What fears do women in England face? | इंग्लडमधील महिलांना कसली भीती छळतेय?

इंग्लडमधील महिलांना कसली भीती छळतेय?

- प्रतिनिधी

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नोकरी , व्यवसाय करणा-या महिलांचं नुकसान होत आहे, पुढेही होणार आहे.  घरातलं काम आणि ऑफिसचं काम या दोन्हींचा बोजा महिलांना वाहावा लागतोय. हेचित्र फक्त आपल्याच देशातलं आहे असं नाही तर साता समुद्रापलिकडे असलेल्या इंग्लडमधेही हेच चित्र आहे. इंग्लडमधील महिलाही आपल्या इथल्या महिलांप्रमाणोच नोकरे राहाते की जाते, ऑफिस सुरू झाल्यावर  घरात मुलांना ठेवून कसं जायचं? हे एका नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून हे सिद्ध झालंय. लॉकडाऊनमुळे महिला आणि पुरूषांमधल्या कामात झालेल्या फरकाचा अभ्यास या सर्वेक्षणानं केलाय.
इंग्लडमधील इन्स्टिट्यूट फॉर फिस्कल स्टडीज ( आय एफ एस) आणि युसीएल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन  यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या सर्वेक्षणातून तेथील महिलांच्या मनातील नोकरी जाण्याची भिती, गोंधळ   आणि वैताग या सर्वावरच प्रकाश टाकला आहे. लॉकडाऊनमधे इंग्लडमध्ये वडिलांपेक्षा मुलांच्या आयांनी जास्त प्रमाणात नोक:या गमावल्या आहेत. या कोरोना व्हायरसमुळे आणखी महिलांचे रोजगार जाऊन स्त्री आणि पुरूषांमधे मोठा आर्थिक भेद निर्माण होऊ शकतो तसेच कोरोना नंतरच्या जगात महिला आणि पुरुषांमधील वेतनातही मोठा फरक दिसून येऊ शकतो. 
लॉकडाऊनमुळे नोकरी, उद्योग करणा-या स्त्रिया आणि पुरूष घरात आहेत.  कुटुंबातील सर्व सदस्य घरीच असल्यामुळे  घरातील कामं वाढलेली आहेत. घरातल्या कामाची जबाबदारी खरंतर स्त्री आणि पुरूष दोघांवरही सारखीच आहे. पण तरीही तिथे पुरूष महिलांपेक्षा घरातलं काम कमीच करतात.  हे सर्वेक्षण करताना 3,500 कुटुंबाच्या ऑनलाईन, फोनवरून मुलाखती घेतल्या गेल्या. तेव्हा वडिलांच्या तुलनेत आईच मुलांची काळजी घेण्याचं घरातलं काम करण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर उचलत आहे.  दिवसभरातल्या चोवीस तासांपैकी 10.3 तास आईच मुलांची काळजी घेण्याचं काम करते आणि त्या तुलनेत बाबा मात्र 2.3 तासानं मागे आहेत. घरकामही पुरूषांच्या तुलनेत स्त्रियाच 1.7 तास जास्त करतात.  अनेक कुटुंबात बायको कामाला भिडली की पुरूष अलगद घरातल्या कामातून आपलं अंग काढून   घेतो. तर स्त्रिया वाढलेलं घरकाम करून पाच तास ऑफिसचं कामही करतात असं या सर्वेक्षणात आढळून आलं आहे. 
लॉकडाऊनच्या काळात नोकरी गमावलेल्या बाबांच्या तुलनेत 23 टक्के जास्त आयांनी आपली नोकरी ही तात्पुरती किंवा कायमस्वरूपी गमावलेली आहे. 47 टक्के आयांनी तर कायमची आपली नोकरी गमावली असून 14 टक्के आया आपण नोकरी करू शकू की नाही याबाबत गोंधळलेल्याच आहे. जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालंय महिलांना ऑफिसपेक्षा घरातलं काम जास्त पडत आहे. पुरूषांच्या तुलनेत महिला वर्क फ्रॉम होमही कमी काळ करू शकत आहेत. सगळं घरातलं आवरून आणि मुलांबाबतच्या सर्व जबाबदा-या पार पाडूनही जेव्हा महिला काम करायला बसतात तेव्हा सुध्दा एक तासापेक्षा कमी काळ विना व्यत्ययाविना काम करू शकतात. त्या तुलनेत पुरूष हे विना व्यत्यय तीन तास काम करू शकतात हे या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.  या लॉकडाऊनमुळे आणि कोरोनानंतरही महिलांना आपल्या आई होण्याची मोठी किंमत आर्थिक पातळीवर मोजावी लागण्याची भिती या सर्वेक्षणातून व्यक्त होत आहे.  लॉकडाऊन पूर्ण उठल्यानंतर पुरूष हे ऑफिसला बिनधास्त जाऊ शकतील पण स्त्रिया मुलांच्या शाळा जर सुरू झाल्या नाहीत तर घरातच अडकून पडतील. या कारणामुळेही महिलांना मोटया प्रमाणात आपले रोजगार गमवावे लागतील. एकूणच लॉकडाऊनमुळे मुलांची काळजी घेण्याचं प्रमाण हे 35 टक्क्यांनी वाढलं आहे. 
हे सर्वेक्षण स्त्री मग ती कुठलीही असो तिला घरात बसून किंवा बाहेर पडून काम करणं किती आव्हानात्मक आहे हेच दाखवतं. या सर्वेक्षणतले निष्कर्ष हे आपल्या देशातील नोकरी करणा-या स्त्रियांशीही बरेच मिळते जुळते आढळतील. 

 


 

Web Title: What fears do women in England face?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.