Join us  

मनात आलं आणि केलं फॅशनेबल डाएट सुरू? डाएट करणं इतकं सोपं साधं नाही, योग्य डाएट कोणतं हे कसं ओळखाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 2:27 PM

डाएट ही गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे.त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन ते करायला हवं.

ठळक मुद्देकाय खाता, किती खाता आणि केव्हा खाता हे प्रश्न वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी रोज स्वतःला विचारायला हवेत !

वैद्य राजश्री कुलकर्णी

डाएट, वेट लॉस, झिरो फिगर, लो कार्बो डाएट, फॅट फ्री हे शब्द गेल्या काही वर्षांत अगदी परवलीचे झाले आहेत. डाएटवर चर्चा हिंडून फिरून येतेच, व्हॉट्सॲपवर ज्ञानवाटप अखंड सुरू असतं तिथंही काहीजण वेगवेगळ्या डाएट्सच्या शोधात निघतात. पुन्हा ऑनलाइन सर्च मारून कोण कुठलं डाएट करतं हे शोधलं जातंच. मग एका क्लिकवर अगणित प्रकारचे डाएट्स समोर अवतीर्ण होतात. किटो डाएट, मिलिटरी डाएट, ग्रीन ज्यूस, केवळ रसाहार, केवळ फलाहार, वेगवेगळ्या स्मूदीज, नो फॅट डाएट, नो कार्ब डाएट, प्रोटीन रिच डाएट, दीक्षित डाएट, दिवेकर डाएट हे अन् ते आता सुरू होतं खरं कन्फ्यूजन, हे करू की ते करू, हे खाऊ, की ते खाऊ? यात सगळ्यात पहिला विचार कोणता असेल तर तो आवडीनिवडीचा ! चांगल्या चवीढवीचं खायला मिळायला हवं, नुसत्या भाज्या उकडून खाऊ, असं असेल तर नको ! खाण्याची रेलचेल हवी, प्रमाण पोटभर हवं, उगीचच ग्राम्स मोजून खाऊ? म्हणणारे डाएट नको ! त्यात तोच तोचपणा नको, वैविध्य हवं ! अशी गाळणी चाळणी लावत मग शेवटी कुठेतरी दोन-चार डाएट शॉर्टलिस्ट होतात ! मिलिटरी डाएटमध्ये आइस्क्रीम खायला मिळतं म्हणून ते डाएट हौस म्हणून करणारे महाभाग मी बघितले आहेत!पण हे सारं फारकाळ टिकत नाही, कारण खाणं हा जिव्हाळ्याचा विषय असतोच. जन्माला येण्या आधीपासूनच आपला आहाराशी संबंध असतो, तेव्हा आईद्वारे इनडायरेक्ट पद्धतीने तो असतो आणि नंतर प्रत्यक्ष आहाराशी येतो इतकाच फरक .

जसजशा आपल्या विविध प्रकारच्या चवी डेव्हलप होतात तसं हळूहळू आपल्या प्रकृतीनुसार आपोआपच आवडीनिवडी लक्षात येऊ लागतात. मग कोणाला अगदी उकळता चहा लागतो तर कोणी चहा हे जणू शीतपेय असल्याप्रमाणे अगदी पंधरा मिनिटे गार करून पितात! वाढीच्या वयात तुम्ही काहीही आणि कितीही खा, ते पचते, अंगी लागतं कारण तेव्हा कितीही नाही म्हटलं तरी फिजिकल ॲक्टिव्हिटी भरपूर असते. खेळ असतात, सतत काहीतरी हालचाल चालू असते; पण जरा वयात यायला लागलं की हल्ली हे वजनाशी संबंधित प्रोब्लेम्स चालू होतात. शरीरात घडणारे शारीरिक, मानसिक बदल, हॉर्मोन्सच्या रक्तातील पातळ्या आणि असे अनेक विषय मग पुढे येतात, जर वजन वाढू लागलं तर पहिला विचार आणि गदा दोन्ही येते ती आहारावर.कारण साधं सरळ आहे की शेवटी संपूर्ण शरीराचं पोषण, चयापचय किंवा मेटबॉलिझम हे सगळं आपण काय खातो, कसं खातो, केव्हा खातो या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. हल्ली तर या वाढत्या वजनाचा इश्यू मोठा गंभीर आहे. ब्लडप्रेशर, हार्ट डिसीज, डायबेटीस, थायरॉइड डिसीज असे अनेक नवीन विषय आयुष्यात प्रवेशीत झाल्यामुळे त्यासाठी डाएट, वेट कंट्रोल यांचा विचार करावाच लागतो. शिवाय जे काही फॅशनेबल कपडे घालायचे त्यासाठीही फिगर चांगली असणं, वजन नियंत्रणात असणं हे अत्यावश्यक होत चाललंय!

