Take a advice from one and treatment from others... How cure illness this way? | सल्ला एकाचा औषध भलत्याचं.. आजार बरा होईल कसा?

सल्ला एकाचा औषध भलत्याचं.. आजार बरा होईल कसा?

- वैद्य सुविनय दामले

आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे अँलोपॅथीला पर्याय. असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. पॅरासीटामोलच्या ऐवजी आयुर्वेदात काय आहे असे विचारणं म्हणजे मोहोरीच्या ऐवजी बेसन आहे का असं  विचारल्यासारखं आहे. यांची तुलना कधीही करू नये. प्रत्येक पॅथीची स्वत:ची अशी खास वैशिष्ट्यं असतात. प्रत्येक शास्त्नाचे स्वत:चे सिद्धांत असतात. त्यांचा योग्य तो आदर राखलाच पाहिजे. बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यानी म्हणावं, बीएस्सी करून काय होणारे, बीएस्सी करत असलेल्यांनी म्हणावं आर्टस शिकण्याची काही आवश्यकताच नाही. हे योग्य नव्हे. 
मधुमेहासारख्या आजारात रुग्णाला नेमकेपणानं काय होतं आहे, त्याला काय हवंय हे प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. भविष्यात अमुक होईल म्हणून आत्ता असं वागलं पाहिजे ही भीती अवाजवी आहे. 
नखाला भविष्यात चुकुन होणारं नखुर्डे हे कॅन्सरमधे रूपांतरीत होऊ शकतं, हो किंवा नाही.  
या दोन पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायला सांगितला तर दुर्दैवानं याचं उत्तर हो असंच द्यावं लागतं,  असं आजचं वैद्यक शास्त्र सांगतं. नियमावर बोट ठेवलं तर भविष्यात होणारा नखाचा कॅन्सर टाळण्यासाठी आपण नखच काढून टाकूया,  असा विचार करणं योग्य होईल का ? 
रक्तातली साखर वाढली तर किडनी, डोळे इ. अवयवांवर विपरीत परिणाम होतात, असं एक वैद्यक शाखा म्हणते. अवयवांवर विपरीत परिणाम होतो तो, रक्तातली साखर वाढली म्हणून की,  त्यासाठी कायमस्वरूपी घ्याव्या  लागणा-या  औषधांचे ते दुष्परिणाम आहेत, यावर अजूनही संशोधन  सुरूच आहे. शिवाय मनात निर्माण झालेली भीती देखील हॉर्मोन्समधे बदल घडवत  असतेच.   
मधुमेहामधे रक्तातली साखर तपासणी, किंवा तत्सम रासायनिक तपासण्या करणं हाच एकमेव योग्य निकष आहे, असं  म्हणण्याची काहीच   आवश्यकता नाही. त्या वैद्यकामधे अजूनही संशोधन सुरूच आहे. त्याचे निकष अजूनही बदलत आहेत. आणि रक्तातल्या साखरेचा निकष खरं सांगायचं तर आयुर्वेदात सांगितलेलाच नाही. 
त्यामुळे मधुमेहामधे रक्तातली साखर नॉर्मल करणं हा आयुर्वेदीय चिकित्सेचा उद्देश असूच शकत नाही. हे वैद्यांच्याच अजून ध्यानात येत नाही तर सामान्य लोकांनी तशी अपेक्षा करणं चुक नव्हे.
हा विचार समजून घेणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीनं निदान केलं जातं, त्याच पद्धतीनं चिकित्सा, पथ्य अपथ्य, योग, प्राणायाम यांचा विचार केला तर चिकित्सा पूर्णत्वाला जाईल. जे सिद्धांत आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत, ते अन्य पॅथीमधे कसे बसवता येतील ? असं करणं म्हणजे गोल भोकात चौकोनी पाचर ठोकण्यासारखं आहे. कृपया असा विचार सुद्धा करू नये. नाहीतर जे पाहिजे ते (आरोग्य ) आपल्याला कधीही पूर्णत्वानं मिळणार नाही. आणि औषधं मात्र  कायमस्वरूपी पूर्णपणे  घ्यावी लागतील.  
जर आपल्याला घोडा बनवायचा असेल तर त्याचं डोकं , पोट, आयाळ तोंड आणि अगदी शेपूट देखील घोड्याचीच बनवली पाहिजे. 
तरच त्या कलाकृतीला घोडा असं म्हणता येईल. नाहीतर तोंड करायचं घोड्याचं, आयाळ करायची सिंहाची, पोट करायचं वाघाचं, आणि शेपूट लावायचं शेळीचं.  कसा दिसेल हा प्राणी ? त्याला पूर्णत्व येणार नाही. प्रत्येक शास्त्राची स्वत:ची एक परिभाषा असते. त्याच परिभाषेत ते सिद्धांत समजून घ्यावे लागतात. तसं केलं नाही तर आपल्याला जे पाहिजे ते पूर्ण स्वास्थ्य कदापि मिळणार नाही.
निदान करायचं अँलोपॅथीनुसार, तपासण्या करून घ्यायच्या रसायनशास्त्रप्रमाणो, चिकित्सा ठरवायची आयुर्वेदानुसार, पथ्यं करायचं निसर्गोपचारानुसार, आणि औषधं घ्यायचं होमियो पद्धतीनुसार! 
याशिवाय अमूक दीदीचे सल्ले,  तमूक स्वामीजीनी सांगितलेले उपाय, व्हॉॅटसअँप महाराजांचे नुस्खे आहेतच. 
अशा भीतीच्या पायावर उभारलेल्या विचारसरणीनं रोग कसा बरा होईल ? हे रु ग्णांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि वैद्यांनी सुद्धा !

(लेखक आयुर्वेदाचार्य आहेत.)
drsuvinay@gmail.com

Web Title: Take a advice from one and treatment from others... How cure illness this way?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.