The story of piryabhau who enjoying with trees | झाडांसोबत रमणा-या पि-याभाऊची गोष्ट

झाडांसोबत रमणा-या पि-याभाऊची गोष्ट

- डॉ. दीना नाथ

मुख्य रस्त्यापासून पाचेक किलोमीटर आतल्या गावाला जायचं होतं. आम्ही चौघे जण एकत्र होतो. एक मोपेड आणि एक मोटारसायकल घेऊन मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर अंतर संपलं असेल. भिलपाडा कुठे आहे अशी चौकशी केल्यावर दाखवणा:यानं अशा पद्धतीनं हात दाखवला की, त्याचा अर्थ काहीही होऊ शकतो. सरळ सरळ निंगी जावा. लगी भिलपाडाच लागल. 
काही अंतरानंतर आता पुढे वाहन जाणं शक्य नाही हे लक्षात आलं. गाडय़ा रस्त्याच्या बाजूला लावून सगळे पायवाट तुडवत निघाले. थोडं पुढे गेल्यावर 5-6 झोपडय़ा दिसल्या. भिलपाडा हाच का? असं विचारल्यावर एक तरुण म्हणाला, कोणाला भेटायचं?
पि-या उकडय़ा भिल असं नाव सांगितल्यावर त्यानं क्षणभर डोकं  खाजवलं. आमच्यापैकी कोणीतरी त्याला नीट लक्षात यावं म्हणून म्हटलं, पि-या भाऊंनी जंगल सांभाळलं आहे, त्यांनाच भेटायचं आहे. आता त्याची टय़ूब पेटली असावी. म्हणाला,  ‘आता डावीकडे सरळ जावा. हिरवागार डोंगर लागेल. तिथं पि:याभाऊ भेटतील. 15-20 मीनिटं तरी चालावं लागेल बरं का..’
आम्हाला माहिती अशी मिळाली होती की,  या सद्गृहस्थांनी अंतप्र्रेरणोनं या डोंगरावर जंगल वाढवलं होतं. दिवसभर याच्या पायथ्याशी बसून लक्ष ठेवत. कोणी झाडे तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला हात जोडून विनंती करत-परावृत्त करण्याचा प्रयत्न करत. त्यांच्या वयाचा सन्मान ठेवून बरेच तोड करणारे माघार घेत. क्वचित एखादा ऐकतही नसे. दु:खी अंत:करणानं त्यांना तेही बघावं लागे.पुढच्या काही दिवसात शालेय मुलांच्या क्रीडा स्पर्धा घ्यायच्या होत्या. त्याच्या बक्षीस वितरणासाठी कोणीतरी वेगळं; पण छान काम केलेल्या  व्यक्तीच्या शोधात आम्ही होतो. पि-याभाऊंचं  नाव कळताच त्यांना भेटून, त्यांचं काम बघून, या बक्षीस वितरणाच्या कार्यक्र मासाठी त्यांचं नाव निश्चित करावं म्हणून हा सगळा खटाटोप चालला होता. थोडय़ाच वेळात एक हिरवाकंच छोटा डोंगर पायवाटेच्या उजवीकडे दिसू लागला. पण डोंगराच्या पायथ्याशी कोणी माणूस दिसेना. दोघं-दोघं दोन्ही बाजूंनी थोडं पुढे जाऊन कोणी दिसतं का याचा अंदाज घेत होते. शेवटी आवाज देणं सुरू झालं. पि-याभाऊंना आवाज पोहोचला असावा. वरतून एका पायवाटेनं हातात काठी घेऊन ते हळूहळू उतरताना दिसले. राम राम झाला. तो सुंदर डोंगर आणि त्याचे वैभव पाहून सगळे खूश झाले. दहा वर्षापासून हा वरकरणी अत्यंत साधा दिसणारा माणूस हे जंगल राखत होता. वय साधारण 60 तरी असावं. किंचित लहानसर चण, डोईवर मळकट पांढरी टोपी, किंचित वाढलेली दाढी, हातात काठी, कंबरेला मळकट निम्मे धोतर आणि अंगात अर्धी बाह्या नसलेली बंडी. आमच्या विनंतीवरून आम्हाला सर्वाना अध्र्या तासात त्यानं तो छोटा डोंगर फिरवून आणला. अर्जुन, साग, जंगली केळी असे विविध वृक्ष त्यानं कौतुकानं दाखवले. विविध वृक्षांचे वय, औषधी गुण, त्याचे अन्य उपयोग हे सांगताना जणू तो आपल्या कुटुंबाची ओळखच करून देत होता. त्याच्या चेह-यावर आनंदयुक्त अभिमान जणू वाहत होता.


