When it will end the hesitation of women 'How to Speak' | स्त्रियांची ‘कसं बोलू’ची घुसमट कधी संपणार आहे?
स्त्रियांची ‘कसं बोलू’ची घुसमट कधी संपणार आहे?

-- शुभदा विद्वांस

प्रसिद्ध संगितकार अनुष्का शंकर यांचं ट्वीट नुकतंच वाचलं. काही दिवसांपूर्वीच अनुष्का फॉयब्रॉइडस आणि गर्भाशयातील ट्युर्मस दूर करण्यासाठीच्या शस्त्रक्रियेतून सहीसलामत बाहेर पडल्या. त्यांनी लिहिलं  ‘आणि आता मला संपूर्ण आयुष्यभरासाठी गर्भाशय नाही...’

किती धारिष्ट्याचं विधान आहे ना हे? 

पस्तिशीनंतर स्त्रीचं गर्भाशय काढून टाकण्याचा घटना आपल्या आसपास  घडत असतात. पण त्यांच्यापैकी कोणीतरी असं सोशल मीडियावर मोकळेपणानं  सांगितल्याचं तुम्हाला आठवतं का ? सोशल मिडियाच कशाला तुमच्या नात्यातल्या महिला किंवा मैत्रिणीसुद्धा हे तुमच्यापासून लपवून ठेवतात. 
काय कारण असावं?
कदाचित आपलं स्त्रीत्व संपुष्टात आलं अशी त्यांची गैरसमजूत असावी. आपलं लैंगिक आयुष्य आता धोक्यात येणार आहे आणि लोक आपली व आपल्याबरोबर आपल्या नवर्‍याचीही कीव करत आहेत असं भितीदायक दृश्य तिच्या नजरेसमोर येत असावीत. 

महिलांना स्तनांचा कर्करोग होतो तेव्हा त्यांच्या मनात असाच संघर्ष चालू असतो. डॉक्टर परोपरीनं सांगत असतात की,  धोका पत्करायला नको,   दोन्ही ब्रेस्टस काढून टाकाव्या लागतील.’  तेव्हा महिलांना आपण बेढब दिसू, आपल्यामध्ये सेक्स अपील राहाणार नाही या चिंता भेडसावत असतात. परंतु आपण आधी एक जिवंत हाडामासाची व्यक्ती आहोत,  आपल्याला स्वतंत्र अस्तित्त्व आहे हे सुद्धा या विसरतात. अशा स्त्रियांचं खूप समुपदेशन केल्यानंतर त्या स्तन  काढायला तयार होतात.

तुम्हाला हॉलीवूड मधील सुप्रसिद्ध मानवतावादी अभिनेत्री अँन्जेलीना जोली माहिती असेल. तिला  ‘ बेल्स पाल्सी’ हा आजार झाला होता. तशातच डॉक्टरांनी तिला भविष्यात कॅन्सर होण्याविषयीचा इशारा दिला. डॉक्टरांनी तिला दोन्ही ओव्हरीज काढून टाकण्याचा सल्ला दिला आणि तिनं तो तात्काळ मानला. ही गोष्ट तिनं माध्यमांपासून लपवून ठेवली नाही. उलट ती म्हणाली, ‘मला अशा स्त्रियांचं आश्चर्य  वाटतं की ज्या स्त्रिया आपल्याला होणारा शारीरीक वा मानसिक त्रास लपवून ठेवतात. जेव्हा कुटुंबाच्या लक्षात ही गोष्ट येते तेव्हाच त्याच्यावर उपचार होतो.’

याच संदर्भातील एका डॉक्टरांची प्रतिक्रिया बोलकी होती. एक जनरल प्रॅ्रक्टिशनर म्हणून त्यांचं  निरिक्षण असं की नवराच बायकोला घेऊन येतो.  तिच्या आजाराची जंत्री वाचतो आणि  कळस म्हणजे डॉक्टरांना सांगतो,  ‘ डॉक्टर हिला जरा लवकर बरं करा ती अशी झोपून राहीली तर मुलांकडे कोण बघेल ?’

खूप असंवेदनाशील वाटतं ना हे ? - पण ते वास्तव आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते स्त्रियांनाही मान्य आहे.  

एखादी मनिषा कोईराला किंवा सोनाली बेद्रें केमोथेरेपीमध्ये डोक्याचा गोटा झाला असतांनासुद्धा माध्यमांच्या कॅमे-याला आत्मविश्वासानं सामोरं जातात. 

दीपिका पदुकोण हिचं तर कौतुकच. तिनं कसलाही विचार न करता स्वत:ला सोसाव्या लागलेल्या ‘डिप्रेशन’या मानसिक आजाराची विस्तृत माहिती दिली. आणि आज ती अशा आजारी माणसांसाठी दीपस्तंभ झाली आहे. कारण आज समाजामध्ये डिप्रेशनचा ‘डि’सुध्दा लोक उच्चारायला घाबरतात.

मानसोपचारतज्ज्ञांची नावं घ्यायला लाजतात. कधीकधी आपल्यालासुद्धा निराश वाटतं. पण आपणही ना कुटुंबात बोलतो, ना मैत्रिणीकडे . मनाला पोखरणार्‍या भावना कुणाबरोबरच वाटून घेत नाही. कधीतरी मनावर ताण येणं स्वाभाविक असतं. पण साध्यासाध्या कामांसाठी जेव्हा मनाशी संघर्ष करावा लागतो तेव्हा तो खरंतर वाळू हातातून निसटून चालली आहे असं वाटायला लावणारा क्षण असतो. परंतु तज्ज्ञांची मदत घेणं किंवा स्वत:हून समुपदेशन करून घेणं हा कलंक वाटतो. अर्थात सोपे नसतं हे आणि मग आजार बळावत जाऊन काटयाचा नायटा होतो. 

