What exactly is a campaign called Cyber Safe Woman to Protect Women in the Cyber Sector? | महिलांच सायबर क्षेत्रतला वावर सुरक्षित करणारी सायबर सेफ वुमन ही मोहीम नक्की आहे तरी काय?

महिलांच सायबर क्षेत्रतला वावर सुरक्षित करणारी सायबर सेफ वुमन ही मोहीम नक्की आहे तरी काय?

- मनीषा म्हात्रे      

अश्लील छायाचित्रं समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे खंडणीची मागणी, फेसबुकवर खोटी ओळख दाखवून महिलेला फसवलं यासारख्या अनेक घटना सायबर विश्वात महिलांच्या बाबतीत अगदी रोज घडत आहेत. वास्तव जगातील महिलांची सुरक्षा हा काळजीचा विषय झालेला असतानाच  सायबरच्या जगातही महिला फसवणुकीचे गुन्हे सातत्यानं घडत आहेत.  
घर आणि कामाच्या ठिकाणी केलं जाणारं शोषण, इंटरनेट आणि मोबाइल फोनच्या वापराबाबत साक्षरतेचा अभाव, गैरवर्तन सहन करण्याची सक्ती आणि समाजामध्ये बदनामीची भीती यामुळे महिला सायबर विश्वातल्या गुन्ह्यांची शिकार बनतात.
सायबर साक्षरतेचा अभाव, त्यात आभासी जगाला वास्तव समजून जगणं हे महिलांसाठी दिवसेंदिवस घातक ठरताना दिसत आहे. त्यात तरुणी, अल्पवयीन मुलं, मुलींच्या लैंगिक   अत्याचाराच्या घटना डोकं वर काढू लागल्यानं विधिमंडळात याबाबत आवाज  उठविण्यात आला. या प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागानं ‘सायबर सेफ वुमन’ या मोहिमेची सुरुवात केली आहे.
गेल्या पाच वर्षात एकूण 16 हजार 51 सायबर गुन्हे राज्यभरात दाखल झाले. यात, चार हजार 434 गुन्ह्यांची उकल होऊन पाच हजार 425 आरोपींना बेडय़ा ठोकण्यात आल्या. चिंतेची बाब म्हणजे यापैकी अवघे 34 गुन्हे निकाली लागले. 2018 मध्ये तीन हजार 713 गुन्हे सायबर पोलिसांच्या दफ्तरी नोंद झाले तर, ऑक्टोबर 2019 र्पयत तीन हजार 728 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 653 गुन्हे उघडकीस आले धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यांमध्ये तरुणी आणि अल्पवयीन मुलामुलींच्या लैंगिक शोषणांच्या गुन्ह्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. ही चिंताजनक आकडेवारी समोर आल्यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो:हे यांनी यावर उपाययोजना होणं गरजेचं असल्याचं मत विधिमंडळात मांडलं.  
हे गुन्हे वाढण्याचं प्रमुख कारण साक्षरतेचा अभाव असल्यानं  सायबर पोलिसांनी ‘सायबर सेफ विमेन’चा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळताच 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं  ‘सायबर सेफ विमेन’ ही मोहीम राज्यभरात सुरू झाली आहे. महाराष्ट्र सायबरचे अधीक्षक बलसिंग राजपूत सांगतात की, महिलांना  समाजमाध्यमांवरील धोक्यांबाबतचं ज्ञान कमी असतं. त्यामुळे त्या खातरजमा न करता आभासी जगाला वास्तव समजून सोशल ठगांच्या जाळ्यात अडकतात. तरुणी, अल्पवयीन मुलं आपले फोटो वैयक्तिक माहिती, दिनक्रम, आवड, निवड अशी सर्व माहिती समाजमाध्यमांवर सर्रासपणो शेअर करतात. याचाच फायदा घेत अनोळखी व्यक्ती त्यांच्या संपर्कात येतात. पुढे ओळखीतून मैत्री आणि मैत्रीतून प्रेमाची भावना निर्माण करत, लैंगिक अत्याचार, फसवणूक, खंडणी, धमक्या या प्रकारचे गुन्हे घडतात. त्यामुळे याबाबत सतर्क होणं गरजेचं आहे. यासाठीच सायबर सेफ विमेन या मोहिमेंतर्गत काय करावं आणि काय करू नये? याबाबत माहिती देण्यात येत आहे.
मोहिमेचं स्वरूप
महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्यानं  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणी ‘सायबर सेफ वुमन’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देणा-या व्याख्यानांचं आयोजन करण्यात येत आहे. 
इंटरनेटवरील फिशिंग, विवाह विषयक संकेतस्थळावरील फसवणूक, ओळख चोरी, फोटोमधील फेरबदल, बँकांसंदर्भातील फसवणूक, बालका-ंसंदर्भातील पोर्नोग्राफी, सायबर बुलिंग, ऑनलाइन गेमिंग, खोटी माहिती देणारी संकेतस्थळं, सायबर मानहानी यांची माहिती आणि यापासून स्वत:चा बचाव करण्याचे प्रतिबंधात्मक उपाय यासह सायबर गुन्ह्यासंदर्भातील कायदे तसेच समाजमाध्यम  (सोशल मीडिया) वापरण्यासंदर्भातील घ्यावयाची काळजी याची माहिती देण्यात येत आहे. जबाबदार नेटिझन्स तयार करण्यासाठी जागरूकता हा एक महत्त्वाचा पैलू असून, या मोहिमेमुळे महिला आणि मुलांना  सायबर जगात वावरण्याच्या योग्य पद्धतींविषयी जागरूक करण्यास या मोहिमेची मदत होणार आहे. सध्या राज्यस्तरावरून राबविण्यात येणा:या या मोहिमेचं पुढे स्थानिक  पातळीवर नियोजन करण्यात येणार आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------

