The wish for doing diffrent to stay alive me- Rohini Hattangadi | वेगळेपणाचा ध्यास हाच माझा श्वास!
वेगळेपणाचा ध्यास हाच माझा श्वास!

ठळक मुद्देआज 5 नोव्हेंबर. मराठी रंगभूमी दिन. गेल्या 50 वर्षांपासून कलाविश्वामध्ये मोलाचं योगदान दिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना मराठी रंगभूमीवरील मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार आज प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली बातचीत..


-रोहिणी हट्टंगडी

सुमारे 50 वर्षांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात आपली दमदार वाटचाल सुरू आहे. या प्रदीर्घ वाटचालीविषयी तुम्ही काय सांगाल?

- इयत्ता तिसरीत असल्यापासून मला नृत्याची आवड होती. त्या नृत्याच्या आवडीमुळेच मला पहिल्यांदा बालनाट्यामध्ये संधी प्राप्त झाली. नाटकाची तिथून गोडी लागली; पण मॅट्रिकनंतर खरी नाटकाची सुरुवात झाली. कॉलेजमध्ये असताना मी पहिलं मोठं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर केलं ते म्हणजे ‘सुंदर मी होणार’. त्या पहिल्याच नाटकाला रौप्यपदकही मिळालं. घरातून उत्तम पाठबळ होतं. माझ्या वडिलांचं प्रोत्साहन असल्यामुळेच मी त्यात पुढे जाऊ शकले. कारण त्या काळात एखाद्या मुलीला दिल्लीला एकटीला  एनएसडीमध्ये शिक्षणासाठी पाठवणं ही फार मोठी गोष्ट होती. एनएसडीमध्ये जयदेव यांची भेट झाली. आमचं प्रेम जुळलं. आम्ही दोघेही फ्रीलान्सिंग करीत असल्यानं घरातल्यांना जातीपातीपेक्षा आमच्या भवितव्याची काळजी अधिक होती. पण सुदैवानं सगळ्या गोष्टी नीट जुळून आल्या. सासू-सास-यानीही अभिनयाला पाठबळ दिलं. गांधी चित्रपटाच्या वेळीसुद्धा मी 25 आठवडे घरापासून बाहेर होते. पण कधीही कुणी मला अभिनयात आडकाठी केली नाही. घरातून असं पाठबळ असल्याशिवाय आपली वाटचाल सुकर होऊ शकतच नाही असं मी मानते. मागे वळून पाहते तेव्हा हे पाठबळ खूप मोलाचं होतं असंच मला वाटतं. दोन्हीकडच्या घरातील सर्वांनी दिलेल्या मुक्त स्वातंत्र्यामुळेच अभिनयाचा इतका दीर्घ पल्ला मी गाठू शकले. 