आता नक्कीच आपण अँन्जेलीना जोली, दिपिका पदुकोण, अनुष्का शंकर, सोनाली बेन्द्रे किंवा मनिषा कोईराला नाही आहोत. आपण जरी धडाडी दाखवत आपलं दु:ख उघडं केलं तर माध्यमं  आपलं कौतुक करणार नाही हे ही कबुल. पण आपण सेलिब्रेटी नसलो तरी आपण एक जिवंत व्यक्ती आहोत. पण मग आपल्या बाबत काय घडतं ? 

- आपण साठावा वाढदिवस झोकात साजरा करतो. फेसबुक, इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करतो. महीन्या दोन महिन्यातच गुडघे दुखायला लागतात. मात्र मैत्रिणींबरोबर शेअर करतानासुद्धा जीभ चावतो. वार्धक्याच्या खूणा आपल्याला वाकुल्या दाखवत असतात.आणि स्त्रिया लाजून त्यापासून नजर चोरत राहातात. 

काही वेळेस स्त्रियांचं अज्ञान आणि गैरसमज नडतात. सरलाताईंनी त्यांच्या काकुच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनात त्यांचे डोळे गेल्याचं  पाहिलं होत. त्यांच्याही डोळ्यांवर आता पडदा आला होता. वाचनही हळूहळू कमी झालं होतं.  मुलानं हटकलं सुद्धा की तू हल्ली लायब्ररीत का जात नाहीस. पण त्यांनी घाबरून त्याकडे दुर्लक्ष केलं. व्हायचं तेच झालं. त्यांचा मोतीबिंदू फुटला. जर चर्चा केली असती,  मनातली भीती बोलून दाखवली असती तर अशी निकडीची वेळ आली नसती.

स्त्रियांच्या एम.टी.पी. अँबॉर्शन्सच्या बाबत तर कमालीची गुप्तता पळण्यात येते. आमच्यासमोर अशीच एक कुमारी मुलगी आली होती. जी गर्भवती राहील्यामुळे घाबरून जाऊन मित्रानं दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्या खाऊन एक महिना अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत होती. तर अशिक्षित वर्गामध्ये भोंदू डॉक्टरांकडे जाण्याचं प्रमाण जास्त आहे. हे  असं वागणं म्हणजे नाहक जीव धोक्यात घालणं असतं. 

एकदा माझ्या एका मैत्रिणीला थायरॉईड झाला. आधी तर काही न  करता भराभर वजन कमी होत आहे याचं तिला कौतुक वाटलं.  परंतु तिचे मुडस्विंग्ज वाढल्यावर घरच्यांना त्याचा त्रास होऊ लागला.  म्हणून तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि मग थॉयरॉईडचं निदान झालं  मुद्दा हा आहे की तिला होणा-या त्रासाबद्दल तिनं उघडपणे का बोलू नये.

खरी गोष्ट तर ही आहे की स्त्रिया स्वत:लाच दुय्यम मानतात. स्त्रिया आधी कुटुंबांचा विचार करतात  ‘ एक तीळ सात जणांनी वाटून खावा’ अशी म्हण आहे पण स्त्रियांना त्या  सात जणांमध्येसुध्दा वाटा नसतो. 

हे चित्रं खरंतर खूपच क्लेशदायी आहे. ते  बदलू शकतं. पण त्यासाठी आधी स्त्रियांनी स्वत:वर प्रेम करायला हवं.  पण सगळी आर्थिक काटकसर स्त्रिया स्वत:साठीच राखून ठेवतात. तीळ वाटणारे सुद्धा आपणच असतो हे स्त्रिया सहज विसरतात

मुलीची प्रथम मासिक पाळी सुरू होते तेव्हा तिची आई तिला  दहावेळा बजावते की कोणालाही सांगू नकोस. जणू काही तरी लज्जास्पद घडलं आहे. खरं तर हे निसर्गचक्र आहे त्याचा आनंदानं स्वीकार करण्याऐवजी स्त्रिया मुलींचा असा गैरसमज करून देतात की, ही लाजिरवाणी  कटकट आहे.

परवाच मी फेसबुकवर एक सुंदर पोस्ट पाहीली. एक 12/13 वर्षांची मुलगी ट्रेननं प्रवास करत होती. अचानक पहिल्यांदाच तिची मासिक पाळी सुरू झाली. तिच्या समोर एकवीस वर्षाचा मुलगा बसला होता. त्याच्या तीन बहिणी बोगीच्या दुस-या  टोकाशी होत्या.  तो त्यांच्याजवळ गेला आणि कानात कुजबुजला.  त्यातली एक बहीण पर्समध्ये सॅनिटरी नॅपकीन घेऊन त्या मुलीच्या जवळ आली आणि  त्या मुलीला टॉयलेटमध्ये घेऊन गेली.
परततांना ती मुलगी आत्मविश्वासपूर्वक स्मितहस्य करत आली 
खरोखर एम्पथी म्हणजे काय ते तेव्हा कळलं !

(लेखिका स्त्री-पुरुषांच्या जैविक वेगळेपणाचा उलगडा करणा-या सुप्रसिद्ध पुस्तकांच्या अनुवादक आणि लेखिका आहेत.)

shubhada.vidwans@gmail.com

Web Title: When it will end the hesitation of women 'How to Speak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.