Today Dussehra .. then must be cross your limits ! | आज दसरा.. मग मर्यादांचं सीमोल्लंघन व्हायलाच हवं!

आज दसरा.. मग मर्यादांचं सीमोल्लंघन व्हायलाच हवं!

-डॉ. प्रज्ञा कुलकर्णी

प्रिय सखी,
आज दसरा ! विजयादशमी ! 
सीमोल्लंघनाला तयार झालीस का? नवरात्र झालं. नऊ दिवस नवदुर्गांच्या नवरंगात न्हाऊन निघालीस. नवरात्राच्या नऊ दिवसांना कोणी देवीच्या रूपांशी जोडलं, तर काहींनी स्री ज्या ज्या नात्यांमध्ये बांधली गेलेली असते, त्या नऊ नात्यांना नऊ दिवसांचा संबंध जोडला. कोणी स्रीची विविध रूपं आणि देवीची रूपं यांची सांगड घातली.
घरकामात व्यस्त असणारी आणि एकाचवेळी अनेक गोष्टी करणारी अष्टभुजा, मुलांना शिकवणारी सरस्वती, घरखर्चाने पैसे वाचवणारी महालक्ष्मी, स्वयंपाक करणारी अन्नपूर्णा, अडचणी निवारणारी पार्वती, कोणी अडचण आणत असेल तर त्या अडचणीवर मात करून दुष्टांचा संहार करणारी दुर्गा, कोणी चुकीची वागणूक दिल्यास नजर आणि शब्द आणि कृतीचा त्रिशुळ घेऊन प्रहार करणारी महिषासुरर्मदिनी, घर आणि घरातल्या सर्वांचं रक्षण करणारी चण्डिका ! प्रत्येकाने आपापल्या परीने तुझ्या शक्तींची, रूपांची आणि तू वठवत असलेल्या भूमिकांची गत नऊ दिवसांशी लावण्याचा प्रयत्न केला. 
तुझ्या नवरात्रातल्या उपवासांचा विचार करताना कोणी तुला काही दुर्गुणांचा  उपवास  (जसं की, राग, निंदा, नालस्ती, मत्सर, अपराधीपणा, भीती) आणि काही सद्गुणांची रुजवात करायला सांगितले असेल, (जसं की निष्काम सेवा, माफ करणं, स्वीकारणं, प्रेम करणं).
माहितीचा जमाना आहे सखी, माहिती तर खूप मिळाली, आता तुला काय करायचंय? तुझ्या कालपर्यंतच्या जगण्याच्या पद्धतीची चौकट थोडी खुली करून (तोडून नाही हं !) तुला सीमोल्लंघन करायचंय. आणि काही सकारात्मक बदल करायचेत स्वत:मध्ये. 
सखी अगं माणूसच आहेस तू, कधीतरी थकणार, दमणार, खचणार, नाराज आणि निराश होणार.
पण या नवरात्रात अलवार फुंकर पडली आणि सारी राख उडून गेलीये तुझ्या निखा-यावर साचलेली. आत्मभान आलंय तुला. रसरशीत झाले आहेत निखारे. 
आता तू जाणीवपूर्वक केलेल्या बदलांचा आणि सकारात्मक कृतीचा धूप भुरभुरलास त्या निखा-यावर की मग बघ- भरून जाईल सगळा आसमंत, सारं अवकाश. तुझ्याभोवतीचं. आणि पूर्ण विश्वातलं अवकाशही भरून जाईल तुझ्यासारख्या अनेकींमधल्या बाईपणाच्या ऊर्जेनं !
सखी, आता समजलंय तुला पुरतं. पुरुषासारखी नाहीसच तू ! समान आहेस; पण ‘सारखी’ नाहीस गं ! तू घडलीच आहेस मुळी वैविध्यपूर्ण छटांनी. तुझं हे वैविध्यच तुझं वेगळेपण आहे. आणि वैविध्य हाताळता येणं हे आहे तुझं अंगभूत कौशल्यं !
