Three 'Athlete Mom' won World Athletics Championship after big gap of pregnancy. | आई झाल्यावर विश्व अँथलेटिक्स स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणा-या ‘अँथलिट मॉम’

आई झाल्यावर विश्व अँथलेटिक्स स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणा-या ‘अँथलिट मॉम’

-गौरी पटवर्धन

‘आई’. आपल्याकडे बाईचं संपूर्ण आयुष्य या दोन अक्षरांमध्ये गुंडाळलं जातं. एक म्हणजे ती आई झाली की तिच्या आयुष्याचं सार्थक झालं, आणि दुसरं म्हणजे आई झाल्यानंतर तिनं ‘आईपणा’ सोडून इतर काहीही करू नये. म्हणजे अर्थात घरातली इतर कामं करावीत, घरची कामं सांभाळून मग जमलं तर नोकरी करावी. फार तर एखादी भिशी किंवा योगा क्लास अशी आवड जोपासावी. कारण एकदा ती आई झाली की तिच्या आयुष्याचं सार्थक तर झालेलंच असतं. पण जर का एखादी आई म्हणाली की, मी माझी स्वप्नं बाळाच्या जन्मानंतरपण पूर्ण करीन, तर?
त्यातही ही स्वप्नं धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्याची असतील तर? आणि तेही आंतरराष्ट्रीय स्तरावर धावण्याची असतील तर? आणि त्यात इर्मजन्सी सिझेरिअन झालं असेल तर??? अशा बाईला, जगाच्या पाठीवर सगळीकडे स्वत:ला ‘जरा स्लो डाउन करण्याचा’ सल्ला दिला जाईल यात काही शंका नाही. आई झाल्यावर बाईचं आयुष्य कसं बदलतं इथपासून ते बाळाच्या जन्मानंतर बाईच्या शरीरात खूप बदल होतात, शरीराला ही झीज भरून काढण्यासाठी आवश्यक तो वेळ दिला पाहिजे इथपर्यंत तिच्यासमोर सल्ल्यांचा ढीग तयार होईल. तिच्यावर, तिच्या स्वप्नांवर, तिच्यातल्या जिद्दीवर, तिच्यातल्या ‘करून दाखवण्याच्या’ क्षमतेवर सहसा कोणी विश्वास ठेवणार नाही. मग अशी स्वप्नं बघणार्‍या आईसमोर पर्याय तरी काय उरतात?
आपली स्वप्नं गुंडाळून ठेवून द्यायची किंवा मग 
आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून त्यांच्या मागे धावायचं!यावर्षीच्या विश्व अँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ‘शेली, एॅलिसन आणि लिऊ’ या आयांनी आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवला आणि अक्षरश: त्यांच्या मागे धावल्या. आणि अजिंक्यपद मिळवूनच थांबल्या. 
काय केलं असेल त्यांनी?
बाळ झाल्यानंतर या अँथलिट्सनी आपला फिटनेस कसा टिकवला असेल? बाळंतपणानंतर शरीराला येणा-या  प्रचंड थकव्यावर त्यांनी काय उत्तर शोधलं असेल? तासन्तास ट्रॅकवर सराव करत असताना बाळ कुठे ठेवलं असेल? अगदी त्यासाठी त्यांच्याकडे उत्तम व्यवस्था असली तरी आपलं बाळ काय करत असेल हे बघण्याचा मोह टाळून प्रॅक्टिसवर लक्ष कसं केंद्रित केलं असेल? का त्यांच्या बाळानेच त्यांना हे करून दाखवण्याची प्रेरणा दिली असेल? आपल्याकडे बाळाच्या जन्मानंतर दोन दिवसात परत कामाला लागणा-या   बायकांची अनेक उदाहरणं आपण नेहमीच ऐकतो. पण त्यामागे बव्हंशी वेळा त्यांची मजबुरी आणि नाइलाज असतो. घरी करणारं कोणी नाही, कमावणारं कोणी नाही अशा कारणांनी अनेक बायकांना त्यांच्या तब्येतीची किंमत मोजून बाळंतपणानंतर लगेच कामाला लागावं लागतं. मात्र या ट्रॅकवर धावणा-या अँथेलिट आयांनी स्वत:च्या तब्येतीची उत्तम काळजी घेत आई झालेली स्री काय करू शकते हे दाखवून दिलं. त्यात सगळ्यात महत्त्वाची आहे ती त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती.
गरज म्हणून लगेच कामाला लागणाया  स्त्रिया आणि या चॅम्पियन्स यांच्यातली आंतरिक ऊर्जा एकच असते. फक्त तिला ओळख नसते. त्याचं कौतुक नसतं. पण या जगज्जेत्या अँथलिट आयांनी त्या सगळ्याजणींच्या धडपडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचा चेहरा दिला. या सुवर्णपदक विजेत्या आयांनी आईपणाची नेहमीची चौकट मोडली आणि बाळंतपणानंतर येणा-या मर्यादांच्या सीमा ओलांडल्या. बाळंतपणानंतरच्या मर्यादांचं, गैरसमजांचं सीमोल्लंघन करायचं असेल तर या जगज्जेत्या अँथेलिट आयांच्या कामगिरीकडे बघावं.

