Why do we avoid talking about breast feeding? |  ‘आईचं दूध’ हा महत्त्वाचा विषय आपण बोलायला का टाळतो?

 ‘आईचं दूध’ हा महत्त्वाचा विषय आपण बोलायला का टाळतो?

-    ओजस सु. वि. 

लॉकडाऊनच्या काळात असंघटीत कामगार वर्गाचं जे प्रचंड मोठं स्थलांतर झालं त्यावेळचा एक फोटो पाहिला होता. कबिल्यासह मैलोनमैल चालत निघालेली एक बाई झाडाच्या सावलीत बसली आहे, तिच्या   घामेजलेल्या चेह-यावर थकवा, उन्हामुळे आलेला शीण दिसतो आहे. पण  त्या झाडाच्या सावलीत बसून तिच्या छोट्या मुलीला ती दूध पाजते आहे.  तो फोटो बघून हृदय पिळवटून गेलं. कदाचित कित्येक दिवस ती  उन्हातान्हाची लेकराला कडेवर घेऊन चालत असेल, उपाशी असेल, नाकारलेपणाची सल घेऊन चालत असेल. पण या सा-या प्रतिकूलतेतही ती तिच्या बाळाला तिच्यातलं सर्वोत्तम ते देत होती. त्या स्तनपानातून बाळाला सर्वोतम शुद्ध अन्न, औषधी आणि माया मिळत असणार. आईच्या सोबत असल्यामुळे बाळ सुरक्षित होतं. 
‘आईचं दूध’ हे निसर्गानी निर्मिलेलं एक जादुई रसायन आहे,  जे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत पिल्लाला जगवतं, टिकवतं. आईचं दूध हे केवळ अन्न नाही तर अनेक सूक्ष्मजीवांपासून बचाव करणारी लस आहे.  स्तनपान म्हणजे केवळ ‘आईचं दूध’ एवढंच नाही, तर त्याला अनेक आयाम असतात,  जे बाळाच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक जडणघडणीसाठी महत्वाचे असतात. स्तनपानाच्या नाट्यमय सुंदर घटनेमध्ये आई- बाळ मुख्य भूमिकेत असतात. त्याचसोबत बाळाचे वडील, आजी- आजोबा, कुटुंब- परिवार यांचाही महत्वाचा सहभाग असू शकतो. असावा. सुयोग्य स्तनपानात पुढच्या पिढीला सुदृढ, आरोग्यवान, बुद्धिमान बनवण्याची शक्ती आहे.  या दृष्टीनं समाजाचीही भूमिका असते.‘स्तनपान सल्लागार’ या नात्यानं मी जेव्हा नवीन आई- बाबा- परिवार यांच्यासोबत काम करते तेव्हा लक्षात येतं की ‘आईचं दूध’ नामक अमृत आपण समाज म्हणून पुरेसं समजूनच घेतलेलं नाही. अनेकांच्या मते तो दुर्लक्ष करण्याचा किंवा झाकून ठेवण्याचा किंवा ‘फक्त बायकांचा’ विषय असतो. बाळाच्या जन्मापर्यंत आईला स्तनपान या गोष्टीची पुरेशी माहितीच नसते. अनेक दवाखान्यांमधे ‘स्तनपान सल्लागार’ नसतात. आईच्या आजूबाजूला असणा-या लोकांच्या धारणांवर नव्या आईचं स्तनपान ठरतं. खरंतर स्तनपानाविषयी प्रत्येक होऊ घातलेल्या पालकांना पुरेशी माहिती असायला हवी. 

दूध नव्हे एक जादूई रसायन
आईचं दूध बाळासाठी संपूर्ण पोषक आहार आहे. आईच्या चमचाभर दुधात पोषक अन्न, प्रतिजैविकं, संसर्गरोधक, दाहरोधक, प्री बायोटिक, प्रो बायोटिक मित्र जिवाणू, संप्रेरक, स्टेमसेल्स असलेल्या कोट्यवधी पेशी असतात. आईच्या दुधात कबरेदकं, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व आणि पाणी याचं बाळासाठीचं ‘बेस्ट पॅकेज’ असतं. बाळ जसजसं मोठं होतं तसं आईचं दूधही ‘मोठं’ होतं. मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांच्या आईच्या दुधाचे घटक वेगळे असतात; पहिल्या पाच दिवसाच्या दुधाचे (कोलोस्ट्रोमचे) घटक वेगळे    असतात; तर मूल मोठं झाल्यावर त्याच्या बदलत्या गरजांनुसार दुधाचे घटक बदलतात. बाळ आजारी असेल तर त्याच्यासाठी औषधी ठरणारे ‘दाहविरोधक’ दुधात तयार होतात. आई आजारी असेल तर तिच्यात  तयार होणा-या ‘अँण्टिबॉडीज’ दुधात उतरतात आणि बाळाचं त्या आजारापासून रक्षण होतं. इतकंच नाही तर वातावरणात असणा-या   रोगजंतुंविरोधी अँण्टिबॉडीजही आईच्या दुधात तयार होतात आणि बाळाला मिळतात. आईचं दूध हे बाळाचं संरक्षक कवच असतं. आयुष्याचे किमान पहिले सहा महिने बाळ केवळ आईच्याच दुधावर वाढतं. दोन वर्ष वयाचं होईपर्यंत बाळाला लागणारी रोगप्रतिकार शक्ती आईच्या दुधातून मिळते. पहिली तीन वर्षे बाळाच्या मेंदूची वाढ सर्वात वेगानं होत असते. आईच्या दुधात ‘टॉरिन’ नावाचं प्रथिन असतं जे मेंदू विकासात महत्वाची भूमिका बजावतं. नव्या संशोधनानुसार, वयाच्या दोन वर्षापर्यंत किंवा अधिक आईचं दूध प्यायलेल्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता विकास अधिक दिसून येतो. 

