The wind came and she got pregnant? How is it possible? | वारा आला आणि ती प्रेग्नन्ट झाली?

वारा आला आणि ती प्रेग्नन्ट झाली?

- डॉ. गीता वडनप

‘वाऱ्याची एक झुळूक आली आणि मी प्रेग्नन्ट झाले. पुढच्या एका तासात मला बाळही झालं.’ - पंचवीस वर्षांच्या सिटी झानियाह या इंडोनेशियातील महिलेनं तेथील पत्रकारांना हे सांगितलं आणि ही बातमी जगभर व्हायरल झाली. इंडोनेशियातले पोलीसही या घटनेनं बुचकळ्यात पडले. इंडोनेशियातील पश्चिम जावातील सिआंजूर या शहरात राहणाऱ्या सिटीने सांगितल्याप्रमाणे ती त्यादिवशी तिच्या बैठकीच्या खोलीत आराम करत होती. तितक्यात एक वाऱ्याची झुळूक आली. पंधरा मिनिटानंतर तिच्या पोटात वेदना होऊ लागल्या. पोट मोठं होऊ लागलं. ती घाबरली आणि जवळच असलेल्या आरोग्य केंद्रात गेली. तिथे तिला बाळ झालं. तिच्या या विचित्र बाळंतपणाची गोष्ट क्षणात शहरभर पसरली. सोशल मीडियामुळे पुढे ती जगभर झाली.

 

आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सिटीची सामान्य प्रसूती झाल्याचं आणि बाळही चांगल्या वजनाचं असलेलं आढळलं. या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकाराचं वर्णन ‘क्रिप्टिक प्रेगनन्सी’ अर्थात गुप्त गर्भधारणा असं केलं आहे.

या प्रकारच्या गर्भधारणेत जोपर्यंत प्रसूती वेदना होत नाही तोपर्यंत महिलेला कळतंच नाही, असं या वैद्यकीय अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. या अजब प्रसूतीची बातमी पसरताच इंडोनेशियात अफवांचं पीक आलं. ते रोखण्यासाठी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी हाती घ्यावी लागली आहे. सिटीला आधीची एक मुलगी असून, ती तिच्या नवऱ्यापासून विभक्त राहते.

अर्थात जगभरातली ही काही पहिलीच घटना नाही. अशीच एक बातमी मागीलवर्षीही आली होती. इंग्लडमधील वेस्ट ससेक्स येथील एका महिलेचीही अचानक प्रसूती झाली होती. ३२ वर्षांच्या ग्रेस मीचिम या महिलेला आधीची दोन मुलं होती. पण तिसऱ्या गर्भधारणेचा तिला पत्ताच लागला नाही. शिवाय पोटही दिसत नव्हतं. तिने सांगितलेल्या माहितीनुसार ती गर्भनिरोधक गोळ्या नियमित घेत होती. तिला पाळीही नियमित येत होती आणि तरीही ती अचानक एका सकाळी प्रसूत झाली.

प्रसूतीच्या काही महिने आधी तिला पोटात काहीतरी ढेकळासारखं जाणवलं. तिला संशय आला म्हणून तिने गर्भधारणेची घरच्याघरी चाचणी केली पण ती नकारात्मक निघाली. ती पाच महिन्यांची गरोदर असेल तेव्हा ती डॉक्टरांकडेही गेली होती. तेव्हाही तिची चाचणी केली गेली पण तीही नकारात्मक आली. काही काळानं डॉक्टरांनी तिला तिच्या गर्भाशयात गाठ असल्याचं सांगितलं. तिची अल्ट्रासाऊंड तपासणी करण्याआधीच ती प्रसूत झाली.

या अशाप्रकारच्या घटना सामान्यांसाठी चमत्कारिक असल्या तरी वैद्यकीय क्षेत्रातल्यांना मात्र त्याचं अप्रुप नाही. या अशा घटना होतात, होऊ शकतात, असंच ते म्हणतात.

पण का होत असेल असं?                                                                                                

-----------------------------------------------------------------------------------------------

हे होतं कारण...

