Vietnam's Rook Fight to Save People's Homes and Crops! | लोकांची घरं आणि पिकं वाचवण्यासाठी व्हिएतनाममधील रूकेनं दिला वादळ पावसाशी लढा!
लोकांची घरं आणि पिकं वाचवण्यासाठी व्हिएतनाममधील रूकेनं दिला वादळ पावसाशी लढा!

-डॉ. विनिता आपटे

व्हिएतनाममधील बिन्हदिह या ग्रामीण भागात वादळ आणि त्यानंतर मुसळधार पाऊस, हवामानाची अनियमितता यामुळे शेती आणि घरांचं नुकसान ठरलेलंच. अशा संकटातून वाचण्यासाठी कोणतीही तयार यंत्नणा नव्हती. दरवर्षी सरकार काही करत नाही असं म्हणून पुढच्या नुकसानीपर्यंत नागरिक हातावर हात ठेवून बसत असत. पण गेल्या वर्षी या प्रांतातल्या एका पस्तीस वर्षांच्या तरुणीचं घर आणि शेत वाहून गेलं. झालेल्या नुकसानीमुळे ती हतबुद्ध झाली; पण न डगमगता तिनं यावर काहीतरी उपाययोजना करायची असा निर्धार केला. रुके डॅन नावाच्या या तरुणीनं आपत्कालीन संकटांचा सामना करण्यासाठी काय काय करता येऊ शकतं याचा विचार करायला सुरुवात केली तसं तिच्या लक्षात यायला लागलं की हे काम वाटतं त्यापेक्षा कितीतरी अवघड आहे; पण अशक्य नाही. मुळात तिच्या गावातल्या तिच्या लोकवस्तीला पूर येण्याचा धोका कायमच असतो. कारण या लोकवस्तीला जोडणारा एकच रस्ता आहे जो नेहमीच वाहून जातो. त्यामुळे  सगळ्याच घरांचं आणि शेताचं अतोनात नुकसान होतं. सर्वात जास्त हाल होतात ते महिलांचे.
रुके डॅननं या सगळ्याच गोष्टींचा सखोल अभ्यास केला. पावसाळ्यामुळे होणारं घरांचं नुकसान टाळण्यासाठी पूररेषा बदलणं गरजेचं होतं. त्यासाठी तिनं आपल्याबरोबरच्या काही तरुणी गोळा करून मॅपिंग शिकायला सुरुवात केली आणि सरकारी यंत्नणेच्या मदतीशिवाय त्यांनी मॅपिंग करून पूररेषा निश्चित केली. त्यामुळे अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यावर तिथल्या घरातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं सोपं झालं आणि त्यामुळे जीवितहानी वाचवता यायला लागली. पूररेषा निश्चित करणं खूपच आवश्यक होतं कारण कित्येक वर्षांत अशा प्रकारचं मॅपिंग न झाल्यामुळे लोकांनी पूररेषेच्या आत घरं बांधली होती. शेती वाचवण्याकरता मात्र  तिला कोणताच उपाय सापडत नव्हता. अशातच एकदा तिला ‘एशिया मॉनिटर’ या संस्थेविषयी माहिती कळली. ही संस्था पिकांची रचना बदलून सुगीचा हंगाम थोडा अलीकडे आणण्यावर भर देते आणि त्यामुळे हवामानबदलाच्या धोक्यामध्ये पिकांचं नुकसान होत नाही. हा खूपच वेगळा प्रकार; पण कष्टाचा होता. यासाठी सगळ्याच शेतक-याना तयार करायला लागणार होतं.
यामध्ये सहभागी होण्यासाठी पुन्हा महिलाच पुढे आल्या. त्यांनी आपापल्या शेतात कोणती पिकं कधी घेतली जातात याविषयी माहिती सांगायला सुरुवात केली आणि त्याचा एक तक्ता तयार केला. या सर्वांच्या शेतात वादळं सुरू होण्यापूर्वी पिकं घ्यायची होती त्यासाठी बरेच श्रम, पैसे लागणार होते; शिवाय काम जोखमीचं होतं. शेवटी तो एक प्रयोग होता. नेहमीच्या मौसमात येणारी पिकं वेळेच्या आधी तयार व्हायला हवी होती; पण रुके आणि तिच्या मैत्रिणींनी हार मानली नाही. ब-याच लोकांना कामाला लावलं आणि पिकं आधी घेण्याचं उद्दिष्ट साध्य केलं. त्यावर्षीच्या अतिवृष्टीत त्यांच्या शेतीचं नुकसान झालं नाही. त्यानंतर त्यांना खूपच हुरूप आला आणि त्यांनी पूर आणि वादळ नियंत्रण समिती स्थापन केली. त्यात सामील होणार्‍या महिलांना काटेकोर प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवलं. आपत्ती व्यवस्थापन म्हणून पोहायला शिकवणं किंवा माणसांचे  आणि गुरांचे प्राण वाचवण्याचं तंत्न अशा गोष्टी शिकवल्याच, पण स्वत:च्या शेतीचं रक्षण करायचं असेल तर उत्पादन आधी मिळवायचं कसं, त्यासाठी किती दिवस आधीपासून काम करायचं, कशा पद्धतीनं पेरणी करायची याचं वैयक्तिक प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. या प्रशिक्षणाचा खूपच फायदा झाला.  रुके डॅन म्हणते की, ‘या प्रकल्पात सामील झाल्यानंतर मला हवामानबदलाची परिस्थिती आणि त्याच्या परिणामांबद्दल अधिक जाणीव झाली. शेतीवर होणारे दुष्परिणाम आम्हाला समजले; पण त्याचबरोबर पिकांची रचना विशेषत: त्यांचा हंगाम बदलता येईल हे मला कधीच शक्य होईल असं वाटत नव्हतं. पण ते झालं. आता वादळ येण्यापूर्वी आम्ही आमच्या कुटुंबीयांसाठी आणि गावासाठी चांगली तयारी करू शकतो. मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की  या प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी स्वत:हून कोणी यायला तयार होत नाही. प्रत्येकाला दुस-यानं हे काम करावं असं वाटतं; पण आम्ही सतत नवीन लोकांनी प्रशिक्षण घ्यावं यासाठी जनजागृती करतो आहोत. त्याचबरोबर मला अभिमान वाटतो की वादळापूर्वी शेतीचा हंगाम घ्यायची कल्पना म्हणजेच आमचा प्रकल्प थुआ थिएन ह्यू, क्वांग बिन्ह, सीए मऊ आणि डोंग थाप या चार नवीन प्रांतांमध्ये राबवला जात आहे. या गावांना तर पुराचा तडाखा खूपच जास्त प्रमाणात बसतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये आमचे सदस्य या गावांमध्ये सतत काम करत आहेत आणि त्यामुळे गेल्या वर्षात कोणालाही प्राण गमवावे लागले नाहीत. शेतीची रचना बदलल्यामुळे सगळ्यांना आवश्यक असलेली उत्पन्न घेतली जातात आणि गावातच त्याची  देवाण-घेवाण केली जाते. यामुळे  गावातही एकी निर्माण झाली आहे.’ 
रुके डॅनचा उत्साह आणि तिनं गावासाठी केलेलं हे काम पुरेसं बोलकं आहे पूर येण्याआधी त्यावर मात करण्यासाठी आपली यंत्रणा आपणच तयार करायची आणि ते सहज शक्य आहे हेच तिनं सगळ्या जगाला दाखवून दिलं आहे .

(लेखिका तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक  संचालक  आहेत.) 

aptevh@gmail.com

Web Title: Vietnam's Rook Fight to Save People's Homes and Crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.