What does the poem of Lewis Gluck, who rose from the ashes and won the prestigious Nobel, say? | हरवलेपणातून बहरलेली आणि मानाच्या ‘नोबेल’र्पयत घेऊन गेलेली लुईस ग्लूकची कविता काय सांगते?

हरवलेपणातून बहरलेली आणि मानाच्या ‘नोबेल’र्पयत घेऊन गेलेली लुईस ग्लूकची कविता काय सांगते?


- लीना पांढरे

साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त करायचा असेल तर त्या साहित्यामध्ये सामाजिक आशय असलाच पाहिजे, असं आजवरचं चित्र होतं. आपल्या चिमुकल्या अनुभवाच्या तळ्यातील वेदनांना शब्दरूप देणा-या कवितेला सर्वोच्च जागतिक पुरस्काराच्या प्रशस्तीची पावती मिळणे ही फार दुरापास्त बाब आहे. म्हणूनच प्रचंड मोठा जागतिक कॅनव्हास वगैरे न घेता आणि विद्रोहाच्या कोलाहलात सामील न होता शांत व संयतपणे आपल्या घराच्या अंगणात घडणा-या गोष्टींचा वैयक्तिक अनुभव अत्यंत तरलपणे शब्दबद्ध करणा-या लुईस ग्लुक या श्वेतवर्णीय कवयित्रीला यंदाचा नोबेल पुरस्कार मिळाला, तेव्हा भावकवितांवर नितांत प्रेम करणा-या सर्वच वाचकांना सुखद धक्का बसला. नोबेल पारितोषिकाच्या 112 वर्षाच्या इतिहासात कवितेच्या वाटय़ाला नोबेलचे भाग्य क्वचितच येतं . ते यावर्षी या ख्यातनाम अमेरिकन कवयित्रीला मिळालं.
मध्यमवर्गीय स्रीच्या दु:खाकडे, वेदनेकडे, तिच्या चौकटीतील जगण्याकडे बघण्याचं भान लुईसची कविता देते. कौटुंबिक जीवनात पेलावी लागणारी आव्हानं , वृद्धत्वाच्या चाहुलीने येणा-या संध्याछाया, हातातून निसटून गेलेले तारुण्याचे हसरे क्षण आणि दाटून येणा-या पावसाळी नभासारखे भरून राहिलेले एकटेपण या विषयांना तिच्या कविता स्पर्श करून जातात. ‘विलक्षण साधेपणानं आविष्कृत होणा-या  कौटुंबिक व खास माजघरातील गंध घेऊन येणा-या  कविता’ असा आवजरून उल्लेख नोबेल पारितोषिक समितीनं केलेला आहे.
झुळझुळणा-या झ-यासारखा स्वच्छ स्फटीक स्वर लुईसच्या कवितेत आहे. ठाम विचार, रेशमी चिमटे काढत जाणारी शैली, नर्मविनोद आणि आसपास घडणा-या साध्या घटितांमागील व्यावहारिकता याच्या स्पष्ट नोंदी तिच्या कवितेत आहेत. तिची विलक्षण बुद्धिमत्ता आणि अनुभवाच्या खोलवर तळाशी जाऊन व्यक्त केलेल्या भावभावना पुन्हा पुन्हा वाचकाला तिच्या कवितेकडे खेचून नेतात. साध्या साध्या कौटुंबिक सुख-दु:खाच्या घटनांना तिनं काव्यरूप दिलं. आपल्या बालपणीच्या आणि तारुण्यातील घटनांना तिनं ग्रीक मिथकांची जोड दिली. तिच्या लहानपणी तिला झोपवताना तिचे आई-वडील तिला ग्रीक पुराणकथा सांगत असत. आपल्या दैनंदिन जगण्याच्या परिप्रेक्षातून तिनं या सर्व कथांकडे पाहिलं आणि या दोन्हीचे सुंदर फ्यूजन तिच्या कवितेमध्ये अवतरलं.
लुईसचा जन्म न्यू यॉर्कचा. तिचे वडील डॅनिअल ग्लुक यांचं किराणा मालाचं दुकान होतं, तर आई गृहिणी होती. बाईसाहेबांनी वयाच्या पाचव्या वर्षीच पहिली कविता लिहिली होती.
वेदना आणि दु:ख हे मात्र लुईसच्या भाळी लहानपणापासूनच लिहिलेले होते. शाळेत असतानाच तिला अग्निमांद्य या आजाराचा सामना करावा लागल्यानं शाळा सोडून घरी बसावं लागलं. मृत्यूला स्पर्श करून आल्यानं तिची कविता अजूनच घनगंभीर झाली. तिनं कोलंबिया विद्यापीठात कवितांच्या कार्यशाळांसाठी स्वत:चं नाव नोंदवलं होतं; पण अखेरीस कुठलीही पदवी न घेताच तिला कोलंबिया विद्यापीठातून बाहेर पडावं लागलं. त्या काळात कारकुनी काम करून तिनं स्वत:चा उदरनिर्वाह केला. 1967 मध्ये तिने चार्लस हेरटसशी विवाह केला आणि 1968 मध्ये घटस्फोट! निकटच्या व्यक्तीशी असलेलं संजीवक नातं मरून जातं तेव्हा त्यातून येणारी प्रचंड निराशा, खिन्नता आणि एकाकीपण आणि सर्वकाही झाकोळून जाणं ..बस्स हेच उमटले लुईसच्या कवितेत!
‘फर्स्ट  बॉर्न’ हा पहिला आणि ‘द हाऊस ऑन माशर्लड’ हा दुसरा. या तिच्या दोन्ही कवितासंग्रहांनी सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. तिनं कवितांच्या कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. आज लुईस येल विद्यापीठात  कविता शिकवणारी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. कविता ही अनुभवण्याची गोष्ट आहे, कविता शिकवणं म्हणजे तिचं विच्छेदन करून तिच्यातील सौंदर्य नष्ट करणं वगैरे गोष्टींना पुन्हा सणसणीत उत्तर देण्याचं काम लुईसनं आयुष्यभर इतरांना कविता, सर्जनशील लिखाण शिकवून केलेलं आहे.