---------------------------------------------------------------

लिऊ हाँग 
लिऊ हॉँगनं 2017मधील जागतिक अँथलेटिक्स स्पर्धेत 20 किमी आणि 50 किमीच्या रेस वॉकमध्ये अजिंक्यपद पटकावलं होतं. आणि आता दोहा इथे झालेल्या जागतिक अँथलेक्टिस स्पर्धेत तिनं 20 किमी रेस ऑक ही स्पर्धा जिंकली. पण ही स्पर्धा तिच्या आधीच्या स्पर्धांसारखी नव्हती. 2017 नंतर जवळ जवळ दोन वर्षांनी ती पहिल्यांदा इतक्या मोठय़ा स्पर्धेत उतरली होती. जानेवारी 2019पासूनच तिनं छोट छोट्या स्पर्धेत उतरायला सुरुवात केली होती. या स्पर्धेत तिला आपला पूर्वीचा जोश हवा होता. तोच फॉर्म हवा होता. दोहा येथे जागतिक अजिंक्यपद पटकावल्यानंतर आनंदित झालेली लिऊ म्हणाली की, ‘आज मी ते मिळवलं ज्यावर मी दोन वर्षांपूर्वी थांबले होते.’ 2017च्या शेवटी तिनं मुलीला जन्म दिला. पण दोन वर्षाच्या गॅपनंतरही तिच्यातली जिद्द आणि ऊर्जा कमी झालेली नव्हती. उलट ती वाढली असं तिला स्वत:लाच वाटत होतं. ‘आई होणं म्हणजे बाईसाठी एक मोठा कष्टाचा आणि अवघड कालावधी असतो. गरोदरपण, मग प्रसूती, मग बाळाची देखभाल असं एकामागून एक चालू असतं. पण यातूनच मी कणखर झाले’, असं लिऊ म्हणते. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमधील विजयानंतर खरं तर लिऊ निवृत्ती घेणार होती. पण तिनं विचार बदलला. खेळाविषयीची तडफ आपल्यात तशीच कायम  असल्यानं तिनं पुन्हा स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला.

----------------------------------------------

शेली अँन फ्रेझर प्राइस
ही जमैका देशातली रनर. उंचीला केवळ 5 फूट आहे. कमी उंचीमुळे आणि अत्यंत वेगवान सुरुवात करण्यामुळे तिला ‘पॉकेट रॉकेट’ असंही म्हणतात. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या शेली अँननं यापूर्वी 100 मीटर स्प्रिंटमध्ये तीन विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याशिवाय तिने दोन ऑलिम्पिकमध्येही 100 मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. 2017 सालच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतून तिला गरोदरपणामुळे माघार घ्यायला लागली होती. मात्र  मुलाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी तिनं दोहा इथं झालेल्या जागतिक अँथलेटिक स्पर्धेत  भाग घेतला. 100 मीटरची स्पर्धा 10 मीनिटं 71 सेकंद या विक्रमी वेळेत तिनं स्पर्धा जिंकली आणि दोन वर्षांनंतर तिच्या आयुष्यात विजेतेपद आलं. हे पदक जिंकल्यानंतर शेलीला सगळ्यात आनंद याचा होता की तिचा मुलगा ही स्पर्धा पाहात होता. ती म्हणते की, ‘सदैव विनयशील राहाणं, स्वत:ला एक माणूस म्हणून, एक अँथलिट म्हणून ओळखणं आणि सतत कष्ट करत राहाणं हेच माझ्या अजिंक्यपदाचं रहस्य आहे.’ 

-------------------------------------------------

एॅलिसन फेलिक्स 
एॅलिसन फेलिक्स या अमेरिकन धावपटूनं दोहा येथील स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. तिनं सर्वाधिक विश्वविजयाचा जमैकाच्या उसेन बोल्टचा विक्रमही मोडीत काढला. 4 बाय 400 मीटर रिले स्पर्धेत तिनं 12 सुवर्णपदकं मिळवली आहेत.
पण हे पदक पटकावण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. नोव्हेंबर 2018 म्हणजे अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच  गरोदरपणातल्या गुंतागुंतीमुळे 32व्या आठवड्यात तिचं सिझर करावं लागलं. या अवघड परिस्थितीतून बाहेर पडत आपली जगात अँथलिट म्हणून असलेली ओळख तिला परत मिळवायची होती.  गरोदरपण आणि प्रसूतीनंतरचा काही काळ ती महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकली नाही. पण ती म्हणते की, ‘यामुळे मी खचली नाही. कारण मला माहीत होतं की आपण एक वेगळीच लढाई लढतो आहोत. ती लढायची हे मीच ठरवलं होतं. या जगण्याच्या आणि जगवण्याच्या स्पर्धेत मी माझ्यातलं सवरेत्तम ते दिलं आणि मला तेव्हा हेही माहीत होतं की आपला खेळ संपलेला नाही. मला मी कोण आहे आणि काय करू शकते याचा पूर्ण अंदाज होता. त्यामुळे आईपण ही माझ्यासाठी अडचण नव्हतीच !’

(लेखिका मुक्त पत्रकार आहे)

patwardhan.gauri@gmail.com

Web Title: Three 'Athlete Mom' won World Athletics Championship after big gap of pregnancy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.