Why do humans become refugees? | माणसं रेफ्युजी का होतात?

माणसं रेफ्युजी का होतात?

-शुभांगी जगताप गबाले

 व्यवस्थेतली, समाज-समुहातली असहनीय अनागोंदी  माणसाला  टोकाचं हतबल करत  त्याची मूळ जागा, मूळ गाव, मूळ देश सोडायला भाग पाडते तेव्हा ती स्थलांतरं  निष्ठूर अन अपार सक्तीची होऊन जातात. सक्ती अशी की उखडलेपणातले नवनवे सल पुरवत अव्याहत अस्थिरता भोगायला लावणारी.

या वास्तवाचा थेट संबंध वंश, धर्म, प्रांत अन हद्दींचा भेसूर नाद आळवणा-या रक्तपिपासू भाषेशी आहे. प्रत्येक राष्ट्राच्या भूमीत आज ती अधिक अधिक प्रखर होते आहे.  माणसाचा इतिहास - वर्तमान लालर्जद  करणारी ही भाषा जितकी विद्वेषी, एकारलेली त्याहून कैकपटीनं मानवतावादाला विद्रूप बनवणारी.  अस्तित्त्वाच्या शोधात देशोदेशीच्या सरहद्दींशी  झुंजणारा रेफ्युजी नामक समूह जन्माला घालणारी भाषादेखील हीच आहे.  
       

साल 2015.  अँलन कुर्दीचा चिमुकला निष्प्राण देह कॅमे-यानं कैद करेपर्यंत रेफ्युजी शब्दाचा शब्दश: उलगडाच बहुतेकांना झाला नव्हता.  प्रस्थापित माध्यमांनाही तो खोलातून कधी करावासा वाटला नव्हता.  हेच तर प्रयोजन नसेल फोटो क्लिक करून व्हायरल  करणा-या त्या हातांच?   रेफ्युजी जगातली असहाय खळबळ अँलनच्या फोटोतून अंगावर येऊन थडकली. त्याच्या जन्मदात्याच्या श्वासातल्या  उलघालीपर्यंत पोहोचणं तर आवाक्यातलच नाही आपल्या..   युद्धांचे आखाडे, त्यातली क्रूरता,  सक्तीच्या स्थलांतरातल्या जीवघेण्या जोखमी,  चिरडली जाणारी माणसं अन माणुसकी..    सगळंच या फोटोनं ठाशीव केलं.  कॅप्शनच्या अवाक्षराशिवाय.. 
यू. एन. रेफ्युजी एजन्सीचा अहवाल म्हणतो, जगभरातल्या कुठ्ल्या न कुठल्या कोप-या त दर दोन मिनिटाला एक व्यक्ती या ना त्या वाताहतीला सामोरी जात बळजबरीनं विस्थापित होते आहे. या घडीला  विस्थापनाचा हा आकडा 70.8 मिलियनवर पोहोचलेला आहे. पैकी 25.9 मिलियन लोक निर्वासित आहेत. उजाडत्या दिवसासोबत रोज ही संख्या  नव्या आकड्यानिशी वधारते आहे.  सरहद्दींच्या अल्याडपल्याड बहुसंख्य समाज अशी निर्वासितपणातली फरफट सोसत जगतो आहे. 

साध्यासुध्या आयुष्यातून उठून रेफ्युजीपणात ढकललं जाणं म्हणजे नेमकं काय? कशी जगतात माणसं निर्वासित बनून? का ओलांडतात सरहद्दी जिवावर उदार होऊन ? कायम एका सुरक्षित कोशात जगणा-या  आपल्या प्रिव्हिलेज्ड जगाच्या मनात क्वचितच हे प्रश्न उमटत असावेत. सर्वस्व मागे टाकून  निर्वासितपणातल्या  खस्ता खात आयुष्य काढणं हा हाडामांसाच्या व्यक्तीचा चॉईस कसा असू शकेल? 
  ‘नो वन लिव्हज होम अनलेस होम इज अ माउथ ऑफ अ शार्क. नो वन पुटस देअर चिल्ड्रन इन अ बोट अनलेस वॉटर इज सेफर दॅन द लॅण्ड’
अर्थात घर सोडून जात नसतं कुणी, जोवर ते घर शार्कच तोंड बनून जात नाही. पोटच्या लेकरांना होडयामध्ये घालत नाही कुणी, जोवर वाटत नाही त्यांना जमिनीपेक्षा पाणी सुरक्षित.
       वॉर्सन शायरच्या   ‘होम’ या कवितेतल्या या काही ओळी. वरच्या प्रश्नांना नेमकी अन तितकीच भेदक उत्तरं पुरवणारी ही कविता निर्वासितांच्या दुनियेतला सगळा विखार अचूकपणे चिमटीत पकडते. माणसाचं  जिवंतपण दावणीला बांधून त्यांना हतबल करून सोडणार्‍या जागोजागच्या उन्मादी व्यवस्था, कट्टरतावादी वृत्ती-प्रवृत्ती आपला भोवताल सोलून काढतायेत या निष्ठूर वास्तवाचा सूक्ष्म कवडसा ही कविता आपल्या हातावर ठेवते. आपल्या आतला सल जागा करून जाते. 