मोफत म्हणूनच दुर्लक्षित
सध्या आरोग्य हा जागतिक ऐरणीवरचा मुद्दा बनलाय. आरोग्यविषयक संशोधन ही अरबो डॉलरची इंडस्ट्री आहे. समजा, अशाच एखाद्या कंपनीनं जर असं उत्पादनं शोधलं की- ‘जे अतिशय कोवळ्या पचनसंस्थेला पौष्टिक आणि चविष्ट अन्न देतं; प्री बायोटिक, प्रो बायोटिक मित्र जीवाणू देतं;  रोगप्रतिकारक शक्ती देतं; अगदी बाळाच्या मागणीनुसार नेहमी ताज्या आणि योग्य तेवढ्याच पोषणाचा पुरवठा करतं आणि कायम ‘रेडी टू इट’ असतं.’ अशा कंपनीचे शेअर्स किती वाढतील! असं शोधणा-या वैज्ञानिकाला नोबेल पारितोषिक नक्की! गेली दीडशे वर्ष असं उत्पादन तयार करण्याचा प्रयत्न मोठमोठाल्या बहुराष्ट्रीय कंपन्या करत आहेत. पण आजपर्यंत असं उत्पादन कोणीही बनवू शकलेलं नाही. फक्त एक व्यक्ती अपवाद.  ती म्हणजे नवजात अर्भकाची आई! 

आईचं दूध आजवर कोणत्याही फॉर्म्युला कंपनीला बनवता आलेलं नाही. पण तरीही या कंपन्या एका वर्षात दशअब्ज डॉलर चा धंदा करतात. नुकतेच बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी नवीन फॉर्म्युलाच्या संशोधनासाठी 35 लाख अमेरिकन डॉलर्स गुंतवले अशी बातमी वाचली. फॉर्म्युलाच्या जाहिराती इतक्या चमकदारपणे आदळत असतात की अगदी गरीब घरातली माणसंही बाळासाठी हजारो रु पये खर्च करतात. फुकट मिळणा-या गोष्टीचं मोल दुर्दैवानं आपल्याला कळत नाही. आईचं दूध फुकट मिळतं; परंतु ते अनमोल आहे. हे सर्व संस्कृतीतलं पारंपरिक ज्ञान तर आहेच शिवाय आजचं विज्ञानही हेच सांगतं.  यासोबतच स्तनपानाची प्रक्रि याही बाळाच्या वाढीत महत्वाची आहे. तान्ह्या बाळासाठी आईची छाती हे दुसरं घर आहे.  

---------------------------------------------

कोरोना आणि स्तनपान  
 कोरोना या वणव्यासारख्या पसरणा:या महामारीमध्ये बाळांना   स्तनपान मिळणं अत्यंत महत्वाचं. वातावरणात जे सूक्ष्मजीव असतात त्यांच्याविरु द्ध लढणा-या‘अँण्टिबॉडीज’’ आईच्या शरीरात तयार होतात. त्या दुधातून बाळाला मिळतात. कोरोनातून ब-या झालेल्या आईच्या आणि बाळाच्या शरीरात कोरोना अँण्टिबॉडीज आढळून येतात. आईच्या दुधात कोरोनाचे विषाणू आढळून येत नाहीत. याकाळात दोन वर्षाखालच्या मुलांना जरूर स्तनपान करावं. 
 शक्यतो आई- बाळाला कोरोनाच्या कोणत्याही संसर्गापासून दूरच ठेवावं.  आईला कोरोनाचं संक्र मण झालं असेल तरी तिनं योग्य ती स्वच्छता पाळून (हात धुणं, मास्क लावणं) बाळाला स्तनपान करावं. बाळाला शक्य तेवढा वेळ  छातीपाशी धरावं. आई आजारी असेल तरी सर्व स्वच्छता पाळत तिचं दूध काढून बाळाला पाजावं, दर दोन तासांनी स्तनपान करत राहावं- असं जागतिक आरोग्य संस्था सांगते. आईच्या दुधाचा अँण्टिबॉडीज येत असल्यामुळे  त्याचा प्रत्यक्ष लस म्हणून वापर करता येईल का, यावर संशोधन सुरू आहे.  

 

(क्रमश:)


(लेखिका वर्धा येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये स्तनपान सल्लागार म्हणून काम करतात.)

meetojas@gmail.com

 

 

    

Web Title: Why do we avoid talking about breast feeding?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.