Join us  

पावसाळ्यातही या ५ गोष्टी वाढवतात इम्युनिटी.. आरोग्य सांभाळा, फिट रहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 6:08 PM

पावसाळ्यात काय खाऊ नये, याची यादी खूप मोठी आहे. पण काय खाऊ नये, हे लक्षात ठेवताना काय खावे, याचा मात्र विसरच पडतो. म्हणूनच तर पावसाळ्यात आरोग्य सांभाळायचे असेल, तर हे काही पदार्थ नक्कीच खा.

ठळक मुद्देपावसाळ्यात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. याशिवाय टोमॅटो सूप आणि वेगवेगळ्या भाज्यांचे सूप पावसाळ्यात जास्त प्रमाणात घेणे फायदेशीर ठरते.

पावसाळा म्हणजे आरोग्याची विशेष काळजी. सततचा पाऊस, ढगाळ वातावरण रोगराई पसरविण्यास कारणीभूत ठरते. अन्न पाण्यातून वाढणारे आजार, सर्दी- खोकला- ताप असे संसर्गजन्य आजार या काळात खूप वाढलेले असतात. शिवाय पचनशक्ती मंदावलेली असल्याने खाण्यात थोडे फार इकडे- तिकडे झाले तरी पोट बिघडते. यामुळे पावसाळ्यात आपण आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे खूप आवश्यक असते. म्हणूनच पावसाळ्यात हे काही पदार्थ खा आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. 

 

१. पाऊस पडल्यानंतर थंड- थंड झालेल्या वातावरणात चहा पिण्याची तल्लफ झाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा- केव्हा चहा प्याल, तेव्हा त्यात अद्रक आणि गवती चहा टाकायला विसरू नका. अर्थातच जर तुम्ही दिवसभरातून तीन कपांपेक्षा अधिक चहा पिणार असाल तर प्रत्येकवेळी अद्रक आणि गवतीचहा टाकण्याची गरज नाही. कारण अद्रक आणि गवती चहाच्या अतिवापराने शरीरातील उष्णता वाढू शकते आणि त्यातून भलतेच आजार उद्भवू शकतात. दिवसाचा पहिला चहा मात्र अद्रक किंवा सूंठ आणि गवती चहा टाकूनच घेतला तर अतिउत्तम.

 

२.  साधे वरण, गरमागरम मऊसूत भात, त्यात घातलेले साजूक तूप आणि वरून पिळलेले लिंबू असा वरणभाताचा आनंद पावसाळ्यात आवर्जून घ्या. अगदी गच्च पोट भरेपर्यंत न खाता कमी आहार घ्या आणि थोड्या थोड्या ब्रेकनंतर खा.वरणात तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ वापरली तर अधिक चांगले.

 

३. हिरवे मुग किंवा पाठीची मूगाची डाळ घालून केलेले सूप पावसाळ्यात नक्की खावे. या सूपमुळे शरिरात ॲण्टीबॉडीज तयार होतात आणि शरिरात जर कुठे काही बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ पाहत असेल तर ते देखील लगेचच रोखल्या जाते आणि हे जंतू शरिराबाहेर फेकण्यास मदत होते.

४. पोळी किंवा चपाती ऐवजी भाकरी खाण्याला या दिवसांमध्ये प्राधान्य दिले पाहिजे. कारण भाकरी पचायला हलकी असते.

 

५. कढीपत्तादेखील पावसाळ्यात आवर्जून खायला हवा. कढीपत्ता खाण्याची उत्तम पद्धत म्हणजे तो आधी स्वच्छ धुवून तव्यावर नीट भाजून घ्या. त्यानंतर थंड झाला की मिक्सरमध्ये फिरवून किंवा हाताने चूरा करून ठेवा आणि भाजी, वरण किंवा इतर कोणत्याही पदार्थात वापरा.

 

या गोष्टीही लक्षात ठेवा- पावसाळ्यात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. याशिवाय टोमॅटो सूपही जास्त प्रमाणात पिणे पावसाळ्यात फायदेशीर ठरते.- केळी खाणे शक्यतो टाळावे. पण जर केळी खायचीच असतील, तर ती दुपारी जेवण झाल्यानंतर खावीत. कारण केळी पचण्यासाठी जड असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही भरपेट जेवण केलेले असेल, तेव्हाच तुम्ही ती पचवू शकता.

 

टॅग्स :अन्नपाऊस