Join us  

सायंकाळी ५ नंतर होणाऱ्या खाण्यापिण्याच्या ५ चुका, त्या वजन कमी होऊ देत नाहीत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 5:24 PM

आहार तज्ज्ञांच्या मते संध्याकाळी पाच नंतर केल्या जाणाऱ्या छोट्या मोठ्या चुकांमुळे वजन कमी होत नाही. वजन कमी करायचं असेल तर संध्याकाळी पाच नंतर आपण काय खातो, कसं आणि किती खातो तसेच कधी झोपतो या सवयींवर बारकाईनं काम करायला हवं.

ठळक मुद्देवजन कमी करायचं असेल तर रात्रीच्या जेवणात कमी खायला हवं हा समज आणि त्यातून होणारी कृती सर्वात मोठी चूक आहे.रात्री थोडंच जेवायचं या समजूतीतून चौरस आहार टाळून एखाद दोन पदार्थ करण्यावरच भर दिला जातो. यामुळे ना पोट भरत ना रसनेची तृप्ती होते.रात्री झोप आली तरी भरपूर वेळ टी.व्ही किंवा मोबाइल पाहात राहाणं आणि लवकर झोपणं टाळणं ही वजन कमी करण्याच्या उद्दिष्टात आडवी येणारी सवय आहे.

वजन कमी करणं म्हणजे एखाद्या कृतीचा तात्कालिक परिणाम नाही. त्यासाठी नियमित प्रयत्न करावे लागतात. व्यायाम आणि आहार नियमांवर ठाम राहावं लागतं. वजन कमी करण्यासंदर्भात समाज माध्यमांवर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सगळ्याच बरोबर असतात असं नाही. मनुष्य स्वभावानुसार जे सोपं ते उचललं जातं. काही दिवस करुन मग तेही सोडलं जातं. तोपर्यंत परत नवीन काहीतरी व्हायरल आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं. रात्री कर्बोदकं नकोत, हलकंसं आणि थोडंच खा यासारख्या अनेक चुकीच्या गोष्टी अवलंबल्या जातात. त्याचा वजन कमी होण्यावर तर परिणाम होत नाहीच पण आरोग्यावर मात्र नकारात्मक प्रभाव पडतो. म्हणूनच समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या गोष्टींचा अवलंब करण्यापेक्षा आहारतज्ज्ञांच्या सूचनांकडे लक्ष देण्याचा सल्ला अनेक आहारतज्ज्ञ देत असतात.

आहार तज्ज्ञांच्या मते गैरसमजूतीतून होणाऱ्या चुकांमूळे किंवा सवयींमुळेही  वजनावर वाईट परिणाम होतो. आहार तज्ज्ञांच्या मते संध्याकाळी पाच नंतर केल्या जाणाऱ्या छोट्या मोठ्या चुकांमूळे वजन कमी होत नाही. वजन कमी करायचं असेल तर संध्याकाळी पाच नंतर आपण काय खातो, कसं आणि किती खातो तसेच कधी झोपतो या सवयींवर बारकाईनं काम करायला हवं.

संध्याकाळी पाच नंतर च्या पाच चुका१ वजन कमी करायचं असेल तर रात्रीच्या जेवणात कमी खायला हवं असा अनेकींचा भ्रम असतो. खरंतर पोटात भूक असताना केवळ रात्री कमी जेवायचं म्हणून कमी खाल्ल्यास पोट भरत नाही. रात्री पोटाला तडस लागेपर्यंत जेवणं हे योग्य नाहीच. पण भूक न भागता जेवणाच्या ताटावरुन उठणं हे आरोग्याच्या दृष्टीनं अपायकारक आहे. जेवण रात्रीचं असलं तरी त्यातून शरीराला आवश्यक प्रथिनं, स्टार्च आणि फॅटस हे मिळायलाच हवेत. ते जर मिळाले नाही तर पोट भरलेलं राहात नाही.

२. रात्री थोडंच जेवायचं या समजूतीतून चौरस आहार टाळून एखाद दोन पदार्थ करण्यावरच भर दिला जातो. यामुळे ना पोट भरत ना रसनेची तृप्ती होते. वेगवेगळ्या चवीचे पदार्थ जेवणात असतील तर जेवताना समाधानाची भावना निर्माण होते. ही समाधानाची भावना वजन कमी करण्यात मोठी भूमिका पार पाडत असते. हे समाधान मिळवण्यासाठी आहारतज्ज्ञ म्हणतात की तेज तर्रार चवीचे नाहीत पण मसालेयुक्त पदार्थ असायला हवेत. सोबत सलाड असायला हवं.सर्व चवींमुळे रसनेची जी तृप्ती येते त्यातून समाधानाची भावना निर्माण होते त्याचा परिणाम म्हणजे योग्य प्रमाणात खाल्लं जातं. 

३. रात्री जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा अनेकजणींना होते. वजन कमी करायचं म्हणून गोड खायचं टाळायला हवं हा चुकीचा समज आहे. उलट रात्री आपल्याला जेवणानंतर गोड लागतंच ही सवय लक्षात घेता पौष्टिक गोड पदार्थ काय करु शकतो याचा विचार करयाला हवा. गोड पदार्थ खाताना भूक किती आहे आणि किती खाणं योग्य आहे याचा विचार करुन योग्य प्रमाणात गोड पदार्थ खायला हवेत. अगदीच टाळणं किंवा खूप खाणं या दोन्ही गोष्टी चुकीच्याच.

४. रात्री झोप आली तरी भरपूर वेळ टी.व्ही किंवा मोबाइल पाहात राहाणं आणि लवकर झोपणं टाळणं ही वजन कमी करण्याच्या उद्दिष्टात आडवी येणारी सवय आहे. या सवयीचा परिणाम पचनक्रियेवर होतो. आणि दुसऱ्या दिवशीच्या खाण्यावर त्याचा परिणाम होतो. अनेकजण दिवसभर तोंडावर ताबा ठेवतात. पण संध्याकाळी पाचनंतर सतत खात राहातात.हे परिणाम केवळ वेळेवर न झोपण्याचे आहे. त्यामुळे आहारतज्ज्ञ म्हणतात झोपेची वेळ निश्चित असायला हवी. आणि त्याच वेळेस झोपायला हवं. या सवयीमुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळची एकाचवेळी खूप खाण्याची सवय कमी होते.

५. खाण्याचे नियम चुकीच्या पध्दतीनं पाळणं यामुळेही वजन कमी होण्यात अडथळा येतो. रोज रात्री योग्य प्रमाणात जेवण करणं ही योग्य सवय आहे. पण एखाद्या दिवशी रात्रीच्या जेवणात खूप खाणं आणि त्याची भरपाई म्हणून दूसऱ्या दिवशी सकाळी अगदीच कमी खाणं ही ट्रीक काम करत नाही. आहारतज्ज्ञ म्हणतात वजन कमी करण्यासाठी नियमित आरोग्यदायी आहार योग्य प्रमाणात घेणं आवश्यक आहे.

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्न