चैत्राली परळकर-साखरे,
मार्च २०२० मध्ये जर्मनीत लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आमच्या सगळ्या प्लॅन्सना सुरुंग लागला. ऑक्टोबरमध्ये माझ्या डिलिव्हरीसाठी मदत म्हणून आई किंवा सासूबाई जर्मनीला येणार होत्या. विमानं बंद झाली आणि सगळी अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली. मग इथंच इंडियन आणि तुर्किश दुकानांमध्ये शोधून डिंक, अळीव, सुकामेवा, अशी जमवाजमव केली. आतापर्यंत कुणीतरी मदतीला येणार म्हणून निर्धास्त असलेल्या नवऱ्याला जरा धडकी भरली. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यावर दोन दिवस जे सगळं जेवण मिळालं ते एन्जॉय केलं. चक्क छोले, भात आणि सूप होतं एकदा. नवीन कोरोना नियमांमुळे सोबत कुणाला थांबता येत नव्हतं, बाळाच्या बाबांना पण ऐनवेळी मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये सोडलं.डिलिव्हरीनंतर मात्र घरचा मऊ भात, खिचडी, शिरा डोळ्यासमोर येत होता. (पहिल्या मुलीच्या जन्माच्या वेळचा भारतातला अनुभव).
जवळच्या मैत्रिणींनी माझ्या मोठ्या मुलीला २-३ दिवस खूप प्रेमानं सांभाळलं, तो सगळ्यात मोठा मानसिक आधार होता माझ्यासाठी. हॉस्पिटलचे व्हिजिटिंग अवर्स फक्त दुपारी ३ ते ५. नवरा घरून भात, खिचडी आणत होता. इतर वेळी तिथं मिळेल ते खाऊ असं ठरवलं. सकाळी ७ वाजताच दोन मोठे गोल ब्रेड, जॅम, बटर, हनी मिळत होतं ब्रेकफास्टला. सोबत एक फळ, योगर्ट आणि ऑरेंज ज्यूस. सकाळी इतकी भूक लागायची की ते लगेच संपायचं. पहिल्याच दिवशी १ वाजता लंचला बेक्ड ब्रिन्जल विथ चीज! लगेच डोळ्यांसमोर आई, आजी, काकू, मावशांचे चेहरे आले! बाळंतिणीला पहिल्याच दिवशी वांगं?- पण चवीला भारी होतं ते. तरी मऊ खिचडी, शिऱ्याच्या आठवणीनं डोळ्यात पाणी! लंचला गरमगरम सूप असायचं रोज, त्याची मात्र मी आवर्जून वाट बघायचे. माझ्या रूममध्ये एक तुर्किश बाई होती, ती खूपच वैतागली होती सकाळी ब्रेड बघून. त्यांचं ट्रॅडिशनल फूड आठवून तिला पण वाईट वाटत होतं. मी तिला विचारलं, काय खाता तुम्ही पोस्ट-डिलिव्हरी? पण तिला त्याचं इंग्लिश/ जर्मन नाव आठवत नव्हतं- म्हटलं जाऊ दे; पण तिनं तिच्या नवऱ्याला फोन करून? काहीतरी मागवलं. तो बिचारा गेटवर बराच वेळ आत जाण्यासाठी/ पार्सल आत देण्यासाठी हुज्जत घालून गेला. तिला म्हणलं- ‘इट्स नॉट ऑल दॅट बॅड, ट्राय इट.’ पुढचे ३-४ दिवस वेगवेगळे पास्ता, राइस विथ सोटेड व्हेजिटेबल्स, असं गरमागरम जेवण येत होतं. मी मनापासून खाल्लं. जेवण खूपच हेल्दी आणि सौम्य चवीचं असे. संध्याकाळी ५.३० वाजता कोल्ड डिनर आलं की, मात्र माझी चिडचिड व्हायची. तीळ, सुर्यफूलाच्या बिया लावलेला ब्राऊन ब्रेड विथ चीज स्लाइस आणि सलाड! मग मी घरून आलेला डबा खायचे आणि तो कोरडा ब्रेड मध्यरात्री कधी भूक लागली, तर खायला ठेवायचे. घरून खाकरा, बिस्किटं, डार्क चॉकलेट, प्रोटीन बार्स नेले होते, तेही मध्येमध्ये मदतीला होतेच. कोरड्या खाऊसोबत तिथं मिळणारी मशीनची कॉफी बरी वाटायची, फक्त त्या पॅन्ट्रीमध्ये जाण्यासाठी बाळाला चाकाच्या पाळण्यात ठेवून सोबत न्यावं लागे. (सोबत कुणी थांबू शकत नसल्यामुळं बाळाला एकटं सोडता येत नव्हतं.)
एके दिवशी घरच्या डब्यात माझ्या साडेपाच वर्षांच्या मुलीनं बाबांसोबत लुडबुड करून? छोटी पोळी? लाटून वरणासोबत कुस्करून खायला पाठवली. लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये यायला परवानगी नव्हती, मग फोनवरच तिनं विचारलं- ‘आपल्या बाळाला आवडली का ताईनं केलेली पोळी? उद्या पुन्हा पाठवू का करून?’ त्यावेळी तिचा आवाज ऐकून जे वाटलं ते मला शब्दांत सांगताच येणार नाही. तीच माझी आई झाली होती तेव्हा!मध्ये वीकएंड आल्यामुळं आमचा एकूण मुक्काम ७ दिवस झाला हॉस्पिटलमध्ये. घरी आल्यावर १ महिना स्वयंपाकघराचा पूर्ण ताबा नवऱ्याकडं होता. सकाळी ९ वाजता सुरू केलेला स्वयंपाक दुपारी २-२.३० ला संपायचा. आम्ही गमतीनं म्हणायचोसुद्धा- ‘एवढ्या वेळात पुरणाचा स्वयंपाक होऊन गावजेवण झालं असतं.’थोडं जेवून तासभर बसलं की, पुन्हा न कंटाळता ‘आता रात्री काय करू?’ हा प्रश्न हजर. दोन्ही वेळेचं एकदाच करून? किंवा मला सकाळचं संध्याकाळी चालेल हे त्या उत्साही बाबाला पटायचं नाही. मला रोज गरमागरम खसखस, अळीव, डिंक खीर मिळायची. मी राजा असते, तर कंठ्या वगैरे काढून दिल्या असत्या या खिरीवर खुश होऊन, असं म्हणायचे मी रोज. आजीला फोन करून? सांगितलं तर म्हणाली- ‘खा बाई, कुरकुर न करता यावेळी तरी, आधीच शेक वगैरे काही नाही तिकडे.’ घरची आणि घराबाहेरची कामं करताना नवऱ्याची होणारी धावपळ बघून एक महिन्यानंतर अल्मोस्ट घुसखोरी करून? किचनचा ताबा मिळवला, तेव्हा मला हुश्श्य झालं!! सगळ्या जगाचे प्लॅन्स २०२० मध्ये बदलले. मी तरी कशी अपवाद असणार? समोर येणाऱ्या जेवणाकडं, चवींकडं आणि परिस्थितीकडं मोकळ्या मनानं पाहिलं की, आयुष्य सुकर होत हे मात्र पटलं मला!!
chaitralisakhare@gmail.com