lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Corona : दररोज किती वेळा, किती वेळ वाफ घेतली तर ते फायद्याचं ठरतं ?

Corona : दररोज किती वेळा, किती वेळ वाफ घेतली तर ते फायद्याचं ठरतं ?

वाफ घेणं, गुळण्या करणं, हे सारं ‘प्रिव्हेण्टीव’ म्हणून करायचं आहे, ते ही प्रमाणात. दिवसाला पाचपाचवेळा वाफ घेण्याची गरज नसते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 05:08 PM2021-05-17T17:08:01+5:302021-05-17T17:16:11+5:30

वाफ घेणं, गुळण्या करणं, हे सारं ‘प्रिव्हेण्टीव’ म्हणून करायचं आहे, ते ही प्रमाणात. दिवसाला पाचपाचवेळा वाफ घेण्याची गरज नसते..

Corona: How many times a day you need steaming inhalation, dos and don'ts of streaming | Corona : दररोज किती वेळा, किती वेळ वाफ घेतली तर ते फायद्याचं ठरतं ?

Corona : दररोज किती वेळा, किती वेळ वाफ घेतली तर ते फायद्याचं ठरतं ?

Highlightsविशेषतः जे लोक पातेल्यात पाणी गरम करुन वाफ घेतात त्यांनी खूप काळजी घ्यायला हवी कारण अनेक जणांना अशी वाफ घेताना अपघाताला सामोरं जावं लागलं आहे.

वैद्य राजश्री कुलकर्णी, (एम.डी. आयुर्वेद)

कोरोनाने हात पाय पसरायला सुरुवात केल्यावर मग स्वतःचं रक्षण करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधले जाऊ
लागले. पहिल्या लाटेमध्ये सर्दी ,खोकला ही प्रमुख लक्षणं असल्याने नाक आणि तोंड याद्वारे विषाणू शरीरात
प्रवेश करतो हे स्पष्ट झालं म्हणून आपला पूर्वापार चालत आलेला ट्रॅडिशनल उपाय “ वाफ घेणे” हा पुन्हा पुढे
आला. सर्दी,फ्लू,शिंका, नाक वहाणं या तक्रारींसाठी आपण आधीपासूनच वाफ घेतच होतो, फक्त त्यासाठी साधं वाफ घेण्याचं मशीन( व्हेपोरायझर) किंवा अगदी तेही नसेल तर पातेल्यात पाणी उकळून डोक्यावर टॉवेल घेऊन वाफ घेणं हे कॉमन चित्र होतं .आता त्यासाठी साध्यापासून ते भारीतली उपकरणं, मशिन्स आली. नाक आणि तोंडावाटे वाफ घेतल्यामुळे नाक,घसा हे पॅसेजेस क्लीन राहतात आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात ही या मागची थियरी ! नाकाचा कोरडेपणा कमी होतो, नाकाची सूज कमी होते आणि कंजेशन कमी झाल्यामुळे श्वास घेणं सोपं जातं हे त्याचे फायदे आहेत.
विशेषतः कामकाजानिमित्ताने रोज घराबाहेर जावं लागत असेल तर दिवसातून दोन वेळा वाफ घेणं किंवा किमान
घरी आल्यावर एकदा तरी वाफ घेणं गरजेचं आहे.
वाफ नुसत्या पाण्याची असली तरी चालते पण घसा खवखवणे, किंचित सर्दी वाटणे अशी लक्षणे असतील तर
पाण्यात निलगिरी तेलाचे काही थेंब ,पुदिना तेलाचे काही थेंब किंवा किंवा गवती चहाच्या( लेमन ग्रास) तेलाचे
काही थेंब टाकून वाफ घेतल्यास अधिक परिणामकारक होते. काही नाही मिळालं तर घरात व्हिक्स असेल तर ते
किंचित टाकूनही वाफ घेऊ शकतो.
वाफ घेतल्यानं कोरोना व्हायरस मरतो वगैरे कोणतंही भाष्य आजपर्यंत WHO ने केलेलं नाही .पण जरी चुकून
तुम्ही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर वाफ घेतल्यानं तो अटॅक कमकुवत होऊ शकतो.