उद्यापासून तुझी कामं, तुझं दैनंदिन आयुष्य, तुझी कर्तव्य आणि तुझ्या जबाबदार्‍या काही काहीच बदलणार नाहीत हे खरंय. बदलणार आहे फक्त तुझा दृष्टिकोन !
पुरुष पहाडासारखा कणखर आणि दणकट असेल तर तू प्रवाहासारखी आहेस ! तुझ्यातलं बीजतत्त्वच वेगळं आहे. निराळी आहे तुझी कामं हाताळायची पद्धत ! आणि हाच तुझा गुण आहे. प्रवाह लवचिक असतो. गरजेनुसार वळू शकतो. 
पण त्याची ताकद मात्र असीम असते. पहाडाच्या खडकाला झिजवूही शकतो, तोडूही शकतो आणि त्यावरून लडिवाळपणे वाहत त्याला मऊ गुळगुळीत तरीही कणखर बनवू शकतो ! जे तू करू शकतेस ते तू आणि तूच करू शकतेस !
मानववंशाची सारी निर्मितीक्षमता फक्त तुझ्या ठायी एकवटली आहे. तुझ्याशिवाय निर्मिती केवळ अशक्य आहे. निर्मितीच्या वेदना सहन करायचं तुझं कसब केवळ कमालीचं आहे !
सृजनाच्या या सार्मथ्याबरोबर काही नकोशा वाटणा-या  समस्याही येतात तुझ्या शरीररूपी घटात. या समस्यांना तुझ्या प्रगतीमधला अडसर म्हणून नको पाहूस. नवनिर्मितीच्या प्रक्रियेचं अंग म्हणून पहा. 
घटरूपी देहाचं भरणपोषण, अलंकरण याचा विचार तू करतेस; पण नियमित व्यायामाने शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्याचा विचार आता कर. कर्तव्य तर तू पार पाडतेसच. 
पण ते करताना लक्षात ठेव तू जोडलेली माणसं, मैत्रिणी हीच खरी संपत्ती आहे. प्रसंगानुरूप कठोर किंवा लवचिक व्हायचा प्रयत्न कर.
पैसा तू कमवत, वाचवत असशील; पण आता कुटुंबाचं, समाजाचा आणि देशाचं अर्थकारण समजून घ्यायचा प्रयत्न कर ! असलेल्या खर्च केलेल्या प्रत्येक पैशाची किंमत ठेव !
स्वयंपाकपाणी आणि रांधणं येतच तुला. आता तू शिजवलेल्या अन्नाचा प्रत्येक कण सत्कारणी लावायला लाग. 
मुलांवर प्रेम तू करतेसच आता त्यांना सद्विचार, सद्वर्तन आणि संस्काराची लस दे. समाजातल्या दुष्टशक्तींपासून त्यांना दूर ठेवायला हे लसीकरणच उपयोगी ठरणार आहे.
तुझ्या दैनंदिन जीवनात संकट येणार आहेत आणि तुझी सहनशक्ती, ताकद त्यात पणाला लागणार आहे. संकटकालीन परिस्थितीला स्थिरबुद्धीने, तर्कशुद्ध विचारांनी हाताळायला लाग.
तुझं कुटुंब, मुलं, सहचर यांच्या विजयाचा आनंद स्वत:च्या यशाइतकाच साजरा कर. आजच्या जगात तुला माहिती मिळवणं खूप सोप आहे. पण बुद्धीच्या गाळणीने माहिती आणि ज्ञान यांच्यात फरक करायला शिक !
सखी, या नव्या सवयी लावून दसरा साजरा कर आणि मग पहा दीपोत्सवाआधीच उजळून जाईल तुझं आयुष्यं आणि तुझं कर्तृत्व!

pradnya.kulkarni@dcpune.ac.in

Web Title: Today Dussehra .. then must be cross your limits !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.