The story of the Muhamma village in Kerala making the village a synthetic sanitary pad free. | गावाला सिंथेटीक सॅनिटरी पॅड फ्री बनवणा-या केरळमधील मुहम्मा गावाची गोष्ट

गावाला सिंथेटीक सॅनिटरी पॅड फ्री बनवणा-या केरळमधील मुहम्मा गावाची गोष्ट

- भाग्यश्री मुळे


देवभूमी केरळ अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. मुक्तहस्ते केलेली निसर्गाची उधळण,  चहाचे मळे, मसाल्यांच्या बागा, अशा अगणित गोष्टींबरोबरच आता  त्यात आणखी एका महत्त्वपूर्ण बाबीची भर पडली आहे आणि ती म्हणजे  देशातील पहिलं सिंथेटिक सॅनिटरी प्याडमुक्त गाव म्हणून केरळ राज्यातील अलेप्पी जिल्ह्यातील मुहम्मा गावाची ओळख निर्माण झाली आहे. या गावच्या ग्रामपंचायतीनं गाव प्लॅस्टिकमुक्त करण्याची चळवळ हाती घेतली असून,  त्याचाच एक भाग म्हणून गावातील महिलांनी सिंथेटिक सॅनिटरी पॅड वापरणंही पूर्णपणो थांबवलं आहे.
कसं झालं हे?
मुहम्मा गावात एकदा नेहमीप्रमाणो ग्रामपंचायतीची बैठक सुरू असताना  गावातील कच:याचा विषय निघाला.  प्लॅस्टिकमुळे कचरा वाढत असल्याचंही चर्चेत समोर आलं. त्यातूनच गावात महिलांना सिंथेटिक सॅनिटरी पॅडचा वापर थांबवण्याचा विषय चर्चिला गेला. हा विषय आपण का हाती घेऊ नये असा विचार सरपंचांच्या मनात आला आणि सर्व सदस्यांनी होकार देताच त्यावर काम करण्याचा निर्णय झाला. 
 ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील महिलांना यासाठी प्रेरित केलं.  चांगल्या सुती कपडय़ापासून बनवलेलं आणि वारंवार वापरता येईल असं कापडी पॅड किंवा मेनस्ट्रअल कप वापरण्याचा सल्ला त्यांनी महिलांना दिला. या गोष्टी त्यांनी  महिलांना उपलब्धही करून दिल्या. सिंथेटिक सॅनिटरी पॅडमुळे होणारं पर्यावरणचं नुकसान त्यांनी महिलांना समजावून सांगितलं. प्रत्येक महिलेला 4 कापडी पॅड आणि एक कप नाममात्र दरात दिला. ग्रामपंचायत सदस्य  जे.  जयालल यांचं म्हणणं आहे की, एका सिंथेटिक सॅनिटरी पॅडमध्ये चार प्लॅस्टिकच्या कॅरिबॅग इतकं प्लॅस्टिक असतं.  त्यामुळे  गाव प्लॅस्टिकमुक्त करताना आम्ही आमचा मोर्चा या सिंथेटिक सॅनिटरी पॅडकडेच आधी वळवला. दर महिन्याला पंचक्रोशीतून जवळपास एक लाखाहून अधिक वापरलेले सिंथेटिक सॅनिटरी पॅड डंपिंग ग्राउंडवर येत होतं. वापरलेल्या सॅनिटरी पॅडची अशास्त्रीयरीत्या लावली जाणारी विल्हेवाट  यामुळे जमिनीतील माती आणि पाण्याला धोका पोहोचत होता. शिवाय सिंथेटिक सॅनिटरी पॅड हे 9क् टक्के प्लॅस्टिकपासून बनवलेलं असतं आणि त्याचं विघटन व्हायला पुढील 500 ते 700र्वष लागतात. हे लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पी. थीलोथमन यांनी या मोहिमेसाठी विशेष पाठबळ दिलं. ही मोहीम  ‘मुहम्मामोदयम’  म्हणून ओळखली जात आहे.
 ग्रामपंचायत आणि बंगळुरूच्या अशोका ट्रस्ट  (अशोक ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँण्ड एनव्हार्योमेण्ट) चा संयुक्त उपक्रम म्हणून तो राबविला गेला. 
इच्छाशक्तीला अभ्यासाची जोड