1980 मध्ये लुईसचा तिसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, त्याच सुमारास तिच्या घराला आग लागून सर्वकाही जळून भस्मसात झालं; पण लुईसनं ‘द ट्रायम्फ ऑफ अकेलीस’ हा चौथा कवितासंग्रह लिहिला; तेव्हापासून तिला पारितोषिकं मिळायला सुरुवात झाली आणि तिची कवितेची वाट तिला गवसली. अत्यंत सुस्पष्ट शुद्ध आणि धारदार असंतिच्या कवितांचं वर्णन केलं जाऊ लागलं. 1984 मध्ये तिच्या वडिलांचं दु:खद निधन झालं. तिला हा फार मोठा धक्का होता. त्यातून जन्माला आलेला तिचा काव्यसंग्रह होता ‘अँररॅट’. हे बायबलमधील एका पहाडाचं नाव आहे ज्यावर विश्रंतीसाठी जातात. ‘गेल्या पंचवीस वर्षातील अमेरिकन कवितेमधील सर्वात निर्घृण, पाशवी दु:खाचं  वर्णन करणारा कवितासंग्रह’ असं या संग्रहाचं वर्णन केलं गेलं आहे.
कवयित्री आणि ललित निबंधकार म्हणून यशाच्या शिखरावर असतानाच तिच्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र पडझडीला सुरुवात झाली होती. लुईसनं आपला दुसरा पती जॉनपासून घटस्फोट घेतला. निराशा, मानखंडना,  भंगलेले विवाहसंबंध, व्यावसायिक संकटं, दिशाहीन भ्रमंती, अस्वस्थता, स्वत:च्या आयुष्याचा, शरीराचा, अस्तित्वाचा गाभा यांचा जेव्हा भुसा होतो आणि आयुष्य एक विराट भ्रम आहे हे समजतं, तेव्हा लुईस या वेदना शब्दबद्ध करणारे ललितबंध आणि कविता लिहीत गेली. आत्मचरित्रत्मक बंध तिनं अभिजात ग्रीक आणि रोमन शोकात्म कथांशी जोडून टाकले. तिच्या कवितांचे विषय आयुष्यभर तिनं जो विनाश सोसला त्याच्याशी निगडित आहेत. जवळच्या नात्यांमध्ये आलेलं अपयश,  मृत्यू , जिवाभावाची माणसं हरवून बसणं, चकवा लागून वणवणती भ्रमंती, एकाकीपणातून आलेलं तुटलेपण, जीवन आणि मृत्यूच्या तीव्र प्रेरणा, नात्यात निर्माण होणारे अविश्वासाचे, नैतिकतेचे तिढे. या हरवलेपणातून आणि तुटलेपणातूनच तिनं जगणं स्वीकारलं!  वाटय़ाला आलेल्या दु:खाला लुईस शरण गेली नाही तर तिनं आपल्या थकल्या-भागल्या जिवाला कवितेतील शब्दांमधून दिलासा दिला. कवितेतच आयुष्याचं श्रेयस शोधलं. 
9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकन नागरिकांच्या मनाची भयग्रस्त अवस्था ‘ऑक्टोबर’ या दीर्घ काव्यातून लुईसनं मांडली. ‘मॉक ऑरेंज’ ही तिची कविता स्रीमुक्तीचं गीत म्हणून स्वीकारली गेली. तिनं मात्र स्वत:ला कुठलंही लेबल लावून घेणं स्वीकारलं नाही.  कुठल्याही कळपामध्ये सामील होणं तिनं कायम नाकारलं आणि स्वत:चं स्वच्छ मोकळं आभाळ शोधलं.
लुईस ग्लुकची कविता दूर क्षितिजावर सरकत जाणा:या निळाईप्रमाणो आहे. एखाद्या नवजात अर्भकासारखी. शुद्ध. निष्कलंक. शुभ्र तळपणारी. चैतन्यमय.!

----------------

(लेखिका इंग्रजी साहित्याच्या अभ्यासक आणि प्राध्यापिका आहेत)

pandhareleena@gmail.com

 

 

Web Title: What does the poem of Lewis Gluck, who rose from the ashes and won the prestigious Nobel, say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.