Join us  

मलायका अरोराने बनवलेल्या तिळाच्या चिक्कीची चर्चा! ती म्हणते, पौष्टिक चिक्की खा आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 6:53 PM

आपल्या फिटनेसबाबत अतिशय जागरुक असणारी मलायका संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आपले डाएट नियम मोडणार नाही असे पण चविष्ट पदार्थ निवडते. मलायका आपल्या आहारात ताज्या भाज्या, ताजी फळं यांना महत्त्व देते शिवाय काही पदार्थ विशिष्ट वेळी खाल्ले तर ते पोषक ठरतात याची चांगली जाणीव मलायकाला आहे. म्हणूनच संध्याकाळी मनाला आणि जिभेला आनंद देणारा पौष्टिक पदार्थ कोणता यावर मलायकानं तिळाच्या चिक्कीचा पर्याय सांगितला आहे.

ठळक मुद्देतिळाची चिक्की खाल्ल्याने शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा लगेच मिळते. मनावरचा ताण घालवण्यासाठी तिळाची चिक्की खाणं उत्तम उपाय आहे.संध्याकाळची भूक भागवण्यासाठी नुसता चवीचा नाही तर फिटनेसचाही विचार करावा हेच मलायका आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या स्टोरीतून सुचवते.

दिवसभर आपण कामात असतो तेव्हा भुकेची एवढी जाणिव होत नाही. पण संध्याकाळी मात्र खूप भूक लागते. अनेकांना दिवसभरात संध्याकाळी जास्त भूक लागते.  पण ही भूक भागवण्यासाठी पोळी भाजी खायची नसते. काहीतरी असं हवं असतं ज्यामुळे मस्त काहीतरी खाल्ल्याचा आनंद मिळेल आणि भूकही शमेल. संध्याकाळी स्नॅक्स म्हणून मग गोड पदार्थ, चटकमटक पदार्थ खावेसे वाटतात. पण हे पदार्थ खाताना जर केवळ चवीकडे, पदार्थाच्या मोहाकडेच लक्ष दिलं तर मात्र त्याचा परिणाम आरोग्यावर,वजन वाढण्यावर होतो. याबाबतीत मलायका अरोराला मानायला हवं. आपल्या फिटनेसबाबत प्रचंड जागरुक असणारी मलायका संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आपले डाएट नियम मोडणार नाही असे पण चविष्ट पदार्थ निवडते. मलायका आपल्या आहारात ताज्या भाज्या, ताजी फळं यांना महत्त्व देते शिवाय काही पदार्थ विशिष्ट वेळी खाल्ले तर ते पोषक ठरतात याची चांगली जाणीव मलायकाला आहे. म्हणूनच संध्याकाळी मनाला आणि जिभेला आनंद देणारा पौष्टिक पदार्थ कोणता यावर मलायकानं तिळाच्या चिक्कीचा पर्याय सांगितला आहे.

Image: Google

मकर संक्रातीनिमित्तानं तिळाची चिक्की आपण सगळ्यांनीच खाल्ली आहे. आता तर बाहेरही तिळाची चिक्की मिळते. पण तिळाची चिक्की ही काही संक्रातीला आणि तिच्या आगेमागेच खावी असं नाही. तर आपली संध्याकाळची भूक भागवण्यासाठी तिळाची चिक्की उपयुक्त आहे, हे सांगण्यासाठी मलायकानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउण्टवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ही स्टोरी पोस्ट करताना तिनं तिळाच्या चिक्कीचा फोटो टाकला असून ही चिक्की घरी बनवली असल्याचंही मलायका आवर्जून सांगते. मलायकानं तिळाची चिक्की साखर घालून केली आहे. ही चिक्की चिक्कीचा गूळ वापरुन गुळातही करता येते. 

तिळ चिक्की खाण्याचे अनेक फायदे असल्याचं मलायकानं म्हटलं आहे. त्यात दोन फायदे ती प्रामुख्यानं सांगते. तिळाची चिक्की खाल्ल्यानं मस्त काहीतरी खाल्ल्याचा अनुभव येतो. पोट भरतं, समाधान मिळतं.  आपण म्हणून संध्याकाळी भूक लागली की अधून मधून तिळाची चिक्की खात असल्याचं मलायका सांगते. 

