Why do young children put all things in their mouths? The reason is beyond starvation! | लहान मुलं सर्व वस्तू तोंडात का घालतात? भूकेच्यापलिकडे आहे याचं कारण!      

लहान मुलं सर्व वस्तू तोंडात का घालतात? भूकेच्यापलिकडे आहे याचं कारण!      


- डॉ. श्रुती पानसे

मुलं रांगायला लागली की कधी एका खोलीतून दुस-या खोलीत जातील, जिथे जातील तिथे काय करतील, काय तोंडात घालतील, याचा काहीच नेम नसतो. जमिनीवर पडलेला कसलाही बारीक तुकडा अगदी सहजपणो, कसलाही विचार न करता सरळ तोंडात जातो. सर्वात आवडती आणि तोंडात  घालण्याजोगी वस्तू कुठली वाटत असेल तर ती आहे चप्पल.
खेळायला कितीही रंगीबेरंगी खेळणी आणलेली असली तरी रांगत्या बाळाला आवडते ती चप्पलच. याचं कारण काय? बाकी सगळ्या वस्तू केव्हाना केव्हा तरी हाताळायला मिळतात. चमचे, वाटय़ा, खेळणी, बांगडी, पेन सर्व वस्तूंची चव घेऊन झालेली असते. पण चप्पल मात्र हाताळायला, डोक्यावर ठेवायला, फेकायला, खेळायला कधीच मिळत नाही. त्यामुळे त्या वस्तूविषयीची विशेष माहिती समजतच नाही. एखाद्या वस्तूविषयीची संपूर्ण माहिती मिळवणं हा तर मेंदूचा आदेश. मग तो आदेश कसा मोडायचा? अधूनमधून दिसणारी पण नेहमी लपवून ठेवली जाणारी जी काही वस्तू असेल ती बाळांना हवीच असते. चुकून काही क्षणांसाठी खाली ठेवलेली चप्पल बाळ पटकन जाऊन पकडतं. त्यातून कितीतरी प्रकारची माहिती बाळं मिळवत असतात आणि ही मिळालेली माहिती मेंदूतल्या विविध क्षेत्रांत साठवून ठेवत असतात. ही वस्तू जड आहे की हलकी, हिचा आकार असा का आहे, ही वस्तू आपटली तर काय होईल, फेकली तर काय होईल, याचा आवाज कसा येतो आहे, खडबडीत आहे की मऊ आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे तिची चव कशी आहे, एवढी सगळी माहिती मिळाली की मुलांचा  मेंदू खूश होतो.
त्यांच्या कुतूहल भावनेचं समाधान होतं. काही वस्तू  ‘पालकमान्य’ असतात; पण काही वस्तू ‘पालक अमान्य’ असतात. काही वस्तू हातात येतात ना येतात तोच कोणीतरी हिसकावून घेतं. आणि काही वस्तू नको असल्या तरी पुन्हा पुन्हा हातात दिल्या जातात. 
पंचेंद्रियांपैकी जीभ हा अवयवही अतिशय महत्त्वाचा असतो. लहान बाळालाही दूध, पाणी, साखर, औषध यांची वेगवेगळी चव समजते. नवीन औषध असेल तर ते घेताच चेह-यावर वेगळे भाव उमटतात. एखादा नवा पदार्थ चाटला तरी तो आवडला की नाही, हे बाळाच्या चेह-यावरून समजतं. चव आवडली तर हसून अजून द्या, म्हणून गोड मागणी होते. बाळ जन्माला आलं की त्याच्या जिभेला कधी पाण्याचा स्पर्श मिळतो, कधी दुधाचा. काहींना तर मधाचा स्पर्श मिळतो. इथूनच सुरू होतं त्याचं रसना नावाचं इंद्रिय. जन्माला आल्यापासूनच जिभेचं काम सुरू होतं ते अखंड चालू राहतं. पदार्थ थंड आहे, की गरम, गोड आहे, की तिखट, नवा आहे की जुनाच, बरा आहे की ठीक ही माहिती मेंदूला पोहचवली जाते. 
मुलं कोणत्याही वस्तू तोंडात टाकतात तेव्हा असं वाटतं की यांना भूक लागली असेल. पण जिभेचा संबंध सर्वस्वी खाणं, भूक, चव याच्याशी नसतो. तर स्पर्श संवेदनेशी असतो. म्हणून तर वस्तू हाताळून झाली की लगेच तोंडात घालायची असते. खूपशी मुलं हाताला लागलेलं  एखादं खूप मोठं खेळणंही तोंडात कोंबण्याचा प्रयत्न करत असतात. ते चाखून-चाटून बघण्याची ही धडपड असते. ही नवी दिसलेली वस्तू कोणती, तिचा आकार कसा आहे, स्पर्श कसा आहे, तिचा आवाज कसा आहे, ती वस्तू हलते आहे का, याचा त्याला त्याच्या परीनं शोध लावायचा असतो. हातानं स्पर्श करून अनेकदा जिज्ञासा पूर्ण होत  नाही म्हणून जिभेनंही स्पर्श करावासा वाटतो. या कुतूहलापुढे बाळांना स्वच्छता वगैरे काहीही कळत नाही. कितीवेळा खेळणी धुवून, गरम पाण्यातून काढून ठेवली जातात. पण बाळाला या कष्टाचं काहीही पडलेलं नसतं. कितीदा तरी खेळणी जमिनीवर लोळून तोंडात जातात.
जिभेनं स्पर्श करून बघण्याच्या मुलांमधल्या या कुतूहलाचा उपयोग करून घेऊन मुलांना जिभेद्वारे वेगवेगळ्या चवी चाखायला देणं हे करता येतं. काही आवश्यक चवींची सवयसुद्धा याच वयात सहज लागू शकते. अनेक घरांमध्ये मुलांना गोड चव आवडते, मुलं लगेच संपवतात म्हणून प्रत्येक पदार्थ गोड करून देतात. दुधात, वरणभातात, खिचडीत, अगदी पाण्यातसुद्धा साखर घालून देतात. जर अशीच सवय लागली तर मुलांना सर्व चवी खाण्याची सवय लागणं अवघड जातं. गोळ्या, चॉकलेट्स यांची सवय लागत ती यामुळेच! मुलांना त्याच त्या चवींची सवय आपणच लावलेली असते. चवीच्या संवेदना जागृत करण्याचं काम जीभ करते. या वयात मुलांना विविध चवींचे अनुभव देणं हे पालकांचंच काम आहे.


(लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)

ishruti2@gmail.com

 

                                                                                                                                                      
 

Web Title: Why do young children put all things in their mouths? The reason is beyond starvation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.