Join us

आता रिसर्चचाच दावा, दूध साखरेचा चहा टाळा; 9 फायद्यांसाठी काळा चहा पिण्याची सवय लगेच लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 19:48 IST

 चहा आरोग्यासाठी घातकच. पण चहा पिणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संशोधन सांगतं की साखरेचा आणि दुधाचा चहा पिण्याऐवजी काळा चहा घेणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

ठळक मुद्देज्या महिला नियमित काळा चहा घेतात त्यांना भविष्यात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो, असं अभ्यास सांगतो. पोट आणि आतड्यांशी संबंधित अनेक आजारांशी लढण्याचं काम काळया चहातील गुणधर्म करतात. अभ्यास सांगतो की जर रोज कमीत कमी दोन वेळा आणि जास्तीत जास्त चार वेळा काळा चहा पिणार्‍यांना कॉर्टिसॉल हे हार्मोन वाढून होणारा मानसिक तणावाचा त्रास कमी होतो.

 चहा हा कितीही आवडत असला तरी चहा आरोग्यासाठी फायदेशीर नसतो असं अनेक अभ्यास आणि संशोधनातून सिध्द झालं आहे. पण चहा पिण्याची सवय असणार्‍यांना चहाची तलफ आली की चहा लागतोच. त्यांना चहा आरोग्यासाठी घातक आहे असं सांगूनही काहीच फरक पडत नाही. पण मनात एक सल असतेच की, आरोग्यासाठी वाईट असलेली गोष्टच आपण करतो आहोत. पण चहा पिणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संशोधन सांगतं की साखरेचा आणि दुधाचा चहा पिण्याऐवजी काळा चहा घेणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. काळा चहाचे आरोग्यावर परिणाम यावर झालेला अभ्यास काळा चहा पिण्याचे 9 फायदे सांगतो.

Image: Google

काळा चहा का प्यावा?

1. अभ्यास सांगतो की काळा चहा अनेक आजारांपासून आपलं संरक्षण करतं. कारण काळ्या चहामधे कॅफिनचं प्रमाण कमी असतं. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहातो. तसेच काळ्या चहामधे फ्लोराइड असतं ज्यामुळे हाडाच्या आणि तोंडाच्या आजारांचा धोका कमी होतो.

2. काळ्या चहात आढळणार्‍या पॉलिफिनॉल्समुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच अभ्यास सांगतो की ज्या महिला नियमित काळा चहा घेतात त्यांना भविष्यात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.

3. काळ्या चहात फ्लेवोनिडस सारखे अँण्टिऑक्सिडण्टस असतात जे चांगल्या कोलेस्टेरॉलचं ऑक्सिडेशन होण्यापासून वाचवतात. याचा फायदा हदय निरोगी राहाण्यास होतो.

Image: Google

4. ट्री ट्रेड हेल्थ रिसर्च असोसिएशन यांनी केलेला अभ्यास सांगतो की काळा चहा पिल्यानं तोंडात व्रण होत नाही. तसेच दात किडून दातांचं होणारं नुकसान टळतं. काळ्या चहातील पॉलिफिनॉल्स हे दात किडवणार्‍या जिवाणुंचा नायनाट करतात.

5. बिना साखर आणि दूध न घातलेला काळा चहा रोज दोन कप पिल्यास टाइप 2 चा मधुमेह होण्याचा धोका 70 टक्क्यांनी कमी होतो.

6. काळ्या चहात असलेल्या टॅनिनमुळे पचन क्रियेस मदत होते. पोट आणि आतड्यांशी संबंधित अनेक आजारांशी लढण्याचं काम काळया चहातील गुणधर्म करतात. काळ्या चहात अँण्टि डायरिया गुणधर्म असतात. हे गुणधर्म आतड्यांच्या क्रियेतील गती सुधारण्यास सहाय्यभूत होतात. या चहातील पॉलिफेनॉल्स हे आतड्यांची सूज कमी करतात.

Image: Google

7. काळ्या चहात असलेले फायटो केमिकल्स हाडं आणि हाडातील उतींना मजबूत करतात.

8. काळा चहा पिल्यानं डोकेदुखीस आराम मिळतो. काळा चहा लिंबू घालून पिल्यास डोकेदुखी लवकर थांबते.

9. अभ्यास सांगतो की, रोज कमीत कमी दोन वेळा आणि जास्तीत जास्त चार वेळा काळा चहा पिणार्‍यांना कॉर्टिसॉल हे हार्मोन वाढून होणारा मानसिक तणावाचा त्रास कमी होतो. काळ्या चहातील घटक स्मरणशक्ती वाढवण्यास आणि मानसिक स्तरावरील सजगता निर्माण करण्यास मदत करतात.