Who put the burden of the wrong idea of multitasking on women's heads? | मल्टिटास्किंग या चुकीच्या संकल्पनेचं ओझं बायकांच्या डोक्यावर कोणी ठेवलं?
मल्टिटास्किंग या चुकीच्या संकल्पनेचं ओझं बायकांच्या डोक्यावर कोणी ठेवलं?

- माधुरी पेठकर 

स्रिया या  ‘मल्टिटास्कर’ असतात असं कायम म्हटलं जातं. एका वेळेस अनेक कामं करण्याची क्षमता फक्त स्रियांमध्ये असते असं गौरवानं म्हटलं जातं. या एका क्षमतेमुळे सुपर वुमन नावाची कल्पना जन्माला आली आणि या कल्पनेनं अनेकींना वेड लावलं. एकाच वेळेस मूल सांभाळणं, घरातली कामं करणं, ऑफिस सांभाळणं अशा सुपर वुमनचं चित्रं अनेकदा पहायला मिळतं; पण हे चित्रं म्हणजे स्रियांवर केवळ अन्याय आहे, असा एक  जर्मन अभ्यास सांगतो. 
जर्मन अभ्यासकांनी केलेला अभ्यास सांगतो की, स्रिया या मल्टिटास्कर नसतात. उलट एकाच वेळेस अनेक कामं केल्यानं कामात चुकाच जास्त होतात. हा अभ्यास सांगतो की, स्रिया असू देत नाहीतर पुरुष, खरं तर कोणीच मल्टिटास्कर नसतं. माणूस मग ती स्री असो की पुरुष त्यांना एका कामातून दुस-या कामात जाणं पटकन जमतं. एकामागोमाग एक काम करणं जमतं; पण हे एकामागोमाग एक काम करणं म्हणजे मल्टिटास्किंग नव्हे. अभ्यासक म्हणतात की, मल्टिटास्किंग म्हणजे छोटय़ा कालावधीत  स्वतंत्र स्वरूपाची अनेक कामं करणं होय. हे मल्टिटास्किंग करणं मानवाच्या मेंदूला न ङोपणारं काम असतं. दोन सारख्या स्वरूपाची कामं एकाच वेळेस करणं हे मेंदूला झेपत नाही. कारण त्या दोन सारख्याच कामांसाठी मेंदूचा एकच भाग वापरला जात असतो. त्यामुळे एका वेळेस एक काम उत्तम होऊ शकते. 
मग प्रश्न पडतो की स्रियांवर हे मल्टिटास्किंगचं  न झेपणारं ओझं कोणी टाकलं? हे ओझं टाकताना याचा स्रियांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो याचा अंदाज आला नसेल का?
एका वेळेस अनेक कामं करताना महिलांना प्रचंड ताणाचा सामना करावा लागतो. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो हे अभ्यासातून सिद्ध झालं आहे. महिलांनी घर सांभाळावं, मुलांकडे लक्ष द्यावं, त्यांनी नोकरीदेखील करावी. जगभरात महिलांबद्दलच्या या अपेक्षा समान आहेत; पण त्या अपेक्षा पूर्ण करताना महिलांना झगडावं लागतं. त्याचा परिणाम त्यांच्या कामावर आणि मानसिकतेवरही होतो/म्हणूनच मूल झाल्यानंतर नोकरी करणा:या अनेक महिला नोकरी सोडून घरी राहून मुलांकडे लक्ष देतात. एक मूल असलेल्या महिलेवरचा ताण हा दोन मुलं असलेल्या महिलांच्या तुलनेत कमी असतो असंही अभ्यासकांना आढळून आलं आहे. मूल झाल्यानंतरही एका ठरावीक कालावधीनंतर महिलांना उत्तमपणो त्यांचं करिअर करता यावं यासाठी घरात/कुटुंबात ती एकटी वाहात असलेल्या जबाबदा-यांची विभागणी समानपणो होणं आवश्यक आहे, अशी गरज अभ्यासक व्यक्त करतात.
महिलांमधील मल्टिटास्किंगच्या क्षमतेचा अभ्यास करताना जर्मन अभ्यासकांनी इतरही अनेक समजुतींचा फुगा फोडला. जसं नेहमी म्हटलं जातं की घरकामाच्या बाबतीत महिलांच्या तुलनेत पुरुष हे गोंधळलेले असतात; पण हा गोंधळ अभ्यासकांना महिलांच्या बाबतीतही आढळून आला. अभ्यासकांच्या मते, हा गोंधळ उडण्याचं कारण म्हणजे त्या कामाचा असलेला कमी अनुभव. घरकामाचा अनुभव कमी असल्यानं पुरुषांना घरकाम करताना महिलांच्या तुलनेत जरा जास्त वेळ लागतो इतकंच. पण दोन वेगळ्या गटातल्या बायकांच्या काम करण्याच्या क्षमतेत फरक असतो, असं या अभ्यासात आढळून आलं आहे. गृहिणी असलेल्या महिला जी कामं दिवसभर करत राहातात तीच कामं नोकरदार महिला कमी वेळेत करून टाकतात. कामाच्या दबावामुळे गती निर्माण होऊन हा फरक निर्माण होतो. पण म्हणून नोकरदार महिला या मल्टिटास्कर असतात असं नाही. त्या एकामागून एक काम पटापट करू शकतात एवढंच; पण त्या एकावेळेस अनेक कामं करू शकत नाही हेही खरं. एका मागून एक काम वेगानं करणं म्हणजे मल्टिटास्कर असणं असं नव्हे, असं हा अभ्यास प्रामुख्यानं सांगतो. या अभ्यासातून पुढे आलेल्या निष्कर्षाचा विचार हा त्या त्या देशातील सरकारनं/धोरण ठरविणा:यांनी केला तर महिलांवरील जबाबदा:यांचं ओझं नक्कीच कमी होईल, असा आशावाद अभ्यासकांना वाटतो. नोकरदार आयांना आपल्या मुलांची काळजी असते, त्यामुळे त्या वेळेत मुलांना सांभाळण्याची योग्य व्यवस्था जर शासनानंच निर्माण करून दिली तर महिला मोकळेपणानं घराबाहेर पडून काम करू शकतील. 
मल्टिटास्किंग ही क्षमता नसून चुकीची आणि अन्याय्य अपेक्षा आहे. या चुकीच्या अपेक्षांचा भार खांद्यावर घेऊन पळण्यापेक्षा एका वेळेस एकाच कामावर लक्ष केंद्रित करता आलं तर महिला त्यांची कामं अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील आणि विशेष म्हणजे त्या कामातून त्यांना कामाचं समाधान मिळेल आणि चांगलं काम केल्याचा आनंदही मिळेल. 

 


 

Web Title: Who put the burden of the wrong idea of multitasking on women's heads?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.