संपात जवळपास 9,721 कोटी रु पयांचं नुकसान सोसावं लागलं. मेक्सिकोतील सार्वजनिक क्षेत्रतील सुमारे 22 दशलक्ष जागांवर महिला कार्यरत आहेत. एकूण कामगारांपैकी महिलांची संख्या 4क् टक्के आहे. मेक्सिकोमधील ‘नॅशनल चेंबर्स ऑफ कॉमर्स सव्र्हिसेस अँण्ड टुरिझम कॉन्फेडरेशन’च्या मते, जर सर्वानी एक दिवसासाठी काम करणं  बंद केलं तर देशाला 26 बिलियन अब्ज (1.3 अब्ज डॉलर) पर्यंतचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.महिलांनी या नुकसानीवर आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं की, ‘आमच्याशिवाय तुमचं जगणं कसं असेल हे अनुभवा.’ मेक्सिकोतील महिलांचा पुरुषी दांभिकता, रेप कल्चर, क्रूरतेविरोधातला हा लढा निर्णायक ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहेत. सोशल मीडियावर महिलांनी म्हटलं आहे की, ‘आमचं हे आंदोलन लाक्षणिक असलं तरी ते दीर्घकाळ चालणार आहे. जोर्पयत महिलांच्या हत्या थांबणार नाहीत तोर्पयत आम्ही अशा रीतीनं
विरोध करतच राहणार !’


आंदोलनाआधी लाखोंचा मोर्चा
पाच महिन्यांपूर्वी म्हणजे नोव्हेंबरमध्ये मेक्सिकोत महिला अत्याचाराचा विरोध करणारा एक भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यात लाखोंच्या संख्येनं स्रियांनी सहभाग नोंदवला होता. महिला गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालून तप्त डांबरी रस्त्यावरून अनवाणी पायानं चालत होत्या. गुलाबी आणि पिवळा म्हणजे त्या महिलांचा आवडता रंग होता ज्यांची अलीकडच्या काळात हत्या करण्यात आली होती. या हत्येंचा निषेध म्हणून लाखो महिला रस्त्यावर होत्या.


(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

 kalimazim2@gmail.com

 

 

Web Title: Without us: - The story of a different movement in Mexico

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.