एखाद्या स्त्रीला आपण गरोदर आहोत हे प्रसूतीच्या कळा सुरू होऊन बाळ जन्माला येईपर्यंत लक्षात न येणं हे खरोखर शक्य आहे. हे असं घडलेलं मीही पाहिलेलं आहे. अर्थात यामागे चमत्कार नसून, शास्त्रीय कारणं आहेत.

- चारशे गरोदर बायकांमधील एका बाईला गरोदरपणातील जवळजवळ पाच महिने संपले असतानाही आपली गरोदरावस्था लक्षात आलेली नाही, असा एका संशोधनाचा निष्कर्ष आहे. २,५०० गरोदर बायकांमधील एखादी केस, प्रसूतीकळा येऊन बाळाचा जन्म होईपर्यंत लक्षात न आलेली प्रेग्नन्सी असू शकते.

गर्भधारणेदरम्यान होणारे अनेक बदल लक्षात का येत नसावेत, याची काही कारणं आहेत.

1. आई होण्याची मनाची तयारी नसेल तर ती स्त्री तीव्र नकाराच्या भावनेतून शरीरामध्येे घडणाऱ्या बदलांचा संबंध इतर गोष्टींशी जोडून सत्य स्वीकारण्यास नकार देते.

- जसं की माझ्यात अशक्तपणा असल्यानं माझी मासिकपाळी नियमित नाही.

- पित्त झालंय म्हणून उलट्या होत आहेत.

- अपचन झालंय, पोटात गॅसेस झालेयत म्हणून पोटाचा घेर वाढलाय आणि गॅसमुळे पोटात हालचाल जाणवते.

2. काही केसेसमध्ये गरोदरकाळातील लक्षणं (मळमळ, उलटी, थकवा, लघवीला वारंवार जावं लागणं) अजिबात दिसून येत नाहीत.

3. काही जात्याच स्थूल बांधणीच्या स्त्रियांमध्ये वजन वाढलेलं पटकन निदर्शनास येत नाही.

4. ताणतणाव, गर्भनिरोधक औषधांचं सेवन, स्थुलता, अनियंत्रित मधुमेह, पीसीओएस, चुकीची आहारशैली अशा अनेक कारणांनी मासिकपाळी अनियमित राहून गरोदरावस्था लक्षात येत नाही.

5. सामान्य गरोदरपणात २० टक्के केसेसमध्ये गर्भ-रोपण प्रक्रियेदरम्यान योनीमार्गातून थोड्या प्रमाणात रक्तस्त्राव दिसून येतो आणि अशा स्त्रीला आपली मासिकपाळी सुरू आहे, असं वाटून गरोदरावस्था लक्षात येत नाही.

6. किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक संबंध आल्यानंतर घरच्यांना कळू नये, यासाठी मासिकपाळी चुकलीय हे सत्य लपवून नियमित पाळी येतेय, असं दर्शविलं जातं. विवाहबाह्य संबंधांमध्येही प्रेग्नन्सी लपवली जाते.

 

7. चाळीशीच्या पुढील स्त्रियांमध्ये मासिकपाळी अनियमित असताना असुरक्षित शारीरिक संबंधामधून राहिलेली प्रेग्नन्सी दीर्घकाळापर्यंत दुर्लक्षित राहते.

8. बाळाच्या १८ ते २० आठवड्यांच्या वाढीनंतर आईला बाळाच्या हालचाली जाणवतात. पण प्लासेंटा जर गर्भाशयाच्या समोरील बाजूस असेल तर गर्भवतीला या हालचाली अतिशय मंद जाणवतात अथवा अजिबात जाणवत नाहीत.

9. काही मानसिक आजारांमध्ये उदा. बायपोलर डिसऑर्डर, सिझोफ्रेनिया यात गरोदरावस्था कळून येत नाही.

 

( स्त्रीरोग तज्ज्ञ)

geetawadnap@gmail.com

Web Title: The wind came and she got pregnant? How is it possible?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.