Why didn't she speak that time? |  ती तेव्हाच का नाही बोलली?

 ती तेव्हाच का नाही बोलली?

-गौरी पटवर्धन

“ती तसलीच असणार…” “नाहीतर काय… सारखी पुरुषांशी बोलत असते.”

“मी सांगतो, सगळं दोघांच्या संमतीने झालं असणार आणि ही बाई नंतर त्याच्यावर आरोप करते आहे.”

“तिच्याचकडे कसे काय सगळे जण कायम बघत असतात? ती काय एकटीच सुंदर आहे की काय संपूर्ण ऑफिसमध्ये ? ”

“समजा ती म्हणते ते खरं असेल, तिच्यावर अत्याचार झाला असेल, तर तिने तेव्हाच का नाही सांगितलं ? इतके दिवस, महिने , वर्षं का गप्प बसली?”

- कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक आयुष्यात यातलं किमान एक वाक्य प्रत्येकाच्या कानावर पडतंच, आणि किमान एका स्त्री बद्दल या प्रकारची चर्चा रंगतेच. त्या चर्चेत सहभागी होणारे लोक त्यांच्या त्यांच्या माहितीप्रमाणे, आकलनाप्रमाणे आणि वकुबाप्रमाणे त्यात सहभागी होतात. काहीजण चवीने चर्चा करतात, काहीजण त्या बाईची बाजू मांडतात तर काहीजण अशी चर्चा करण्याला विरोध करतात. पण या सगळ्यात एक बाब समान असते, ती म्हणजे ही सगळी चर्चा कायमच ‘त्या स्त्री भोवती’ फिरते.

तिचं वागणं, तिचे कपडे, तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं कॅरेक्टर… सगळी चर्चा फक्त आणि फक्त त्या व्हिक्टिमचीच होते. त्यातला जो आरोपी आहे त्याची चर्चा फार थोडी होते. वर्षानुवर्षं तर या लैंगिक अत्याचाराच्या कहाण्या गॉसिप केल्यासारख्या दबक्या आवाजात चघळल्या जायच्या. मीटू मूव्हमेंटने हा विषय चव्हाट्यावर आणला. त्याबद्दल घरीदारी, ऑफिसमध्ये, बसस्टॉपवर, कट्ट्यावर उघडपणे चर्चा सुरू झाली. त्यात आलेली फिर्यादी आणि आरोपी दोघांची नावं इतकी मोठी होती, की कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं ते लोकांना कळेना. आणि मग अशा वेळी होतं तेच हळूहळू व्हायला लागलं... ते म्हणजे व्हिक्टिम ब्लेमिंग! जी गुन्ह्याची शिकार झालेली आहे, तिलाच (क्वचित अपवाद म्हणून इथे तो ही असू शकतोच) दोष देणं!

कारण लैंगिक अत्याचारांच्या बाबतीत त्या अत्याचाराला बळी पडलेल्या व्यक्तीलाच शिक्षा करण्याची आपल्याकडे सर्वमान्य पद्धत आहे. आपण जर आपल्या आजूबाजूच्या घटनांकडे बघितलं तर आपल्या लक्षात येतं, की अशा बाबतीत दोष व्हिक्टिमलाच दिला जातो.

एखाद्या मुलीने जर आपल्याला रस्त्यात मुलं त्रास देतात अशी तक्रार केली तर त्यावर काय काय घडतं?

“तुलाच कशी त्रास देतात? इतर मुलींना कशी देत नाहीत? तुझ्याच वागण्यात काहीतरी गडबड असेल.”

“मुलांनी त्रास द्यावा असे कपडे आपण घालावेत कशाला? ओढणी नीट घेत जा.”

“आपण लक्ष द्यायचं नाही. काही दिवसांनी आपोआप बंद होईल.”

“तू इतक्या उशिराची बॅच घेतलीसच कशाला? ”

“दुसरीकडून जात जा. ती मुलं बसतात त्याच रस्त्याने कशाला जायचं आपण? ”

- यापेक्षा विषय वाढला, तर त्या मुलीच्या कपड्यांवर, मैत्रिणींवर निर्बंध येतात. तिचा क्लास बदलला जातो. तिचं कॉलेज बंद केलं जातं. आणि तरीही विषय वाढला तर तिचं लग्न लावून दिलं जातं. आणि हे सगळं करणारे लोक शहाजोगपणे आपापसात चर्चा करतात, की त्या बाईला एवढा त्रास होत होता तर ती वेळेवर का नाही बोलली ?

कशी बोलेल ती? आणि काय सांगेल? तिने काही सांगितलं तर लोकांना लगेच डिटेल्स हवे असतात.

