Join us  

पावसाळ्यात प्या मस्त गरमागरम सूप, हेल्दी सूपचे ३ झटपट टेस्टी प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 1:37 PM

पावसाळ्यात अपचनाचा त्रास होतो. त्यामुळे साहजिकच जेवण जरा सांभाळून करावे लागते. म्हणूनच आरोग्य सांभाळण्यासाठी पावसाळ्यात भरपूर सूप घ्या, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

ठळक मुद्देटोमॅटो सूपमध्ये जर बटाटा टाकला तर कॉर्नफ्लोअर टाकण्याची गरज पडत नाही. पावसाळ्यात स्वीटकॉर्न भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे त्याचा आरोग्यासाठी फायदा करून घेतलाच पाहिजे.

पावसाळ्यात अगदीच भरपेट जेवण करणे, योग्य नसते. कारण पावसाळ्यात जठराग्नि मंद असल्याने पचनाच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यातही डिहायड्रेशन होऊ नये आणि शरीरात पोषणमुल्यांची कमतरता निर्माण होऊ नये, म्हणून भरपूर प्रमाणात सूप घ्यावे. सूप सेवन केल्यामुळे शरीरातील पाणी पातळीही संतूलित राहते आणि शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनमुल्येही मिळतात. 

 

१. टेस्टी ॲण्ड यम्मी टोमॅटो सूप टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पावसाळ्यात टोमॅटो सूप भरपूर प्रमाणात घ्यावे. आजारी माणसांनाही अनेकदा टोमॅटो सूप घेण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय वजन कमी करण्यासाठीही टोमॅटो सूप फायदेशीर ठरते. कसे करायचे टोमॅटो सूपटोमॅटो सूप करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. यासाठी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आणि एक लहान कांदा व बटाटा घ्यावा. टोमॅटोच्या देठाचा भाग काढून टाकावा. आणि चाकूने टोमेटोलो तीन- चार छिद्रे पाडून घ्यावीत. कांद्याच्या कापून चार फोडी करून घ्याव्यात. बटाट्याची साले काढून घ्यावीत.

 

कांदा, बटाटा आणि टोमॅटो आणि त्यात तीन ते चार लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि जीरे असे सगळे कुकरच्या डब्यात टाकावे आणि दोन ते तीन शिट्या करून शिजवून घ्यावे. यानंतर कुकर थंड झाल्यावर हे सगळे मिश्रण मिक्सरने अगदी बारीक करून घ्यावे. यानंतर गाळणीने हे मिश्रण गाळून घ्यावे आणि थोडे पाणी टाकून उकळायला ठेवावे. यामध्ये चवीनुसार मीठ, मीरे पूड, साखर टाकावी. एक उकळी आली की थोडेसे बटर टाकावे आणि गरमागरम सुप सर्व्ह करावे. टोमॅटो सूपमध्ये जर बटाटा टाकला तर कॉर्नफ्लोअर टाकण्याची गरज पडत नाही. 

२. स्वीट कॉर्न सूप पावसाळ्यात स्वीटकॉर्न भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे त्याचा आरोग्यासाठी फायदा करून घेतलाच पाहिजे. स्वीटकॉर्न सूप करण्यासाठी सगळ्यात आधी स्वीटकॉर्न थोडेसे मीठ टाकून वाफवून घ्यावे.

 

वाफवलेल्या स्वीटकॉर्नपैकी अर्धे स्वीटकॉर्न मिक्समधून फिरवावेत आणि त्याची एकदम बारीक पेस्ट करावी. आता कढईमध्ये थोडेसे बटर टाकावे. यामध्ये तीन ते चार लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून टाकाव्या. थोडेसे किसलेले अद्रक टाकावे. गाजर, कोबी यांचे छोटे- छोटे चौकोनी तुकडे करून ते देखील चांगले परतून घ्यावे. यानंतर एखादी मिरची मधोमध उभी कापून टाकावी. यानंतर अर्धा कप दध टाकावे आणि त्यानंतर पाणी टाकावे. तसेच मिक्सरमधून वाटून घेतलेली स्वीटकॉर्नची पेस्ट आणि स्वीटकॉर्नचे वाफवलेले दाणे टाकावेत. थोडी उकळी फुटायला लागल्यावर चवीनुसार मीठ, जीरे पुड, मीरे पुड आणि थोडीशी साखर टाकावी. सोया सॉस टाकूनही हे सूप छान लागते. सूप जर घट्ट करायचे असेल, तर थोडे कॉर्नफ्लोअर टाकावे.

 

३. क्रिम गार्लिक मशरूम सूपमशरूम चांगले धुवून घ्या आणि त्याचे दोन- दोन तुकडे करून घ्या. कढईमध्ये ऑलिव्ह ऑईल टाकून त्यात मशरूम आणि बारीक चिरलेला लसून मीठ आणि काळी मिरी टाकून परतून घ्या आणि त्यानंतर मशरूम चांगले शिजवून घ्या. तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये बटर टाका. बटर वितरळ्यावर मैदा टाका. मैद्याचा रंग थोडासा बदलला की त्यामध्ये मशरूम आणि व्हेजिटेबल स्टॉक टाका. आता त्यामध्ये थाईम टाका आणि हे मिश्रण वारंवार हलवत रहा. सूप घट्ट होण्यास सुरूवात झाली की त्यामध्ये थोडा सोया सॉस आणि फ्रेश क्रिम टाका. 

 

टॅग्स :अन्नपाककृती