तक्रार नोंदवण्याचे, मदतीचे पर्याय
सायबर सेफ वुमन ही मोहीम राबवताना महाराष्ट्र सायबर विभागानं नवीन संकेतस्थळं निर्माण केली आहेत. ह्या संकेतस्थळावर जाऊन सायबर गुन्हा पीडित घरबसल्या तक्रार करू शकतात. 
*  बॅँकिंग व्यवहार किंवा संवेदनशील वैयक्तिक माहिती विचारणारे कोणतेही फसवे संदेश, ईमेल, फोन कॉल्स प्राप्त झाल्यास महाराष्ट्र सायबरच्याwww.reportphishing.in या पोर्टलवर तात्काळ रिपोर्ट करा. 
हे संकेतस्थळ जुलै 2018 पासून सुरू आहे. 
 * सायबर गुन्हे नोंद करण्यासाठी ँhttps://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. हे संकेतस्थळ केंद्र सरकारचं असून, ऑगस्ट 2019 पासून सर्वासाठी खुलं करण्यात आलं आहे.
 आपला मोबाइल चोरी किंवा हरवल्यास मोबाइलचा आयएमईआय क्रमांक ब्लॉक करण्यासाठी www.ceir.gov.inया संकेतस्थळावर तक्रार करता येते. (त्यासाठी मोबाइलचा 15 अंकी आयएमईआय क्रमांक *#06#  डायल करून नोंद करून ठेवा.)
*  महिला आणि बालकांच्या बाबतीतल्या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीकरिता 155260 हा हेल्पलाइन क्रमांक आहे.

--------------------------------------------------------------------------------


महिला आणि बालकांवरील  सायबर गुन्हे
* चाइल्ड पोर्नोग्राफी : 18 वर्षाखालील बालकांवर होणारा लैंगिक अत्याचार आणि त्याचं चित्रीकरण करणो याला चाइल्ड पोर्नोग्राफी असं म्हणतात.  खाऊ, खेळणी इत्यादींचं आमिष दाखवून बालकांवर लैंगिक अत्याचार केले जातात.
 * सायबर ग्रोपिंग :- सोशल मीडिया किंवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे मुलांचं लैंगिक किंवा अन्य प्रकारे शोषण करण्याच्या उद्देशानं जवळीक निर्माण केली जाते. सायबर ग्रुमर भेटवस्तू, प्रशंसा, मॉडेलिंगमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष देत जवळीक वाढवतात. पुढे अश्लील संदेश, छायाचित्रं किंवा व्हिडीओ पाठवू लागतात. पुढे आपले न्यूड्स, फोटो, खासगी फोटोसह व्हिडीओ पाठविण्यास सांगतात.
* सायबर बुलिंग : स्रियांना, मुलींना धमकी देत त्यांना मानसिक त्रास दिला जातो. अश्लील किंवा हानिकारक संदेश, टिपण्या आणि प्रतिमा / व्हिडीओ पाठवून एखाद्याला त्रस देण्यासाठी इंटरनेट किंवा मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सायबर गुन्हे करणारी व्यक्ती मजकूर, संदेश, ई-मेल, सोशल मीडिया, संकेतस्थळं, चॅटरूम्स इत्यादीचा वापर करतात. यामुळे गंभीर स्वरूपाचे शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि मानसिक परिणाम जाणवतात. 
 * मॉर्फिंग : मॉर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचं मूळ छायाचित्र बदललं जातं. महिलांची छायाचित्रं डाउनलोड करून, (अवमानना होईल अशा प्रकाराने) मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइटवर रिपोस्ट/ अपलोड करून बनावट प्रोफाइल बनवले जातात.
 * सायबर डिफेमेशन (बदनामी) : चुकीचं विधान करून व्यक्तीच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहचवली जाते. चार्यिहननाच्या उद्देशानं ई-मेल किंवा समाज माध्यमांवर पोस्ट टाकली जाते.
*  सायबर स्टॉकिंग :- एखाद्या व्यक्तीच्या ऑनलाइन हालचालींचा पाठलाग करणं, त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणं आणि त्याची वैयक्तिक माहिती गोळा करून ती सोशल मीडियावर प्रसारित करणं. अशी संवेदनशील माहिती गोळा करून सायबर स्टॉकर, नाव, कौटुंबिक  पाश्र्वभूमी, मोबाइल क्रमांकाच्या आधारे पीडितेच्या दैनंदिन व्यवहारामध्ये प्रवेश करतो. शिवाय पीडितेच्या नावानं डेटिंग सेवांशी संबंधित वेबसाइटवर माहिती पोस्ट करतो.
 * ऑनलाइन गेमिंग :- मुलं मोबाइल, संगणक, पोर्टेबल गेमिंग डिव्हाइसचा वापर करून सोशल नेटवर्कवर ऑनलाइन गेम खेळतात.
उदा : ब्ल्यू व्हेल, मोमो चॅलेन्ज, पबजी. मात्र याच ऑनलाइन गेमिंगच्या अतिरेकामुळे मुलं चोरी, आत्महत्या यासारख्या गुन्ह्यांना बळी पडतात.


(लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत गुन्हे वार्ताहर आहेत)                                                                                        manishamhatre05@gmail.com

 

    

                                                                                                                                                         

Web Title: What exactly is a campaign called Cyber Safe Woman to Protect Women in the Cyber Sector?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.