 जिवंत वस्त्यांचे, भरल्या घरांचे ढिगारे मागे टाकत, अंगावर येणा-या  बंदुकीच्या फैरी चुकवत, जीवावर उठलेल्या हाताना हुलकावण्या देत मैलोनमैल चालून, कुठकुठल्या वाहनातून ही माणसं जेव्हा जीवघेण्या बोटीवर पुढचं आयुष्य सोपवून देतात, तेव्हा तिथूनच त्यांचा रेफ्युजी बनण्याचा प्रवास सुरू झालेला असतो. या कसरतीसाठीची अटळ आर्थिक गणितं न जुळवू शकणारी मात्न आसपासच्या निर्वासित छावण्याचा आधार घेतात किंवा मागे राहून आहे त्या परिस्थितीला मुकाट शरण जात राहतात. 

एका सिरियन डॉक्टरच्या कुटुंबात त्याची दोन लहानगी शाळेत जाणारी. त्यांची आई तिस-यादा प्रेग्नण्ट. नाना आजाराना तोंड देऊन खचलेले म्हातारे आई-बाप. एका रात्री बॉम्ब हल्ल्यात शेजारची भलीमोठी हवेलीवजा इमारत कोसळली अन या कुटुंबाच्या जीवाचा थरकाप उडाला. दोन लहानगी अन येणारा तिसरा जीव या धुमसत्या वातावरणात शाबूत कसे ठेवायचे म्हणून आई-बापाची झोप उडाली. त्यांनी घर सोडायचं ठरवल.  याआधी स्वप्नातही असा विचार न केलेल हे कुटुंब राहतं घर, रक्ताची माणस सोडून देशाबाहेर पडताना कासावीस होत राहिली. अनेक दिवसांच्या सलग प्रवासातला असह्य  ताण, खाण्यापिण्याचे  हाल अन अचानक उठून एका अनोळखी मुलखात आल्याचा मानसिक आघात यातून हे  नवरा-बायको यूकेला पोचल्यापासून भयंकर डिप्रेशनचा (ढळरऊ) सामना करत आहेत. इथल्या जगात फिट होण्यासाठी धडपडत आहेत.  

 इरिट्रियाचा अहमद सांगतो, तिथल्या वांशिक गटातला वाद विकोपाला गेला अन त्यातले काही लोक अहमदच्या जीवावर उठले. जिवंत रहायचं तर देश सोडून जा म्हणून त्याच्या कुटुंबानं, मित्रांनी त्याला विनवलं अन अहमदनं अखेर घर सोडलं.  अनेक आठवडे पायी चालत त्यानं  बॉर्डर क्रॉस केली. नंतर इटलीला पोचून  युरोपातले इतरही देश-प्रदेश पालथे घालत काही महिन्यांनी तो फ्रांसला पोचला. उपासमार सोसत, ब्रेड -  पाण्यावर  दिवस ढकलत. हातपाय आखडायला लावणारं बर्फाळ वातावरण सहन करत. फ्रांस-युकेच्या हद्दीवर असलेल्या  कॅले रेफ्युजी कॅम्पमध्ये तो वर्षभर राहिला. अखेर  संधी मिळताच तिथून तो यूकेमध्ये आला. कॅलेमधून इंग्लिश टनेल त्यानं कसा क्रॉस केला हे मात्र   तो सांगायचं टाळतो. बेकायदेशीर तत्त्वांच्या चौकटीत येणारे ते डिटेल्स त्याला सांगायचे नसतात. पण वाचून, ऐकुन माहित झालेल्या स्टोरीजमधून मी अंदाज बांधू पाहते. सात वर्षं झाली तो युकेला येऊन अजूनही त्याचा असायलम क्लेमचा दावा सुरूच आहे. तो सांगतो, त्याच्या असं अचानक घर सोडून जाण्यानं त्याची आई अतिशय खचून गेलीय . त्यातूनच ती सतत आजारी असते आणि हा मात्र  इथल्या चक्रात अडकून पडलाय. 
 जीवाचा धोका पत्करून बॉर्डर क्रॉस केल्यानंतर पुढचे पेचही तितकेच जटील, जगणं वेठीस धरणारे. काफ्कासेक म्हणवल्या जाणार्‍या  युकेच्या निबर यंत्र णेपुढे कागदपत्नं नि पुरावे सादर करता करता या लोकांची उभी हयात निघून जाते. कायद्यानं आसरा मिळण्याकरता हद्दी पार करणार्‍या प्रत्येकाकडे एक कन्हविन्सिंग स्टोरी असावी लागते. सगळ्यानाच ती सांगता येते असं नाही. या यंत्रणेच्या चिवट चक्रात पिसत राहण्याखेरीज त्यांना मग पर्याय उरत नाही. 

