What about homework who do ‘work from home’ ? | ‘वर्क फ्रॉम होम’वाल्यांच्या होम-वर्क चे काय?

‘वर्क फ्रॉम होम’वाल्यांच्या होम-वर्क चे काय?

ठळक मुद्देघरून काम, घरकाम,आणि घरासाठी काम : उत्तरार्ध


 डॉ.प्राचीजावडेकर 
- डॉ.पल्लवीमोहाडीकर-कासंडे

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात  ‘घरून काम, घरकाम आणि घरासाठी काम’ हे तीन शब्द वरचेवर आपण ऐकत आहोत, त्याबाबत गेल्या आठवड्यात लिहिले होतेच.
 घरकाम आणि घरासाठी काम या संकल्पना अजूनही वेगळ्या आहेत. पण आता त्या एकच व्हायला हव्या आहेत, तरंच गृहिणी आणि नोकरदार स्त्रिया यांना त्याचा खरा उपयोग होईल. 
खरे म्हणजे अनेक घरातील कामे जर पुरुषांनी करून पाहिली तर फार कौशल्याची आवश्यकता नसते,  फक्त डोळे उघडे ठेवून ते नीट करायची गरज असते हे त्यांना अगदी सहज पटेल. 
 प्राधान्य कशाला द्यायचे यावर पुन्हा विचार करायची आवश्यकता निर्माण झाली आहे, किंबहुना बहुतेक सर्वच हा विचार करत आहेत. एरवी जे आपण आपल्या संसारात इतके सारे भरून ठेवले आहे त्याची खरंच गरज आहे का आपल्याला, असा विचार आपण सर्वच करत आहोत. मग कपडे, भांडी, दागदागिने हे किती मर्यादित लागते, हे जर पुरते समजले असेल, तर आपले प्राधान्यक्रम बदलतील का? 
या काळात आणखी एक घडले आहे : वर्क फ्रॉम होम. म्हणून घरून ऑफीसचे काम करणे.
कालपरवाची बातमी अशी की टीसीएस ने 75टक्के स्टाफ घरून काम करेल असे सांगितले आहे. म्हणजे ऑनलाईन मीटिंग हे आता घराघरातील वास्तव होणार आहे.आज अनेक जण घरून काम करत आहेतच, त्यामुळे एरवी आपल्या नोकरी करणा-या मैत्रिणी कशा एकावेळी अनेक आपसात काहीही संबंध नसलेली कामे भराभर करतात  तसेच काही करण्याची वेळ घरातल्या कत्र्या पुरुषावर आलीआहे. 
यामुळे दृश्य कसे आहे ?  वेळा बोलले जाते. फार चांगले कपडे घालून बसले नाही तरी चालेल, हा हेतू असतो. पण एखादी महत्वाची मीटिंग असेल तर ते मीटिंगचे वातावरण तयार होण्यासाठी फॉर्मल वेशात यावेच लागेल. यातही व्हिडिओमधून जितका भाग आपला दिसतो आहे तेवढाच महत्वाचा. मग वर चांगला शर्ट आणि खाली घरातली पॅन्ट, बम्युर्डा, असे काही. त्तसेच टेबलावर कामाच्या फाईल्स वैगेरे आणि त्या टेबलाखाली आपण भाजी निवडणे, बटाटे  सोलणे, लसूण सोलणे असे काही! कारण एरवी ही सगळी कामे करणार्या मदतनीस मावशी सध्या येत नाहीयेत.
 हे नोकरदार स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही सारखेच ताणाचे नाही का ?
 फक्त या लॉक डाऊनच्या काळातच नव्हे तर त्या नंतरही सर्वानाच  खाण्यापिण्याच्या बाबतीत फार नखरे करणारे आपले मन थोडे आवरते घ्यावे लागणार आहे. नेहमी साग्रसंगीत स्वयंपाक होईलच असे नाही, अगदी सणासुदीला देखील, जे अत्यंत आवश्यक आहे तेवढेच करू असे जर झाले तर आजची गृहिणी हकनाक होणा-या शारीरिक कष्टातून वाचेल आणि अधिक सृजनशील काही करू लागेल. तसेच माङो काम मी अगदी व्यवस्थित करेन असे जर प्रत्येकाने ठरवले तर कितीतरी काम निर्माणच होणार नाही. 
अगदी साधे उदाहरण घेऊ. पाणी पिऊन झाले की आपापला ग्लास विसळून ठेवणो, कोणीतरी चहा कॉफीच्या कपबशा विसळणे, कोणी कपड्यांच्या घड्या घालून ठेवणे हे तर काहीच कष्टाचे नाही, पण एकाच बाईने ते सारे करायचे झाल्यास ते वेळखाऊ आणि कंटाळवाणो ठरते, मग ती गृहिणी असो किंवा नोकरी करणारी.
एक दोन फोटो असेही दिसले सोशल मीडिया वर की तरुण जोडपी, नवीन लग्न झालेले, दोघेही नोकरी करणारे, घरात तिसरे कोणी नाही, दोघेही वर्किंग फ्रॉम होम वाले; त्यामुळे मग त्यांच्या  ‘घरचे काम, घरासाठी काम’ फारसे कोणी करत नाही. त्यामुळे पलंगावर कपड्यांचा ढीग आणि स्वैपाकघरात ओट्यावर खरकटी भांडी रचून ठेवलेली.. कोणी करायचे हा प्रश्न. अनावश्यक कामे कमी करायची याचा अर्थ घरातल्या कामाच्या ढीगाला कुणीच हात लावायचा नाही, असा नव्हे! 
- जरी कंटाळवाणे काम असले तरी जेव्हांचे तेव्हा करून टाकले तर ते उरतच नाही. कोणी करायचे या प्रश्नाचे उत्तर मात्र  ‘दोघांनी मिळून’ असेच असायला हवे आहे.