रंगभूमीवर काम करीत असताना विविध टप्प्यांवर स्त्री म्हणून तुम्हाला कोणकोणते बदल जाणवतात? स्त्रीकडे पाहण्याच्या माध्यमांच्या दृष्टिकोनात काही बदल झाला आहे असं तुम्हाला जाणवतं का?
- स्त्री म्हणून सांगण्यापेक्षा कलाकार म्हणून हे मी अधिक नेमकेपणानं सांगू शकेन. पूर्वी नाटक आणि चित्रपट ही दोनच माध्यमं होती त्यामुळे मुळात पर्याय फार कमी होते. चित्रपटांत काम मिळणं हेसुद्धा चटकन व्हायचं नाही. त्यामुळे एक व्हायचं की, कामाप्रति असलेली कलाकारांची बांधिलकी प्रचंड असायची. अभिनय ही आत्यंतिक जिव्हाळ्याची गोष्ट असल्यानं सगळं सांभाळायचं; पण ते करायचं अशी भावना असायची. दादरमध्ये छबीलदासच्या इथे आविष्कारचं कार्यालय होतं. नाटकमंडळींचा तो अड्डा असायचा. काम असो नसो; पण नाटकवाली सगळी मंडळी तिथे जमायची. गप्पांची मैफल तिथेच जमायची. आता मात्र असं जाणवतं की कलाकारांजवळ पर्याय खूप आलेले आहेत. कामं खूप लवकर मिळत आहेत. वाहिन्यांची संख्या वाढलेली आहे. नाटक, चित्रपटांच्या जोडीला या वाहिन्यांवर चालणा-या  मालिकांमध्ये अभिनयाची संधी मिळते आहे. त्याच्या जोडीला आता वेबसिरीजसुद्धा वाढत आहेत. लघुपट तयार होत आहेत. मात्र या चिक्कार पर्यायांच्या जोडीला काम पटापट मिळत असल्यानं ‘शिकणं’ ही प्रक्रि या मात्र दिवसेंदिवस कमी होते आहे, याची खंत वाटते. मी जे शिकलं आहे, ते फार कमी आहे, याची जाणीव कलाकाराला असणं फार महत्त्वाचं असतं. नेमकी त्याचीच उणीव आज जाणवते. त्यामुळे नव्या कलाकारांना सगळं सोपं वाटतं. पण अभिनय ही सोपी कला नाही हे समजून घ्यायला हवं. या क्षेत्रात टिकून राहायचं तर कमीत कमी आठ वर्षं आपल्याला नेटानं प्रयत्न करावे लागतील हे आजकाल आधी युवा कलाकारांना सांगावं लागतं. हे जे लक्षात घेत नाहीत असे अनेक कलाकार ज्या वेगानं उगवतात त्याच वेगानं ते मावळतानाही दिसतात.आजच्या पिढीमध्ये आलेला ‘मोबाइल’ नामक राक्षस तर आणखीनच वाईट आहे. कारण सीन झाला की आजूबाजूचं भानच हरवलेले कलाकार त्यात हरवलेले दिसतात. मी मुलांना यापासून माझ्यापरीनं परावृत्त करण्याचा प्रयत्न करते; पण ब-याचदा हे प्रयत्न अपुरे ठरतात. 

 


नव्या पिढीच्या संदर्भात तुमचं हे निरीक्षण योग्यच आहे. पण नव्या पिढीसोबत काम करताना तुम्हाला तडजोड करावी लागली किंवा स्वत:मध्ये काही बदल करावे लागले, असे काही प्रसंग आले का? नव्या-जुन्याचा संघर्ष कधी उद्भवला का?

- हे थोडंफार होतंच. ते स्वाभाविकच आहे. मी ज्या पिढीतून शिकले आहे त्याची शिस्त मी पुढे नेणारच. ही   ‘स्टारगिरी’ नसते. आम्ही जे शिकलेलो आहोत तेच पुढे न्यायचा प्रयत्न असतो. आजकालचे कलाकार वेळा पाळतात ही चांगली गोष्ट आहे; पण एका मर्यादेपर्यंत. कारण आपण देत असलेला शॉट केवळ वेळ संपली म्हणून स्वत:चं पॅकअप करून ठरलेल्या वेळी निघून जाणारे तरुण कलाकार मी पाहते आहे. हे माझ्या पिढीच्या कलाकारांना पटणारं, रुचणारं तर नाहीच; पण ते आमच्या आकलनाच्याही पलीकडचं आहे. हो पण कधी कधी त्यांचंही म्हणणं समजून घ्यावं लागतं. काही वेळेस मात्र काही सांगायचा, शिकवायचा आपण प्रयत्न करतो; पण बदल होणार नसतील तर मात्र  मग मी मौन बाळगणे पसंत करते. मी त्यावर पुन्हा भाष्य करायला जात नाही. माझा अगदी 100वा प्रयोग असेल तरी मला नवं नवं काहीतरी सुचत असतं. करून पहावंसं वाटत असतं. त्यामुळे मी सहकारी कलाकारांची मनोभूमिका तयार करण्यासाठी प्रयत्न करीत असते. 
आजच्या काळातील नाटक, चित्रपट आणि मालिका यांच्याकडे तुम्ही कसं पाहता? जुन्या संदर्भात काय जपायला हवं असं तुम्हाला वाटतं?
- विमलदा, ऋषीदा किंवा गुरुदत्त यांचे चित्रपट आपल्या आजही स्मरणामध्ये का राहिले आहेत असा जर आपण विचार केला तर लक्षात येतं की, आशयसंपन्नता हे त्याचे प्रमुख बलस्थान होतं. त्याच्या संकल्पना सुंदर होत्या. नुकताच आलेला ‘उरी’ हा चित्रपट सोडला तर इतक्यात आलेला कोणताही चित्रपट मला आठवतसुद्धा नाही. कारण चित्रपटात काही भिडणारंच नसेल तर ते लक्षात कसं राहील? आजकालच्या चित्रपटांत प्रामुख्यानं तंत्रज्ञानावर अधिक भर दिला जातो आहे असं दिसतं. नाटक आणि मालिकांनाही हीच बाब लागू पडते. त्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतानाच आशयाला महत्त्व देणारे चित्रपट अथवा नाटक काळाच्या कसोटीवर टिकून राहतील असं वाटतं. मालिकांची नावंही आपल्या स्मरणात राहत नसतील तर त्यांच्या आशयात नक्कीच कमतरता होत्या हे लक्षात घ्यायला हवं.  नाटकांमध्येसुद्धा खूप नवनवे प्रयोग होताना दिसत आहेत. ‘नाइटरायडर’सारख्या नाटकात ओळख लपवण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुरेख वापर केला आहे. नाटकांचे विषयसुद्धा बदलत आहेत. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ सारखे वेगळे नाटक रंगभूमीवर येते आहे. मी जेव्हा विनय आपटेनी  दिग्दर्शित केलेले ‘मित्नाची गोष्ट’ नावाचं विजय तेंडुलकरांचं एक ‘बोल्ड’ नाटक केलं होतं.  त्यात मी लेस्बियनची भूमिका केली होती. त्याचे आम्ही 25 प्रयोग केले. पण आज हे विषय स्वीकारले जात आहेत. सगळ्याच बाजूंनी प्रयोगशीलता असणारं ‘देवबाभळी’सारखं सुंदर नाटक आहे. त्यामुळे नाटकामध्ये तंत्नज्ञान आणि प्रयोगशीलता निश्चितच वाढत आहे ही स्वागतार्ह बाब आहे.
तुम्ही आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. त्यातील कोणती भूमिका तुमच्या सर्वांत जिव्हाळ्याची आणि तुमच्या अंतरंगाशी मिळतीजुळती आहे?