मलायका अरोराच्या या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे तिळाच्या चिक्कीच्या फायद्यांकडे फॅन्सचं लक्ष वेधलं गेलं. तसेच मलायका घरच्या घरी तिळाची चिक्की करु शकते, संध्याकाळची भूक भागवण्यासाठी स्नॅक्स म्हणून ती जर तिळाची चिक्की खात असेल तर आपणही याला का महत्त्व देऊ नये अशा प्रतिक्रिया मलायकाच्या फॅन्समधे उमटल्या. केवळ मलायका सांगते म्हणून नाही , तर तिळाची चिक्की खाण्याचे फायदे आरोग्य तज्ज्ञ आणि आयुर्वेदिक तज्ज्ञही सांगतात. 

Image: Google

काय आहेत तिळ चिक्की खाण्याचे फायदे?

1. तिळामधे तेलाचं प्रमाण जास्त असतं.  तिळाची चिक्की खाल्ल्याने नैसर्गिक रित्या आपल्या शरीराल स्निग्धता मिळते. तसेच तिळाच्या चिक्कीतील फायबरमुळे पचन चांगल होतं. 

2. तिळाची चिक्की खाल्ल्याने कोलेस्टेराॅल नियंत्रित राहातं. कारण तिळामधे 'लिग्नन्स' नावाचा घटक असतो जो कोलेस्टेराॅलचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी ओळखला जातो. 3. तिळाची चिक्की खाल्ल्यानं शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. कारण तिळामधे असलेल्या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे लहानसहान आजारांच्या संसर्गाशी लढण्याची शरीराची ताकद वाढते. 

4. मौखिक आरोग्य सुधारण्यासाठीही तिळाची चिक्की उत्तम मानली जाते. कारण तिळामधे जिवाणुविरोधी घटक असतात. म्हणूनच तिळाचे पदार्थ खाल्ल्यानं तोंडात निर्माण होणाऱ्या जिवाणुंवर नियंत्रण येतं. 

5. तिळाची चिक्की खाल्ल्यानं शरीराला ऊर्जा मिळते. कामाचा उत्साह वाढतो. समाधान मिळतं. 

6.  तिळाची चिक्की रुचकर असते त्यामुळे तिळाची चिक्की खाल्यानं मनाला आनंद मिळतो तसेच मनावर असलेला तणाव निवळतो.

7. तिळाची चिक्की प्रमाणात खाल्ल्यास शरीराला हव्या असलेल्या ऊर्जासोबतच हवी असलेली ऊबही मिळते. 

Image: Google

घरच्याघरी तिळाची स्वादिष्ट चिक्की कशी कराल?

तिळाची चविष्ट आणि कुरकुरीत चिक्की करणं एकदम सोपं आहे. ही चिक्की करताना वेळ जास्त लागत नाही तसेच सामग्रीही खूप लागत नाही. तिळाची चिक्की करण्यासाठी 200 ग्रॅम तीळ, अर्धा किलो साखर, 1 कप पाणी, 1 छोटा चमचा बेकिंग सोडा घ्यावा. 

Image: Google

सर्वात आधी तीळ स्वच्छ निवडून कढईत तडतडेपर्यंत भाजून घ्यावेत. ते गार होवू द्यावेत. तीळ भाजताना गॅस मंद असावा. तीळ गार होईपर्यंत साखरेचा पाक करुन घ्यावा. त्यासाठी  भांड्यात साखर आणि एक कप पाणी घालून गॅस लावावा. साखर विरघळू द्यावी. साखर पूर्ण विरघळली,  की गॅसची आच वाढवून मिश्रण उकळू द्यावं. गोळी बंद पाक झाला की तिळ टाकून  दोन मिनिटं  मिश्रण सारखं हलवत राहावं. मग गॅस बंद करावा. त्यात बेकिंग् सोडा घालून मिश्रण पुन्हा नीट हलवून घ्यावं. नंतर आधीच तूप लावून सेट केलेल्या पसरट ताटात मिश्रण ओतावं आणि ते गरम असतानाच वाटीनं थापावं. नंतर लाटण्यानं पातळ लाटून घ्यावं. त्याच्या चाकूने छोट्या मोठ्या वड्या पाडाव्यात. इतक्या सोप्या पध्दतीनं तिळाची पौष्टिक चिक्की करता येते. 

टॅग्स :अन्नमलायका अरोराआहार योजना