Take care of your mind before you face a difficult situation! | अवघड परिस्थितीशी लढण्याआधी आपल्या मनाला सांभाळा!

अवघड परिस्थितीशी लढण्याआधी आपल्या मनाला सांभाळा!

- प्रतिनिधी

कोरोना व्हायरस, लॉकडाउन, नोकरीतली अस्वस्थता, पुढे काय होणार? आपण सुरक्षित राहू का? असे प्रश्न मनातली भीती वाढवतात. मन अस्थिर करतात. अशा या अनिश्चिततेच्या काळात मन:स्वास्थ्य सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. अर्थात, यासाठी कोणतीही गोळी किंवा औषध उपयोगाचं नाही. यासाठीचे उपाय आपले आपल्यालाच करावे लागतील. या अस्थिर वातावरणात  तज्ज्ञांनी सुचवलेले मन:स्वास्थ्य जपण्याचे उपायही आहेत. जे फक्त या कोरोना काळातच नाही तर कधीही मन सैरभैर झालं तर करता येतील असे आहेत. 
मनाला सांभाळताना..
*  जेव्हा भीती वाटते, हे काय संकट आपल्यावर कोसळलंय असं वाटायला लागतं तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या. स्वत:ला सांगा की सर्व काही व्यवस्थित आहे.  आपल्या सर्व संवेदना व्यवस्थित काम करत आहेत. आपण या परिस्थितीशी सामना करू. तरून जाऊ, हा सकारात्मक विचार मनाला चालना आणि ऊर्जा देतो.
 * अनेकदा आपण आपली तुलना इतरांशी करतो. अशी तुलना केल्यानं स्वत: जे करतो आहोत, किंवा आपण जे आहोत त्याबद्दल समाधान वाटत नाही. सारखं काहीतरी कमी असल्यासारखं जाणवतं. ही कमीपणाची जाणीवही मन अस्थिर करते. तेव्हा आपलं मन जर इतरांशी तुलना करायला लागलं तर आधी एक मिनिट थांबा. अशी तुलना करणं योग्य नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. त्यामुळे अशा तुलनेचा उपयोग होणार नाही, असं स्वत:ला समजावून सांगा. 
*  जोर्पयत आपण आपल्या समोरची परिस्थिती नाकारत राहातो तोर्पयत आपलं मन दुखी किंवा घाबरलेलं असतं; पण एकदा का परिस्थिती स्वीकारली की आपण आपल्याला नेमकं काय करायला लागेल याचा विचार करतो आणि तसे उपाय करू लागतो. अशा प्रकारचा स्वीकार मनाला ताकद देतो. उभारी देतो. आणि आपण हे करू शकतो असा विश्वासही देतो. म्हणून आधी आहे ती परिस्थिती नाकरण्यापेक्षा तज्ज्ञ म्हणतात की परिस्थिती स्वीकारा. 
 रिकामं बसूनही मनात भलतेसलते विचार येऊन घाबरायला होतं. त्यामुळे सतत कामात राहाणं, आपलं मन वाचन वगैरे कृतीत गुंतवून ठेवणं चांगलं. आपली दिवसभराची दिनचर्या ठरवून ती पाळण्याकडे लक्ष दिल्यास आपल्याला करायला खूप काही आहे याची जाणीव होते. आणि आपण कार्यमग्न राहातो. कार्यमग्न राहणा -यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहातं असं तज्ज्ञ सांगतात.

  

Web Title: Take care of your mind before you face a difficult situation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.