What happened with Anushka's photo? | अनुष्काच्या फोटोत कुणाला काय खटकलं?

अनुष्काच्या फोटोत कुणाला काय खटकलं?

-अश्विनी बर्वे

अनुष्का शर्मानं आपल्या गर्भार पोटाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. फोटोसेशनच केलं. करिना कपूरनेसुद्धा आपल्या प्रेग्नंसीच्या काळातील फोटो शूट केले होते. ते फोटो समाजमाध्यमात, माध्यमात गेले की आपल्यावर टीका होणार, ट्रोलिंग होणार हे काय त्यांना माहीत नसेल का, पण तरी त्यांनी हे फोटो काढले.

का? प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुद्दाम त्यांना असं काही करण्याची गरज नाही. त्यांच्या अभिनयाने त्यांनी स्वत:ची जागा निर्माण केली आहे. मग तरी हे फोटो का काढले असावेत?

आपल्या समाजात मूल होण्याला फार महत्त्व आहे. त्यानुसार त्या स्त्रीची किंमतसुद्धा ठरवली जाते. अगदी आजही. खरं तर तुम्ही एखाद्या बाळाला जन्म द्या अथवा नका देऊ, त्यावर तुमच्यातलं आईपण ठरत नसतं. मात्र, तरीही आपल्या समाजात अजूनही मातृत्व या भावनेशी निगडित अनेक चित्रविचित्र गोष्टी दिसतात. स्त्रीला दिवस गेले की तिचं पोट दिसणार नाही अशा प्रकारचे कपडे ती घालते. मोठा ढगळा गाऊन, साडीचा पदर किंवा ओढणीनं मोठे होणारं पोट झाकण्याचा प्रयत्न असतो. सगळं झाकपाक करून ठेवायचं. ती गर्भवती असताना कुठे जाऊ लागली तर ‘एवढं मोठं पॉट घेऊन बाहेर कशाला जायला पाहिजे?’ असे टोमणेही मारले जातात.

आता मात्र आपलं गरोदरपण, आपला आई होण्याचा प्रवास उघडपणे जगण्याकडे, साजरा करण्याकडे अनेकींचा कल दिसतो. त्यात लपवून ठेवावं असं काही आहे असं त्यांना वाटत नाही. खरं तर नक्की कोणत्या सालापासून अशा प्रकारचे फोटो काढायला आणि ते समाज माध्यमांवर पोस्ट करायला सुरुवात झाली हे सांगता येणार नाही; पण जवळ जवळ १५-२० वर्षांपासून अनेक स्त्रिया दिवस गेल्यानंतर ३० आठवड्यांच्या आत आपले फोटो काढून घेत आहेत. फोटो काढताना आपलं पोट व्यवस्थित दिसेल असे कपडे घालतात. यामध्ये जशा सेलिब्रिटी आहेत तसेच सामान्य स्त्रियासुद्धा आहेत. अर्थात सर्वसामान्य घरातील स्त्रियांचं जेव्हा डोहाळं जेवण होतं त्यावेळी साडी नेसून चंद्रावर, झोपाळ्यावर अशा प्रकारचे फोटो काढण्याची प्रथा अनेक घरांमध्ये आहे; पण मुद्दाम आपलं पोट दिसेल असे फोटो मात्र काढणं मध्यमवर्गीय घरात काही होत नाही.

त्यामुळे अनुष्का शर्मा आणि इतर सेलिब्रिटींनी जेव्हा गरोदर काळातील फोटो समाज माध्यमांवर पोस्ट केले तेव्हा त्यांच्यावर जशी टीका झाली तसे नव्या काळात अनेक स्त्रीपुरुष याविषयावर सकारात्मक बोलले. त्यांना आवडलं, सुंदर वाटलं ते फोटोसेशन.

प्रिया मलिकने नुकतेच बंग स्टुडिओ आणि द दिल्ली न्यू कंपनीच्या माध्यमातून भारतीय पारंपरिक पोशाखात आपल्या गर्भावस्थेतील फोटो शूट केले आहेत. पोटाच्या वाढत्या घेराची लाजू वाटून घेऊ नये हेच सांगण्याचा प्रयत्न या प्रयोगातून होत असतो. परंपरा आणि आधुनिकता या दोन विषयावर समाजात नेहमी चर्चा चालू असते; पण यासंदर्भात प्रश्न मात्र स्त्रियांनाच विचारले जातात, ते ही तिचे पुरुषांशी असलेल्या नात्या संदर्भात. तिनं नेहमीच्यापेक्षा वेगळं काही केलं की लगेच ‘आपल्याकडे असं नाही’ म्हणत लोक संस्कृतीचा बागुलबुवा उभा करतात. मात्र, या साऱ्याला न जुमानता मोकळेपणानं जगणं, आनंदी राहणं, आपल्या पोटातील बाळाचं आगमन साजरं करणं हे अनेकींना आता महत्त्वाचं वाटू लागलं आहे.

आणि त्याच पिढीच्या प्रतिनिधी आहेत अनुष्का आणि करिना. स्टार असल्या, त्यांचा देह हा त्यांच्या सिनेमॅटिक इमेजसाठी महत्त्वाचं असलं तरी आई होतानाचे बदल त्या खुलेेपणानं स्वीकारत आहेत. लपवून छपवून काही नाही. आपलं गर्भारपण ही लाजिरवाणी गोष्ट नसून तो आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर असा काळ आहे, हेच या सेलिब्रिटी अशा प्रकारच्या फोटो शूटमधून दाखवून देत आहेत.

ते अनेकांना पचत नाही, कारण स्त्री दिसायला आधुनिक दिसावी; पण मनानं तिनं परंपरावादी असावं अशी आपल्या समाजाची खरी रचना आहे; पण काळ बदलत आहे, नव्या काळात स्त्रिया अधिक मनमोकळेपणानं स्वत:कडेही पाहत आहेत.

ashwinibarve2001@gmail.com

Web Title: What happened with Anushka's photo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.