केरळमधील निसर्ग संपत्तीचं संरक्षण करणं आणि शाश्वत जीवनशैलीद्वारे नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन करणं हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविला गेला. हा उपक्रम राबविण्यापूर्वी प्लॅस्टिक कच-यामुळे तुंबलेली गटारं, नद्या, तळे यांचा ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी अभ्यास केला होता. पाहणी केली होती. त्यात सिंथेटिक सॅनिटरी पॅडचा कचराच पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरत  असल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं. केरळातील मोठी नदी वेम्बनाडला जोडणा-या कनालच्या तोंडाशी डायपर आणि सिंथेटिक सॅनिटरी पॅडचा मोठा ढीगच त्यांना आढळून आला. ब-याचदा यामुळे नाले, गटारे तुंबण्याचं आणि  रस्त्यावरून त्याचे पाट वाहण्याचे प्रकार घडत होते. याचा पर्यावरणाला मोठा धोका पोहोचत असल्याचंही दिसून आलं. दरवर्षी या भागातून एक लाखाच्या वर पॅड गोळा केले जातात. सिंथेटिक सॅनिटरी पॅडमध्ये पर्यावरणाला हानिकारक असे अनेक प्रकारचे रासायनिक घटक असतात. जेव्हा ते जाळलं जातं तेव्हा मानवी आरोग्याला अपायकारक ठरतील असे अनेक विषारी वायू बाहेर पडतात. ते निसर्गालाही हानिकारक ठरतात. त्यामुळेच सुती पॅड आणि कप हे आरोग्य प्रश्न कमी करतात आणि पर्यावारणपूरक ठरत आहेत. त्यामुळे या पॅडच्या विल्हेवाटीचा विचार करण्यापेक्षा त्यांना बाद करून पर्यावरणपूरक कापडी पॅड वापरले तर या मोठय़ा श्रम आणि  आर्थिक खर्चातून सुटका होणार आहे हेही  त्यांच्या लक्षात आलं. यात गावातल्या  आशा कार्यकर्त्यांनी मोठं योगदान दिलं. त्यांनी घरोघरी जाऊन महिलांना सिंथेटिक  सॅनिटरी पॅडच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि सुती पुनर्वापराचे पॅड आणि कपचे फायदे समजावून  सांगितले. शिवाय कप कसा वापरायचा तेही सांगितलं. याशिवाय शाळांमध्येही या विषयावर कार्यशाळा आणि  प्रशिक्षण कार्यक्रम राबवले गेले. यातून चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती झाली. लोकांना या विषयाचं गांभीर्य समजलं. गावाच्या या यशामुळे केरळ राज्यानं गावाचं, ग्रामपंचायतीचं विशेष कौतुक केलं आहे. गावाच्या शिरपेचात आता हा मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. या उपक्रमासाठी आलेप्पिच्या नगरपालिकेनं 5 हजार मेनस्ट्रअल कपांचं मोफत वाटप केलं. महिला आता मासिक पाळी दरम्यान या शाश्वत साधनांकडे  वळतील. शिवाय सुती कापडाचे पॅड महिला घरीही बनवायला शिकू शकतील. कप तर 5 वर्ष सहज  वापरला जातो. शिवाय तो 750सॅनिटरी पॅडचा उपयोग वाचवतो. त्यामुळे या महिला या उपक्रमाद्वारे पर्यावरणाचं आणि स्वत:च्या आरोग्याचं  रक्षण असा दुहेरी हेतू साध्य करू शकत आहेत. सध्या शाळकरी मुलींना याचं महत्त्व समजून सांगण्यावर भर दिला जात आहे.

गावातलं पर्यावरण सुरक्षित ठेवायचं असेल तर प्लॅस्टिकचा कचरा हद्दपार करायला हवा. आणि प्लॅस्टिक हटवायचं असेल तर सिंथेटिक
 सॅनिटरी पॅडचा वापर थांबवायला हवा असं केरळमधील मुहम्मा गावच्या ग्रामपंचायत सभासदांच्या लक्षात आलं आणि गाव पॅडमुक्त करण्याची 
चळवळ उभी राहिली. या चळवळीनं महिलांच्या हातात एक सुरक्षित 
पर्यायही ठेवला.

( लेखिका मुक्त पत्रकार आहे.)

bhagy_2411@yahoo.com

 

Web Title: The story of the Muhamma village in Kerala making the village a synthetic sanitary pad free.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.