वाफ घेण्याचे नियम 


१. उगीचच दिवसातून तीन तीन वेळा वाफ घेण्याची गरज नाही, जे घराबाहेर जातात किंवा ज्यांच्या घरात
कामासाठी बाहेरून माणसं, हेल्पर्स वगैरे येतात त्यांनी दिवसातून एक किंवा जास्तीत जास्त दोन वेळा
वाफारा घ्यायला हरकत नाही.
२. एकावेळी पाच ते दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाफ घेऊ नये.
३. वाफ घेताना नाक व तोंड दोन्हींने घ्यावी म्हणजे नाकाच्या पोकळ्या तसेच जिभेच्या मागे घशापर्यंत
वाफ लागते व तिथला कफ कमी होतो व कंजेशन कमी व्हायला मदत होते.
४. डोळे हा नाजूक अवयव आहे व तिथे उष्णता लागून चालत नाही, वाफेचे उष्णतामान खूप असते त्यामुळे
वाफ घेताना डोळे जपायला हवेत. शक्यतो डोळ्यांना वाफ लागू नये म्हणून वाफ घेताना डोळ्यांवर गार
पाण्यात भिजवून कापसाचे बोळे ठेवावेत .
५. विशेषतः जे लोक पातेल्यात पाणी गरम करुन वाफ घेतात त्यांनी खूप काळजी घ्यायला हवी कारण
अनेक जणांना अशी वाफ घेताना अपघाताला सामोरं जावं लागलं आहे. अचानक अंदाज न आल्याने
चेहरा उकळत्या पाण्यात टेकणं किंवा बुडणं व त्यामुळे चेहऱ्याला गंभीर भाजणे, डोक्यावर टॉवेल
घेतल्यानं एकूणच दिसण्याला अडथळा आल्यामुळे चुकून धक्का लागून उकळते पाणी अंगावर, हाता
पायावर सांडून गंभीर बर्न्स होणं वगैरे !
६. नुसती वाफ घेण्यापेक्षा त्या बरोबर गरम पाण्यात मीठ व हळद घालून गुळण्या करणं ,रात्री झोपताना गरम दुधात थोडी सुंठ व हळद घालून घशाला शेक बसेल अशा पद्धतीने दूध पिणं हा उपायही करावा.
७. ज्यांना पट्कन कफ होण्याची सवय आहे किंवा सर्दी होऊन नाक गळत राहतं त्यांना वाफ घेण्यापेक्षा धुरी घेणं
जास्त उपयोगी पडतं. तापलेल्या तव्यावर थोडं बाजरीचे पीठ,हळद, सुंठ,ओवा, लवंग व लसणाची सालं हे सगळं
किंवा यापैकी जे मिळेल ते टाकून त्याची धुरी घ्यावी. ही धुरी जरा तिखट, तीक्ष्ण गुणाची नाकात आग किंवा
चरचर करणारी आहे पण तितकीच इफेक्टिव्ह आहे.
८. सायनसचा त्रास असेल म्हणजे गाल, कपाळ ,नाक या पोकळ्यांमध्ये कफ साठून डोकं जड पडणं ,दुखणं अशा तक्रारी असतील तर गरम पाण्यात सुंठ व जायफळ यांचा लेप तयार करून तो कपाळावर, गालांवर घालावा यामुळे कफ पातळ होऊन नाकाद्वारे निघून जातो.
९. आपण सर्वांनी ही गोष्ट निश्चित लक्षात ठेवली पाहिजे की कोरोना असं निदान झाल्यानंतर करायचे हे उपाय
नव्हेत ,त्यावेळी जो त्रास होत असेल त्यानुसार प्रॉपर औषधं, इंजेक्शन किंवा इतर चिकित्सा करणं गरजेचं आहे
परंतु कोरोना होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव म्हणून जे काही करु शकतो त्यातील वाफारा,धुरी हे काही घरगुती उपाय आहेत.


(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आणि आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या संचालक आहेत.)
rajashree.abhay@gmail.com
www.ayushree.com

Web Title: Corona: How many times a day you need steaming inhalation, dos and don'ts of streaming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.