वजन कमी होतं म्हणून अनेकजणी दिवसभर अनेक वेळा जवस खातात. पण असं येता जाता जवस खात राहाणं ही चांगली गोष्ट आहे की नाही याबाबत मात्र कोणालाच माहित नसतं. कोणीतरी सांगितलं, कुठे तरी वाचलं म्हणून उपाय करणंहे हानिकारक असतं असं तज्ज्ञ म्हणतात. जवस खाण्याचे फायदे आणि तोटेही आहेत. जवस आपण कसं आणि किती खातो यावर त्याचे फायदे अवलंबून असतात. जवस हे कितीहीआरोग्यदायी असले तरी ते जर चुकीच्या पध्दतीने खाल्ले तर त्याचा तोटा होणारच. मग जवस खाऊनही असं कसं झालं? असा प्रश्न पडतो. यासाठीच जवसाच्या गुणधर्मासोबतच जवस खाण्याची पथ्यंही समजून घ्यायला हवीत.जवसामधे अनेक औषधी गुणधर्म आहेत. तसेच त्यात जीवनसत्त्वं आणि खनिजंही भरपूर प्रमाणात आहेत. जवसात ओमेगा ३ या फॅटी अॅसिडचं प्रमाण भरपूर असतं. शरीरासाठी हे फॅटी अॅसिड महत्त्वाचं असतं. शरीर ते स्वत: बनवत नाही. यासाठी या घटकासाठी बाहेरील अन्न घटकांवर अवलंबून राहावं लागतं. ही गरज जवसाच्या सेवनानं पूर्ण होते.
- जवस जर योग्य प्रमाणात खाल्ले तर बध्दकोष्ठता दूर होते पण जर ते जास्त खाण्यात आले तर मात्र जुलाबही होतात. जवस खाताना त्यासोबत पाणी हे भरपूर प्रमाणात पोटात जायला हवं. नाहीतर आतड्यांच्या कामात अडथळे निर्माण होतात आणि पोटाचं आरोग्य बिघडतं. ज्यांना मुळातच आतड्यांसंबधीचे आजार आहेत त्यांनी जवस खावू नये असं तज्ज्ञ सांगतात.
- जवसामुळे अॅलर्जीचे त्रासही होतात. जवस जास्त प्रमाणात खाल्ल्यास श्वास घेण्यास अडथळा येतो. रक्तदाब वाढण्याचा त्रास होण्याचा धोकाही असतो. जीव घाबरणे, पोटात दुखणे, उलट्या होणे असे त्रासही जवसाच्या अति सेवनानं होतात.
- गरोदर स्त्रियांना आपण जवस खावं की नाही असा प्रश्न पडतो. तर तज्ज्ञ सांगतात की जवस हे अॅस्ट्रोजन या हार्मोनसारखं काम करतात. ज्यांची पाळी अनियमित असते त्यांना जवस खाण्याचा सल्ला दिला जातो. जवसानं पाळीच्या चक्रात बदल झालेले आढळून आलेले आहेत. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी जवस खाणं असुक्षित मानलं जातं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच त्यांनी जवस खायला हवेत.
जवस कसं खावं?जवसाच्या बिया अख्या खाल्या जातात. पण अख्या बिया पचवणं शरीरास अवघड जातं. म्हणूनच तज्ज्ञ आख्या जवसापेक्षा जवसाची पूड खाण्याचा सल्ला देतात. एक चहाचा चमचा एवढी जवसाची पूड पुरेशी असते. कच्चं जवस खाण्यापेक्षा ते थोडं भाजून खावं. जवस रिकाम्या पोटी खाल्लं जातं. इतर अनेक प्रकारेही जवसाचा आहारात समावेश करता येतो. जसं पराठे बनवताना त्या पिठात जवसाच्या बिया किंवा पूड घालू शकतात. स्मूदीमधे जवसाच्या बिया टाकू शकतात. तसेच सॅलेड ड्रेसिंग हे जवसाचं तेल वापरुन करता येतं.