- तशा अनेक भूमिका आहेत खरं तर. ‘चांगुणा’ ही नाटकातील माझी भूमिका राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरली होती ती कायम स्मरणात आहे. ‘मीडिया’ नावाचं एक ग्रीक नाटक जयदेवजींनी केलं होतं. त्यातील माझी भूमिका मला फार आवडली होती. ‘अपराजिता’ नावाचं एकपात्री सादरीकरण मी केलं होतं. ‘रथचक्र ’मध्ये मी दुहेरी भूमिका केल्या होत्या. ते आव्हानात्मक काम होतं.  ‘नटसम्राट’ मला करायला मिळालं. माझ्या समजुतीप्रमाणे मी ‘कावेरी’ साकारली होती. पण प्रत्येक भूमिका ही कलाकाराला समृद्ध करून जात असते. तुम्ही त्यातून वेगळ्या त-हेनं विचार करता. ती तुमच्या जवळची नसतानाही तुम्ही त्याचा विचार करू लागता. त्यातून तुम्हाला माणसाचं मन कळत जातं. त्यामुळे तुमच्याही व्यक्तिमत्त्वात आणि अंतरंगात बदल होतात. तुम्ही अधिक उदारमतवादी बनता आणि त्यातून माणूस समजून घ्यायला तुम्हाला जास्त मदत होते. त्यामुळे प्रत्येक भूमिका ही माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. ‘कस्तुरबा’ केल्यानंतर तुमच्यात काय बदल घडला असे मला नेहमी विचारलं जातं.  त्यावर मी सांगते की, फक्त ‘कस्तुरबा’ साकारल्यानंतर नाही तर प्रत्येक भूमिका साकारताना मी त्याच तन्मयतेनं करीत असल्यानं मी आता माणसाला एक नाही दोन नाही तर ‘तिसरा चान्स’ द्यायला तयार असते !

अवघड किंवा आव्हानात्मक वाटलेली अशी कोणती भूमिका होती?