  ‘असं काही करण्याची प्रेरणा कशी मिळाली?’
 आमचा प्रश्न.
- एक खोल नि:श्वास टाकून तो म्हणाला,  ‘इथून तासभर चालल्यावर आंबेगाव आहे. मी लहान होतो तेव्हा तिथं एक म्हातारा राहत होता. त्याच्या पायाला एक जखम होती आणि त्याला कायम एक चिंधी बांधलेली असे म्हणून त्याला लोक चिंध्याबाबा म्हणत. त्याला औषधी वनस्पतींचं खूप ज्ञान होतं. रोज    येणा-या गरजूंना तो फुकट औषध देई. कोणी पैसे दिले तरी घेत नसे. मात्र प्रत्येकाला तो आवर्जून एक विनंती करे, तुला या औषधानं बरं वाटलं तर एक तरी वृक्ष वाढव.. ’ पि-या भाऊसारख्या अनेकांनी ही औषधं घेतली. पण फार कोणी वृक्ष वाढवायचं मनावर घेतलं नसावं. पण ज्या दिवशी चिंध्याबाबाच्या मृत्यूची बातमी पि-याभाऊंना कळाली, त्या दिवशी त्यांनी ठरवलं, की झाड जगवण्यासाठी काहीतरी करायचं.
पहिली काही र्वष नुसते प्रयोग झाले. घराच्या आजूबाजूला, अत्यंत छोटय़ा शेताच्या बांधावर, रस्त्याच्या बाजूला. हळूहळू लक्षात आलं की, या छोटय़ा डोंगराला शरण गेलं पाहिजे. तेव्हापासून हा डोंगर त्यांचा सखा झाला आणि तिथल्या वृक्षवेली त्यांची मुलं-बाळं. सकाळी घरातून भाकर खाऊन निघायचं ते थेट हा डोंगर गाठायचा. दिवसभर सर्वत्र नजर ठेवून मावळतीला घरी.
-त्याच्या हस्ते पोरांना बक्षीस देणार हे ऐकल्यावर तर ते गडबडून गेले. दोन्ही हात जोडून म्हणाले, ‘मी काही शिकेल नाही. मला तिथं नेऊ नका. मी आपला माझ्या डोंगरालाच बरा.’
आम्ही काही हट्ट सोडला नाही. त्यांना कोणीतरी मोटारसायकलवर घ्यायला येईल म्हणल्यावर परत हात जोडून म्हणाले, ‘मी कधी फटफटीवर बसलो नाही. तुम्ही खरंच ऐका. दुसरा कोणी पुढारी बघा.’
शेवटी एकदाचे तयार झाले.
ठरल्याप्रमाणे स्पर्धा झाल्या. अत्यंत संकोचत पि-याभाऊंनी बक्षिसं वाटली. तोडक्या मोडक्या शब्दात मनोगतही मांडलं..
नंतर अशा खूप स्पर्धा दरवर्षी होत राहिल्या. पण ही लक्षात राहिली त्या वनयोग्यामुळे.

(लेखक गेली तीस वर्ष आदिवासी, ग्रामीण,  निमशहरी भागात वैद्यकीय व्यवसाय करतात)

deena20nath@gmail.com

Web Title: The story of piryabhau who enjoying with trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.