Join us  

डिटॉक्स डाएट, डिटॉक्स ड्रिंक, डिटॉक्स पिल या शब्दांच्या चक्रव्यूहात अडकण्यापूर्वी हे वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 1:51 PM

डिटॉक्स ही मुळात आपली गरज असते का? आपलं शरीर तर कायम डिटॉक्स मोडवर असतंच.

ठळक मुद्दे डिटॉक्स दीर्घ कायमस्वरूपी लाइफस्टाइल चेंज म्हणून वापरा.

आदिती प्रभू

‘डिटॉक्स’ हा आता गेली काही वर्षे बझवर्ड बनला आहे. आजही डिटॉक्स शब्द ऐकला की अनेकजण हुरळून जातात. डिटॉक्स वॉटर, डिटॉक्स ड्रिंक्स, डिटॉक्स पिल्स किंवा पॅक्स आणि डिटॉक्स डाएट्सही! पण हे डिटॉक्स आणि डिटॉक्स डाएट्स नक्की असतं काय?शास्त्रीय भाषेत सांगायचं तर डिटाॅक्स म्हणजे शरीरातून टॉक्सिन्स अर्थात विषारी द्रव्य बाहेर काढणं. ड्रग्ज, औषधं, मद्य, रसायनं, विष या साऱ्यात ही टॉक्सिन्स असतात आणि ती बाहेर काढायची प्रक्रिया वैद्यकीय असते.

डिटॉक्स डाएट्सही सर्वस्वी वेगळी गोष्ट. असा दावा केला जातो की, हे डाएट केले तर ते शरीराबाहेर टॉक्सिन्स काढतात. वातावरणातून शरीरात गेलेल्या विषारी घटकांपासून ते मद्य रसायनं, पेस्टीसाइड्स हे सारं ते बाहेर काढतात. याशिवाय वजन कमी करणे, तब्येत सुधारणे, त्वचा आणि केसांचा पोत सुधारणे असेही दावे ते करतात. अशी यादी बरीच मोठी होते. मात्र, खरं सांगायचं तर या दाव्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही.त्यातही डिटॉक्स म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगळ्या गोष्टी असू शकतात. त्यामुळे डिटॉक्स म्हणजे नक्की काय हे समजून घेतलं पाहिजे.

 

 

डिटॉक्स टाईप्सचे प्रकार आणि ते काम नक्की कसं करतात?

डिटॉक्स डाएटचे अनेक प्रकार आहे. डिटॉक्स आणि क्लिंझेस या दोन वेगळ्या संकल्पना आहेत, त्या परस्परांऐवजी वापरल्या जातात.डिटॉक्स डाएटचे वर्गीकरण काही गोष्टींवरून केलं जातं. मुदत - ( उदा. ३ दिवस, ७ दिवस, १० दिवसांचा डिटॉक्स), दुसरं म्हणजे घटक पदार्थ (म्हणजे प्लाण्टबेस्ट, फ्रुट बेस्ड किंवा भाज्यांवर केलं जाणारं डिटॉक्स), तिसरं म्हणजे पदार्थांचा पोत. (लिक्विड डिटॉक्स, रॉ फूड डिटॉक्स) आणि चौथं म्हणजे अवयवकेंद्री डिटॉक्स डाएट ( उदा. लिव्हर, त्वचा, मलमार्ग डिटॉक्स). काही प्रकारच्या डिटॉक्स डाएटमध्ये सप्लिमेण्ट्स, लॅक्झॅटिव्हज, हर्ब्ज यांचाही उपयोग केला जातो.

या सगळ्या डाएटचा पाया काय तर कॅलरी रिस्ट्रीक्शन. अगदी ६०० ते ८०० कॅलरीपर्यंतही ही कॅलरी रिस्ट्रीक्शन जाऊ शकतं. डाएटमधून प्रक्रिया केलेलं अन्न, दारू, कॅफीन, शुगर हे सारं बाजूला ठेवलं जातं. काही डाएटमध्ये काही पदार्थच नाकारले जातात. म्हणजे फळं, भाज्या, मांसाहार. म्हणजे काय तर डिटॉक्स डाएट असा काही स्ट्रक्चर असा फॉरमॅट, एकच एक प्रमाण उपलब्ध नाही.आता अशी डिटॉक्स डाएट केली तर आपोआप वजन घटणारच आहे; पण हे अशा प्रकारे वजन उतरणं काही आरोग्यकारक नाही. डिटॉक्समधून मिळणारे दुसरे फायदेही अल्पजिवीच असतात.