- अगदी ताजं उदाहरण सांगायचं झालं तर ‘वन्स मोअर’ या नाटकासाठी मी पुरुषाची भूमिका साकारली आहे. त्यामध्ये माझं स्त्रीपण लपवून एक पुरुष साकारण्यासाठी मी जे जे काही करता येईल ते केलं आहे. माझ्या दृष्टीनं ते आव्हानात्मक काम होतं. ‘मित्नाची गोष्ट’मधील लेस्बियन मुलीची भूमिका तसेच ‘मीडिया’मधील ग्रीक नाटकातील स्रीची भूमिकाही माझ्या दृष्टीनं आव्हानात्मक होती. अनुभवातून आणि आजवरच्या शिक्षणातून मला भूमिका समजून घेताना त्यातील अवघड आणि आव्हानात्मक गोष्टी लक्षात येतात. पण प्रत्येक भूमिकेमध्ये काही ना काही आव्हान असतंच. ते समजून घेतच भूमिका साकारावी लागते. दारू पितानाची भूमिका साकारायची असेल तर हळूहळू नशा चढत जात असताना त्यानुसार उच्चारापासून देहबोलीपर्यंत कसे फरक पडत जातात, त्यातील बारकावे साकारणं हे आव्हानात्मकच असतं. 
मालिका आणि महिला यांच्यातील नात्याचं  विश्लेषण तुम्ही कसं कराल?
- नोकरदार महिलांना मालिका पाहायला वेळ नसतो. पण गृहिणी, घरात असलेल्या महिलांना मोकळा वेळ असल्यानं त्यांचा स्वाभाविक ओढा तिकडे असतो.  पूर्वीची गप्पा मारणं,  वाळवणं करणं, एकमेकींना मदत करणं ही प्रवृत्तीही हल्ली कमी होत चालली आहे. त्यामुळे महिला आता मालिकांमध्ये मन रमवतात. म्हणून सगळ्याच प्रमुख वाहिन्यांवर रात्री 8 ते 10 ही वेळ महिलांसाठी राखीव असते आणि कौटुंबिक मालिका त्याच वेळेत दाखवल्या जातात. महिलांना जे हवं आहे ते मालिका देत आहेत त्यामुळे महिलांचा जीव मालिकांमध्ये गुंततो आणि मालिकांना महिला प्रेक्षकवर्ग जास्त मिळतो म्हणून मालिकांचा विचार हा प्रामुख्यानं महिलांना केंद्रस्थानी ठेवून केला जातो. 
नाटक, चित्रपट, मालिका यामध्ये स्री पात्नांच्या चित्रणामध्ये काही बदल झालेले आहेत का? 

- कालानुरूप निश्चितच होत आहेत. लोकांची विचारसरणी बदलते त्यानुसार हे स्त्री   पात्रांचं चित्र ण निश्चितच बदलत जातं. पूर्वीच्या तुलनेत आता स्त्रीमुक्ती, स्री सबलीकरण हे मुद्दे चित्रपटांतून अधिक नेमकेपणानं आणि  प्रभावीपणानं मांडताना दिसत आहे. 
इतका प्रदीर्घ पल्ला गाठल्यानंतर तुमच्यातली  स्त्री आणि अभिनेत्नी पूर्णांशानं समाधानी आहे का?
-स्त्री म्हणून सांगायचं तर माझा मुलगा आता करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. मी आणि जयदेव आम्ही दोघांनी त्याला खूप प्रेमानं सांभाळलं. करिअरच्या वळणवाटांमध्ये दोघेही व्यग्र असतानासुद्धा ‘मुंबईत कुणीतरी एकानं असायला हवं.’ हा आम्हा दोघांमधला अलिखित नियम होता. त्यामुळे प्रसंगी आम्ही अनेक तडजोडीही केल्या आहेत.  त्यामुळे आज या टप्प्यावर एक गृहिणी म्हणून निश्चितच समाधान आहे. पण एक अभिनेत्री म्हणून म्हणाल तर मात्र  प्रत्येक कलाकार हा कायम असमाधानी असतो. आज पुरुषाची भूमिका साकारल्यानंतरसुद्धा आणखी काहीतरी वेगळं करायला मिळावं ही कलाकाराची भूक कायम असते. तशीच ती माझ्यात आजही कायम आहे. तोच माझ्या जगण्याचा श्वास आहे !

मुलाखत : पराग पोतदार 
(लेखक मुक्त पत्रकार आहे)

sweetparag@gmail.com

Web Title: The wish for doing diffrent to stay alive me- Rohini Hattangadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.