मात्र कोणतंही डाएट फॉलो करण्यासाठी ज्या मुख्य मुद्द्यांवर विचार व्हायला हवा, तो करणारे अगदी बोटावर मोजता येतील इतकेच असतात. बाकी सगळे आंधळेपणाने काहीतरी वेगळं करायचं म्हणून करणारे असतात.त्यामुळे कोणतंही डाएट करायचं ठरवलं तर या काही गोष्टींवर नीट विचार करून निर्णय घ्या..

 

१. वय : हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. कारण वयानुसार शरीराच्या गरजा बदलत जातात. वाढीच्या किंवा तरुण वयात कर्बोदके व प्रथिने जास्त लागतात कारण शरीराला भरपूर ऊर्जा किंवा एनर्जीची गरज असते; परंतु उतारवयात मात्र हाडांची झीज होते त्यावेळी स्निग्ध पदार्थ जास्त आवश्यक असतात. त्यामुळे आपला वयोगट काय, आपल्याला नक्की काय गरजेचे आहे हे ओळखून मगच त्यानुसार प्रकार निवडावा.

२. प्रकृती : व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण आपण ऐकून असतो; पण नेमक्या वेळेला मात्र अप्लाय करायला विसरतो. अमुक व्यक्तीनं एका महिन्यात चार किलो वजन कमी केलं म्हणून मीपण करेन असं वेटलॉसच्या बाबतीत होऊ शकत नाही कारण प्रत्येक व्यक्तीची ठेवण, शारीरिक जडणघडण वेगळी असते, थोडक्यात जेनेटिक मॅप वेगळा असतो. एखादी व्यक्ती दोन महिन्यात जे टार्गेट ॲचिव्ह करेल ते करायला दुसऱ्याला चार महिने लागू शकतात कारण व्यक्तिपरत्वे मेटाबॉलिझमचा रेट वेगवेगळा असतो. आयुर्वेदानुसार हे समजून घ्यायचं झालं तर कफ प्रकृतीच्या व्यक्तींना वजन कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त त्रास होतो कारण वजन पटकन वाढणं हे त्यांच्यासाठी नैसर्गिक आहे; पण कमी करणं मात्र खूपच तापदायक आहे. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती ठरवून वजन वाढवू किंवा कमी करू शकतात. वात प्रधान व्यक्तींना बरेचदा वजन वाढवणं हीच मूळ समस्या असते!

३. कामाचं स्वरूप : तुमची जीवनशैली धावपळीची आहे की बैठी आहे, चालावं लागतं का, दिवसभर एसीमध्ये काम करावं लागतं, उन्हात फिरावं लागतं, खूप बोलावं लागतं, खूप मेंटल स्ट्रेस असतो, मानसिक ताणतणाव किती आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर होत असतो, कळत-नकळत हार्मोन्सवर होत असतो आणि साहजिकच वजनावरपण होत असतो हे आपण लक्षात घ्यायला हवं!

४. झोप : झोपेचा आणि वजनाचा जवळचा संबंध आहे. केवळ अतिप्रमाणात झोपल्यामुळेच वजन वाढतं असा एक समज आहे; पण कमी झोपण्यामुळेदेखील चयापचय बिघडून वजन वाढू शकतं !

५. आहार : हा तर सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहेच ! आहाराच्या बाबतीत प्रमाण, वेळा आणि घटक हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे. काय खाता, किती खाता आणि केव्हा खाता हे प्रश्न वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी रोज स्वतःला विचारायला हवेत !

६. व्यायाम : याविषयी इतकं बोललं जातं की जितकं बोलू तितकं कमी आहे. व्यायाम करतो की नाही इथून सुरुवात असते मग तो किती प्रमाणात, कोणत्या वेळी, कोणत्या प्रकारचा हे सगळे प्रश्न येतात. चुकीचा व्यायाम, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी केल्यामुळेदेखील वेटलॉस प्रक्रियेत अडथळा येतो.

७. मानसिक आरोग्य : हा वजनाच्या बाबतीत थोडा दुर्लक्षित; पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप मानसिक ताणतणाव असल्याने खूप खाणं, चयापचय पूर्ण बिघडलेला असणं आणि परिणामी वजन अफाट वाढणं हे खूपच कॉमन आहे आणि आपण आपल्या आसपास ते बघतही असतो !

८. आजार :  हॉर्मोनल इमबॅलन्स, मधुमेह, थायरॉइड यासारखे आजार यात वजन वाढू शकतं त्यामुळे तो मुद्दा विसरून चालणार नाही.

 

(लेखिका एम.डी. आयुर्वेद असून नाशिकस्थित आयु: श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल ॲॅण्ड रिसर्च सेंटरच्या संचालक आहेत.)rajashree.abhay@gmail.com

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्न