गृहिणी आणि त्यांचे पती हा विचार करताना घरातील मुले काय करत आहेत हे पाहायला हवेच. त्यांना स्वयंशिस्तीचे धडे मिळाले का, स्वावलंबनाची सवय लागली का, घरातली कामे आपणहून दिसायला लागली का ? मैत्रिणींनो, हा प्रश्न आपण आपल्याला विचारू. मुले लाडकी आहेतच आपली पण आज आपल्यावर जी वेळ आली तशीच भविष्यात त्यांच्यावर आली तर? त्यांना आत्तापासूनच याची सवय लागायला हवी.. जी कायमस्वरूपी असायला हवी. जरी उद्या कामवाली मदतनीस मावशी घरी आली तरी काही कामे ज्याने त्याने कायमच आपापली केली तर कितीतरी ओङो कमी होणार आहे गृहिणींवरचे.
हे  कामाचे ओझे का असते, हेही अनेक मुलांना आणि पुरुषवर्गाला पटले असेल नक्की. कारण एरवी साधा चहा तर करायचा आहे , असे मनात येणे सोपे होते, पण आता एकीकडे बॉसशी बोलता बोलता स्वत:साठी चहा कॉफी करून घ्यायची वेळ आली असेल तर किती क्रिया त्यासाठी कराव्या लागतात हे नक्की समजले असणार.  ‘आज पराठे खावेसे वाटत आहेत’, अशी  इच्छा व्यक्त करून एरवी भागत होते पण आज घरात निरीक्षण करून समजले असणार की एक मेथीचा पराठा करायचा असला तर काय काय सामान लागते, किती तयारी करावी लागते.
गमतीदार पण वास्तव सांगणारी एक सांख्यिकी इथे आठवली. घरातल्या  कामांमध्येही हजारो क्रिया सामावलेल्या असतात. मग ती घराची स्वच्छता असेल किंवा स्वयंपाक. जर वेळ वाचवून ही कामे करायची असतील तर ती मनात आधीच आयोजन करून केली तर कमी वेळात होऊ शकतात, असे आपल्या गिलबर्थ ने टाइम अँड मोशन स्टडी मध्ये सांगितले आहे. जर आजचे तरुण वेळेचे  व्यवस्थापन शिकले तर त्याचा फायदा त्यांनाच होणार आहे. भूक लागली की सरळ ऑनलाईन ऑर्डर करणारे तरुण थोडा फार स्वयंपाक शिकले तर पैसे वाचतीलच आणि शिवाय जंक फूड पोटात जाणोही वाचेल. 
एक निरीक्षण असेही की एरवी आजारी माणसांनी भरभरून वाहणारी हॉस्पिटल्स सिरीयस केसेस सोडल्या तर सध्या रिकामी आहेत. उगाच कशाला जायचे असाही विचार केला असेलच अनेकांनी पण तब्येतीचे प्रश्नही घरचे साधे खाऊन कमी झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळेवर खाणो या एका गोष्टींने  खूप बदल घडवला आहे आज आपल्या दैनंदिन जगण्यात. ब्रँडेड कपडे ते ब्रँडेड खाणो याची व्याख्या आता  ‘घरचे सुटसुटीत’ अशी झाली आहे. हॉटेलिंग शून्यावर आल्यामुळे घरी बसूनही वजन वाढले नाहीच, तर थोडे कमीच झाले असेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे.  
कामाची विभागणी आणि नियोजन जे एरवी आपण नोकरी व्यवसायाच्या बाबतीत करतो तेच फक्त घरी करायचे आहे. थोडा असाही विचार करू की जितके घरातले काम आपण एरवी करत होतो त्या सगळ्याची गरज आहे का ? यातले कमी कोणते करता येईल किंवा अगदी जरुरीचे आहे ते कोणते? 
- एकुणात हे असे विषाणूंचे हल्ले आपल्याला स्वच्छता आणि आरोग्याकडे निश्चित नेणार आहेत. मग वर लिहिल्याप्रमाणो कपड्यांचे ढीग आणि खरकट्या भांड्यांचे मनोरे हे नक्कीच उपयोगाचे नाहीत. जरूरीपुरते काम वेळच्या वेळी आणि व्यवस्थितपणे होणे हे आवश्यक आहेच. जसे आपण बॅक ऑफिस जॉब असे म्हणतो तसे एरवी आपले जीवन सुकर व्हावे म्हणून  ‘घरचे काम’ हे बॅक ऑफिस जॉबच नाही का? तसेच ते आता एकट्या घरातल्या स्त्रीने न करता सर्वांनी वाटून घेतले तर सर्वांना स्वयंशिस्त आणि स्वावलंबनाचे धडे मिळून त्या गृहिणीचे कष्ट हलके होणार नाहीत का? चवीसाठी काय खायचे आणि आरोग्यासाठी काय खायचे हे जर ठरवून घेतले तर रोज वकिर्ंग लंच मध्येही भागेल आणि मग सण- उत्सवही मर्यादित पण हौसेने साजरे करता येतील.
मंडळी, ही एक तपश्चर्याच आहे जणू! ज्याने आपले आत्मबलही वाढणार आहे आणि निश्चित मन:शांतीच्या दिशेने आपल्याला घेऊन जाणार आहे.आपले विनोबाजी, गांधीजी यांनी जे शिकवले ते नकळत आज या काळात आपण अवलंबत आहोत.तसेच, घरकाम, घरासाठी काम, घरून काम म्हणजेच जगण्यासाठी आवश्यक तेवढे काम हे स्वीकारून श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितला तसा हा या लॉकडाऊनच्या निमित्ताने एक नवीन कर्मयोगच आपण आत्मसात करतो आहोत. 
- हाच कर्मयोग उद्याचे न्यू नॉर्मल होणार आहे आणि आपल्याला मार्गस्थ करणार आहे !!.