डिटॉक्स खरंच गरजेचा आहे?

तांत्रिकदृष्ट्या सांगायचं तर आपलं शरीर हे कायम डिटॉक्स मोडवर असतंच. फुप्फुस, त्वचा, लिव्हर, मूत्रपिंड, मलमार्ग हे सारे आपल्या शरीरातून टॉक्सिन्स, विषारी द्रव्य बाहेर काढण्याचं काम सदोदित करत असतात. काही आजार असतील तर त्यात अडचणी येतात. म्हणजे तुम्ही जर उत्तम संतुलित आहार घेत असाल, तुमची लाइफस्टाइल उत्तम असेल, तर तुम्हाला वेगळ्या डिटॉक्सची काहीही गरज नाही. डिटॉक्स हे एक मार्केटिंग गिमिक आहे. त्यापेक्षा आपल्या शरीराला पोषक, पूरक खाणं, तब्येत उत्तम राखणं हे लक्ष्य हवं.आणि एवढं वाचूनही जर तुम्ही डिटॉक्स करणारच असाल तर किमान या काही गोष्टी लक्षात ठेवा.

डिटॉक्स सुरू करण्यापूर्वी..

१. आधी प्रोसेस्ड फूड, दारू, साखर, जंक फूड खाणं बंद करा.२. स्थानिक फळं, भाज्या जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा.

३. प्रत्येक जेवणात आपण पुरेसं प्रोटिन खातो आहोत ना, हे तपासा.४. आपलं रुटीन ठरवा, ते नियमित सांभाळा.

५. व्यायाम रोज करणं आवश्यकच आहे.६. भरपूर पाणी प्या.

७. स्ट्रेस आला तर त्याचा निचरा होईल, पुरेशी झोप होईल हे कटाक्षाने सांभाळा.८. हे एवढं केलं तरी तुम्ही अर्धी लढाई जिंकलीच.

आता डिटॉक्स करणारच असाल तर..

१. जे डिटॉक्स डाएट तुम्ही करणार, त्याची संपूर्ण माहिती मिळवा.२. डॉक्टरचा सल्ला घ्या, तुम्हाला काही आजार असतील आधीचे तर ते डॉक्टरांना सांगा.

३. निष्णात प्रशिक्षित डायटिशिएन, न्यूट्रिशनिस्ट यांचा सल्ला घ्या, तुम्हाला हवंच असेल तर तुमची तब्येत, गरज, तुम्हाला डिटॉक्स का करायचं हे पाहून ते तुम्हाला डिटॉक्स डाएट सुचवतील.

डिटॉक्स करताना..

१. लहान मोजक्या दिवसांचं डिटॉक्स करा. ३ ते ७ दिवस.

२. शरीराचं ऐका, नोंदी ठेवा. काही त्रास, अस्वस्थ वाटलं तर डायटिशिएनला सांगा.३. मळमळ, उलट्या, डाेकेदुखी, थकवा हे सारं लो कॅलरी डाएटमध्ये होऊ शकतं, त्याची तयारी ठेवा.

४. बीपी, शुगर लेव्हल यावर लक्ष ठेवा.५. जास्त काम टाळा.

डिटॉक्स झाल्यावर..

१. लगेच आधीच्या टीनवर जाऊ नका. हे डिटॉक्स दीर्घ कायमस्वरूपी लाइफस्टाइल चेंज म्हणून वापरा. आणि लक्षात ठेवा की, डिटॉक्स मार्केटिंग गिमिक्स आहे, त्याला बळी न पडता, चांगले ते विचारपूर्वक तेवढे घ्या.

( लेखिका न्यट्रिशनिस्ट, डायबिटिक एज्युकेटर, न्यूट्रिजेनॉमिक्स काऊन्सिलर आहेत.)Website: www.aditiprabhu.comInstagram: @nutritionistaditiprabhu

टॅग्स :पौष्टिक आहार