शुभा प्रभू साटम
कोरोनाकाळात जेवताखाताना लोक दोन गोष्टींची चर्चा करतात. पोषक आहार आणि इम्युनिटी. पण पोषक आहार म्हटलं की प्रथम मनात काय येतं? पौष्टिक म्हणजे महाग. सुका मेवा,दूध किंवा महाग फळं हेच डोळ्यासमोर येतं. आणि मग मनात येतं, की हे सारं फार महाग आहे आपल्याला परवडणार नाही. मात्र तसं नाही, अगदी पौष्टिक पण सकस, स्वस्त पण सकस हे सूत्र नक्की जमू शकतं.मी काही वर्षे श्रमिक वर्गातील स्त्रियांसाठी अभ्यासवर्ग घेत होते, हातावर पोट असणाऱ्या त्या गरीब बायकांना तुम्ही फळं खा हे सांगणं म्हणजे क्रूर चेष्टा ठरली असती. गंमत म्हणजे त्यांच्याही डोक्यात हाच विचार होता की ते भारीतलं खाणं आपल्याला कसं परवडणार? पण पौष्टिक म्हणजे महाग हा विचार किंवा सांगड चूक आहे.थोडा विचार केला तर आपल्याला दिसते की आपले पारंपरिक पदार्थ किंवा आहार आहे तो हवामान,ऋतु,आणि नैसर्गिक परिस्थिती यांना अनुसरून असतो,कोकणात नारळ भरपूर आणि देशावर शेंगदाणे,तीळ..हे अगदी साधं उदाहरण. जागतिकीकरण झाले,जग झपाट्याने जवळ आले,माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे प्रगती झाली.आणि याच टप्प्यावर कुठेतरी आपल्या आहारविषयक सवयी बदलत चालल्या.इथे प्रगतीला नावे ठेवायची नाहीत की आपल्या भूतकाळाचे गोडवे गायचे नाहीत. एक उदाहरण देते. इटली,ग्रीस,अश्या देशात ऑलिव्ह चे मुबलक उत्पादन होते. साहजिक तिथं ऑलिव्ह तेल वापरतात. पण भारतात ते सरास वापरणे किती सयुक्तिक ठरेल? किंमत हा मुद्दा आहेच पण त्याव्यतिरिक्त सुध्दा ते वापरावं का सर्रास?जे जिथं पिकते ते खायचे. इट लोकल अशी एक मोहीम असते. स्थानिक अन्न महत्वाचे.आपले पारंपरिक इडली,पोहे, आंबोळी,थालीपीठ,धपाटे असले पदार्थ सोडून मैद्याचा पाव आणि साखर असलेला जाम खातात. सकस असा हातसडीचा तांदूळ न वापरता पॉलिश तांदूळ घेतात. हे अगदी ढोबळ उदाहरण पण त्यामुळे आपले पौष्टिक पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ आपण विसरत चाललोय. आणि इथच पौष्टिक म्हणून मग सुका मेवा बिवा खाल्ला जातो.खिशाला डबल फटका.
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)