झांबियाची एकजण तिथल्या वांशिक छळापायी एका रात्रीत घर सोडून नव-या सोबत बाहेर पडली. 18 वर्षांपूर्वी  इथे युकेला आली.  अर्ध्या वयात. दोन वर्षात आजारपण असह्य होऊन नवरा गेला. मागे राहिलेल्या घराचा, लोकांचा संपर्क तुटला. साठी ओलांडलेलं शरीर घेऊन ती आता एकटीच राहतेय. शिक्षण, कागदपत्रं सगळ्याचाच अभाव. त्यासाठीची धावाधाव करण्याचे त्नाणही आता तिच्यात नाहीत. काही संस्थांच्या मदतीनं तिचा रोजचा दिवस आज तरी पार पडतोय. तिन स्टेटसची वाट बघणं देखील सोडून दिलय. 
अशीच घाणाची अँन्ड्रियाही 15 वर्षांपूर्वी इथं आली. चौतिसाव्या वर्षी. आज पन्नाशीला आली तरी अजून या देशानं तिला स्वीकारलेलं नाही. क्लेममागून क्लेम अन कागदपत्रांची जुळवाजुळव इतकंच तिचं आयुष्य बनून राहिलंय. सतत शहरं, ठिकाणं, शेअरिंगमधली घरं बदलण्याची कायदेशीर सक्ती सोसत ती दिवस काढते आहे. पोटाच्या त्रासावर, हाय ब्लड प्रेशरसाठी रोज औषधं घेते आहे.   ‘माझं सगळं आयुष्य या स्टेटसची वाट बघण्यात निघून गेलं. खर्‍या अर्थानं जगायला कधी मिळालंच नाही ’, असं ती नेहमी म्हणते. 

अल्बानियाची एकजण दोन मुलांना घेऊन गेली सहा वर्षे इथे आहे. नवरा जर्मनीत. दोघांनी वेगवेगळा क्लेम केलाय. ज्या कुणाला आधी रेफ्युजी स्टेटस मिळून जाईल तिथे मग दुसर्‍यानं  रियुनाइट व्हायचं असा साधा हिशेब. पण दोघेही दोन्ही देशात सहा वर्षं झाली तरी स्टेटस मिळण्याची वाट बघत जगतायेत. अन एकमेकांसोबत जगता येण्याचीही. युके - युरोपची हद्द ओलांडणं दोघांच्याही अवाक्याबाहेरच. कायदा अन आर्थिक दोन्ही दृष्टीनं. तिष्ठत जगण्याची अपरिहार्यता झेलत अशी अगणित कुटुंब तुकड्यातुकड्यात जगत आहेत. रक्ताच्या, प्रेमाच्या माणसांपासूनचं तुटलेपण सोसत जगणं ही निर्वासितपणातली सगळ्यात मोठी भळभळ. जगणं जगू न देणारी. 
 सालोसाल असायलमच्या चक्रव्युहात फसलेल्या  कित्येक निर्वासित दोस्ताना आयुष्य मुठीतून कधी सरून गेलं,  तरूणपण ओसरून म्हातारपण केव्हा सुरू झालं हे उमगतही नाही. केवळ क्लेम पास होण्याची, इंटरव्ह्यु क्लिअर होण्याची, सवलतीतून मिळणारी रक्कम क्रेडीट कार्डवर वेळेत जमा होण्याची, स्टेटस मिळण्याची वाट बघण्यात अन कागदपत्रांची चळत सांभाळतच त्यांचं आयुष्य हाताला निश्चित असं काही न लागताच रिकाम्या श्वासांनी फक्त पुढे सरकत राहतं. वाढत्या वयाच्या बेरजा करत. या कुणाहीसोबत बोलताना, गप्पा मारताना त्यांच थांबून राहिलेलं आयुष्य, डोळ्यात अडकून पडलेली स्वप्नं, इरादे हे सारं तीव्रतेनं जाणवत राहतं.  कधी कुठेशी ऐकलेली ही ओळ या दोस्तांच्या संदर्भात उगाचंच आठवू लागते मग - जिंदा तो हू पर जिंदगी तेरी तलाश मे हु मै!

( लेखिका इंग्लंडमध्ये वास्तव्याला असून निर्वासितांसाठीसाठी काम करणा-या संस्थेशी संलग्न आहेत. ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिध्द होईल)

shubhangigabale@rediffmail.com

Web Title: Why do humans become refugees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.