Join us  

वजन कमी करायचं ना, भात बंद करा! हा सल्ला मुळीच ऐकू नका, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 2:57 PM

भात बंद करा असा सल्ला वजन कमी करणाऱ्यांना मिळतो, काहीजण म्हणतात फक्त दोनदाच जेवा ते उत्तम, पण आपल्यासाठी काय योग्य हे कसं ठरवाल?

ठळक मुद्देआधी आपल्याला किती कमी कॅलरीज खायच्या आहेत, ते जाणून घ्या, त्यानुसार आहारातील कार्ब्ज, प्रोटीन, फॅटस यांचे नियोजन करा आणि ते दिवसभरात कधीही खा.(फोटो सौजन्य -सर्व छायाचित्रं गुगल)

- स्वप्नाली बनसोडे.

वजन कमी करायचंय? ताबडतोब भात बंद करा/फक्त ब्राऊन राईस खा- वजन कमी करणाऱ्यांना अगदी हमखास मिळणारा हा सल्ला. आणि त्यात वजन कमी करू इच्छिणाऱ्या काही जणांना भात अगदी मनापासून आवडत असतो. किंवा भात हेच त्यांचं स्टेपल फूड असतं. (उदा. किनारपट्टीच्या भागात- कोकण, केरळ इ. मध्ये राहणारे लोक) मग त्या लोकांनी खायचं काय? भात सोडूनच द्यायचा की काय? दोस्त लोग- फिकर नॉट. तुम्हांला वजन कमी करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही भात खाऊ शकता. फक्त आपला डेफिशिट आणि कॅलरीज मोजण्याचा मंत्र मात्र लक्षात ठेवायचा. उलट वजन कमी करण्यासाठी भात हा एक्सलंट ऑप्शन आहे. कारण बऱ्याचदा होतं असं की दिलेल्या कार्ब्जच्या कॅलरीत, जेमतेम एक किंवा दोन पोळ्या बनतात. त्याने पोट पूर्ण भरतच नाही. पण त्याच वजनाचा तांदूळ तुम्ही शिजवलात, तर तो शिजून जवळपास तिप्पट होतो. शिवाय त्यात पाहिजे तितक्या भाज्या, डाळी, प्रोटीन सोर्सेस, अंडी, चिकन, पनीर, सोया चंक्स घालून तुम्ही पुलाव- बिर्याणी बनवू शकता. याने पोटही भरेल, प्रोटीनही पोटात जाईल आणि डाएटही तुटणार नाही. मुख्य म्हणजे भात खाल्ल्याने एक वेगळं समाधान मिळतं, शिवाय ब्राऊन राईसमधून जितक्या कॅलरीज मिळतात तितक्याच साध्या पॉलिश्ड/ बासमती तांदुळातूनही मिळतात. त्यामुळे भाताला घाबरू नकात, फक्त मोजून मापून भात खा.

 

अजून एक सल्ला म्हणजे  वजन कमी करायचंय ना? मग इंटरमिटंट फास्टिंग करा.वजन कमी करू इच्छिणारे अनेक लोक आहेत, हे लक्षात आलं की डाएटच्या दुनियेत वेगवेगळी फॅडस येतात. फक्त प्रोटीन आणि फॅटस खाऊन किटो करा, दिवसांतून दोनदा किंवा एकदाच जेवा, दिवसांतून पाच वेळेला जेवा. लक्षात घ्या तुम्ही दिवसांतून किती वेळा खाताय यामुळे तुमच वजन कमी होत नाही, तुम्ही काय आणि किती खाताय, मोजूनमापून, गरजेपेक्षा कमी खाताय ना? केवळ या एकाच गोष्टीने तुमचं वजन कमी होतं. दोन जेवणांत १६ तासांचं अंतर किंवा२४ तासांतून एकदाच जेवणं ज्याला इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात, ही एक 'डाएटिंग स्ट्रॅटेजी' आहे, हे कुठल्या वेगळ्या पद्धतीचे डाएट नव्हे. मुळात तुमच्या लाईफस्टाईलला किती वेळा खाणं सूट होतं, हे बघून तुम्ही दिवसातून किती वेळा खायचं ते ठरवा. उदा. मला १७०० कॅलरीज खाण्याची परवानगी आहे, आणि मला सकाळी उठल्यावर खूप भूक लागते, तर मी अगदी ६००-७०० कॅलरीजचा चहा- नाश्ता सकाळी करायला हवा. उरलेल्या कॅलरीजमध्ये दिवसातली इतर जेवणं बसवायला हवीत. मात्र मी एखादी कामात- अभ्यासात बिझी व्यक्ती आहे, मला सकाळी उठल्या- उठल्या भूक लागत नाही, किंवा सारखं नाश्ता, स्नॅक्स, जेवणं बनवणं यात स्वयंपाकात वेळ घालवायला आवडत नाही, तर मी दिवसातून फक्त दोनदाच जेवणं, इंटरमिटंट फास्टिंट (IF) करणं प्रेफर करेन. किंवा IF ने मला माझं डाएट शिस्तीत पाळायला मदत होणार असेल, तर मी त्या प्रकारे वागावे. मात्र भूक सहनच होत नसताना उगाच या प्रकारांच्या वाटेला जाऊ नये, याने तुमचे एक्स्ट्रा वजन कमी होणार नाहीए. बाकी इंटरमिटंट फास्टिंगचे इतर दीर्घकालीन फायदे असू शकतात, पण त्यावर अजून संशोधन सुरू आहे.

 

केवळ वजन कमी करणं हेच एक उद्दिष्ट असेल, तर आधी आपल्याला किती कमी कॅलरीज खायच्या आहेत, ते जाणून घ्या, त्यानुसार आहारातील कार्ब्ज, प्रोटीन, फॅटस यांचे नियोजन करा आणि ते दिवसभरात कधीही खा. बाकीच्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेऊ नका. लक्षात ठेवा- Calorie is a King and Protein is the Queen. तुम्हांला दोन्ही नीट पाळणं आवश्यक आहे.

(लेखिका अमेरिकािस्थित डाएट आणि फिटनेस एक्सपर्ट आहेत.)Instagram- the_curly_fithttps://www.facebook.com/fittrwithswapnali

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्स