-----------------------------------------------------------------------

लॉकडाऊनचे धडे
1. कोविड आपत्तीच्या रुपाने सर्वच जगावर आलेला हा प्रसंग नक्कीच चांगला नाही. असे कधीच पुन्हा होऊ नये. 
2. पण यामुळे लॉकडाऊन च्या काळात आपल्याला जे विविध धडे मिळाले आहेत ते कायमच लक्षात ठेवले तर?
3.  यापुढचे रोजचे जगणेआपण साधे, सोपे केले तर कितीतरी ताण आपल्याच खिशावरचे कमी होऊन मर्यादित साधनांचा वापर करून अमर्याद समाधान असलेले आयुष्य आपण स्वत:ला देऊ शकू असे नाही का वाटत? 
4. तसेच घरकाम, घरासाठी काम आणि घरून काम हे सारे एकत्र करून जगण्यासाठी आवश्यक ते ते काम असे नवे नामकरण केले तर .?
5.  घरातला आणि पर्यायाने आपल्या समाजातला प्रत्येकजण जबाबदार, स्वावलंबी होईल नाही का ?

(  डॉ.प्राचीजावडेकर  ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि संशोधक आहेत.)

 pracheepj@gmail.com

(डॉ.पल्लवीमोहाडीकर-कासंडे मानसतज्ञ आणि समुपदेशक आहेत.) 

Web Title: What about homework who do ‘work from home’ ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.