“त्याने माझ्या अंगाला मी नकार दिल्यानंतरही हात लावला.” हे लोकांच्या मते पुरेसं सेक्शुअल हॅरेसमेंट नाहीच्च. कुठे लावला? कसा लावला? हळूच हात लावला? की चिमटा काढला? तेव्हा ती काय करत होती? तो काय करत होता? ते दोघं कुठे होते? जिथे होते? तिथे ते का होते? ती का त्याच्याबरोबर होती? ती एरवी कोणाकोणाबरोबर असते? - अशा असंख्य प्रश्नांना उत्तरं देऊन तिला तिची बाजू ठामपणे मांडावी लागते. आणि ती मांडून झाली की पुढचा सगळ्यात खतरनाक प्रश्न येतो… पुरावा काय ?

त्याने माझ्या अंगाला हात लावला.

तो माझ्याकडे बघून घाण हसला.

तो मला काहीही काम नसतांना उगीच केबिनमध्ये बोलावून घेतो आणि न्याहाळत बसतो.

त्याने मला धमकी दिली आहे की मी त्याला पाहिजे ते केलं नाही तर तो माझी नोकरी टिकू देणार नाही.

- या सगळ्याला पुरावा कुठून आणायचा? आणि मग पुरावा नाही म्हणजे त्या घटना घडल्याच नाहीत असं गृहीत कसं धरायचं? मीटू मूव्हमेंटवर झालेला सगळ्यात मोठा आरोप म्हणजे “या बाया तेव्हाच्या तेव्हा का नाही बोलल्या?”- त्याचं हे उत्तर आहे. कारण या विषयावर तेव्हाच्या तेव्हा बोलता येईल अशी सामाजिक परिस्थिती आपल्याकडे नाही. त्यात भर म्हणून ‘पुरुष म्हटल्यावर असं करणारच’ हे आपल्याकडे बहुसंख्यांना मान्य असतं. त्यात काही चुकीचं आहे हे त्यांना समजून घ्यायचंच नसतं. कारण ही मंडळी या पुरुषप्रधान संस्कृतीचे अनेक वर्षं फायदा घेतलेले लाभार्थी असतात. ते कशाला त्यांचा फायदा इतका सहजी सोडतील ?

या पार्श्वभूमीवर एखाद्या महिलेने लैंगिक अत्याचाराच्या घटनेबद्दल पुढे येऊन बोलणं फार सोपं नसतं. स्वतःच्या सोडा, दुसऱ्या कोणाच्यातरी बाबतीत घडलेल्या घटनेबद्दल बोलणं देखील सोपं नसतं. आपल्यापैकी बहुतेक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी किमान एकदा कोणातरी पुरुषाला महिलेकडे बघून हातवारे करतांना, गर्दीत तिच्या अंगाला हात लावताना बघितलेलं असतं. पण त्याबद्दल आपण कधीच बोलत नाही. का ?

कारण ते सोपं नसतं. मग अशा वेळी तिने तेव्हाच बोलायला पाहिजे होतं या म्हणण्याला कितपत अर्थ उरतो? पत्रकार प्रिया रामाणी हिने ख्यातनाम संपादक, तत्कालीन केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्याविरुद्ध मिटू आंदोलनाच्या दरम्यान लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. एम. जे. अकबर यांनी प्रिया रामाणी यांच्यावर भरलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यातून रामाणी यांना निर्दोष मुक्त करताना आता कोर्टाने देखील हे मान्य केलं आहे, की एखादी स्त्री केवळ त्या वेळी बोलली नाही म्हणून तिचा त्या घटनेविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार नाहीसा होत नाही.

पुरुषांनी महिलांवर केलेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याच्या लढाईला या निर्णयाने बळ मिळालं आहे यात काहीच शंका नाही.

---------------

‘‘बोलण्य’’चं बळ पुरुषांनाही मिळो !

न्यायालयाने दिलेल्या या निकालाचा आनंद मानताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे, की अशा अत्याचारांचे बळी पुरुषही असू शकतात आणि त्यांच्यावर अत्याचार करणारी व्यक्ती स्त्री असू शकते तशी पुरुषही असू शकते. लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या पुरुषांच्या कथा ही संपूर्णपणे झाकली मूठ आहे. त्यांनाही या निर्णयातून पुढे येऊन बोलण्याचं बळ मिळो आणि न्यायाचा रस्ता उत्तरोत्तर असाच रुंदावत जावो!

( लेखिका मुक्त पत्रकार आहे .)

patwardhan.gauri@gmail.com

Web Title: Why didn't she speak that time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.