A story about Women who came forward to save forest! | जंगल लुटणा-या महिलाच जेव्हा जंगलाच्या रक्षणासाठी पुढे येतात.. व्हिएतनाममधील  फामची गोष्ट !       
जंगल लुटणा-या महिलाच जेव्हा जंगलाच्या रक्षणासाठी पुढे येतात.. व्हिएतनाममधील  फामची गोष्ट !       


-डॉ. विनिता आपटे

व्हिएतनाममधील झुआन थुय नॅशनल पार्कमध्ये सूर्योदयापूर्वी शेकडो महिला समुद्राकाठी जमतात. समुद्राच्या ओहोटीच्या वेळेचा फायदा घेऊन गोगलगायी आणि मासे गोळा करतात. यावरच त्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात.
पहाटे 4 वाजण्यापूर्वीच या महिलांचा दिवस सुरू होतो. घरातला स्वयंपाक आणि इतर कामं करून या महिला सायकलवरून आठ किलोमीटरवर असलेल्या समुद्रकिना-यावरील दलदलीच्या जागेवर पोहचतात. झुआन नॅशनल पार्कच्या जवळचं हे खारफुटीच्या जंगलाचं संरक्षित क्षेत्र . इथे काम करणा-या शेकडो महिलांचं नेतृत्व करते फाम थी किम फुंग. आपल्या कुटुंबासाठी आणि गुरांसाठी खाण्याची व्यवस्था करून पहाटे 4 वाजता तीही तिच्या दिवसाची सुरुवात करीत असे. 
साधारण 2013 साली पार्कव्यवस्थापनानं स्थानिक महिलांना खारफुटीच्या जंगलाच्या सहव्यवस्थापनात सामील करून घेतलं. त्यामुळे गावातल्या लोकांच्या अन्नपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. इकडे राहणा-या महिलांना कुटुंबाच्या पोषणासाठी याच भागातून अन्नसामग्री, पाणी, इंधन या गरजा भागवून शिवाय विक्रीसाठी काही भाग मिळवावा लागत होता. त्यामुळे इथली खारफुटीची जंगलं नाहीशी होत होती. पर्यावरणाला हानिकारक या हालचालींमुळे पार्क व्यवस्थापनानं या महिलांच्या गळ्यात संयुक्त व्यवस्थापनाची जबाबदारी टाकली आणि सगळ्याच महिलांची स्थिती इकडे आड तर तिकडे विहीर अशी होऊन गेली. भोळ्याभाबडय़ा महिला एका प्रभावी रणनीतीचा सामना करण्यास असमर्थ ठरल्या. समोर कुटुंबातील मुलांची भूक भागवण्यासाठी संरक्षित क्षेत्नाचा वापर करणं याशिवाय पर्याय नव्हता; पण त्यावर आता बंधन आलं होतं. या महिलांना हेही कळत होतं की आपण घेत असलेल्या समुद्र संपत्तीमुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. पण दुसरा पर्याय काय असेल याचा विचार त्यांच्यार्पयत पोहोचत नव्हता. फामसारख्या अनेक महिला हतबल झाल्या; पण एकदिवशी पहाटे फाम काहीशा निर्धारानं सायकलवरून निघाली ती  पर्यावरणीय क्षेत्नाची काळजी घेण्यासाठी म्हणून  महिला समुदायाचा सहभाग घेण्यासाठी.
फामनं संयुक्तसह व्यवस्थापन समितीमध्ये सामील असलेल्या महिलांना खारफुटीची जंगलं आपण तयार करू शकू का यावर विचार करायला सांगितलं आणि त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करायलादेखील सांगितलं.
याच दरम्यान फामच्या  कॉलेजमध्ये शिक्षण घेणा-या आणि शहरात राहणा-या दिरानं तिलाI UCN   संस्थेविषयी माहिती सांगितली आणि तिनं त्या संस्थेची मदत घेण्याचं ठरवलं. या संस्थेकडून तिला मिळालेली माहिती आश्चर्यकारक होती.
तिला त्यामुळे समजलं की तिच्यासारख्या जगभरातील कोटय़वधी महिलांवर अन्न उत्पादन, पाणी आणि इंधन गोळा करणं अशा अनेक  पारंपरिक जबाबदा-या आहेत. आणि ब-याच देशांमध्ये त्यांच्या कुटुंबासाठी आणि समुदायांचं कल्याण करण्यासाठी नैसर्गिक संसाधनं विकसित करण्यात या महिलांचा मोठा वाटा आहे.
त्यानंतर फाम एकाच विषयानं झपाटून गेली. महिलांना अन्नसुरक्षेबरोबरच आर्थिक सुरक्षा देण्याचा तिनं चंगच बांधला. ज्या खारफुटीच्या जंगलावर त्या इतके दिवस गुजराण करत होत्या त्याच जंगलाला वाचवण्यासाठी फामनं पुढाकार घेतला. जंगलातल्या वनस्पतींच्या बिया गोळा करणं, त्या बिया साठवणं आणि त्यांची पुनर्निर्मिती करणं यासाठी प्रशिक्षण घ्यायला फाम  IUCN  ने आयोजित केलेल्या एका कार्यशाळेमध्ये सहभागी झाली. रीतसर प्रशिक्षण घेऊन गावातल्या महिलांना एकत्रित करून तिनं खारफुटीच्या जंगलांच्या संवर्धनाची मुहूर्तमेढ रोवली. जे शेकडो हात त्या जंगलात स्वत:चं अन्न गोळा करताना कळत नकळत जंगल नष्ट करत होत्या त्या आता जंगल पुनर्निर्मितीसाठीपण वेळ देऊ लागल्या. आपल्या पुढच्या पिढय़ांना अन्नसुरक्षा मिळावी म्हणून मनापासून खारफुटीच्या जंगलांची काळजी घेऊ लागल्या.
आता प्रश्न होता तो रोजगार मिळण्याचा. जोर्पयत अशा कामातून रोजगार मिळणार नाही तोर्पयत ही चळवळ जोर धरणार नाही याची पूर्ण खात्री असलेल्या फामला आता काळजी वाटायला लागली होती. याही वेळी फामला सल्ला मिळाला तो IUCN  संस्थेच्या एका प्रकल्प संयोजकाकडून. त्याने फामला ती करत असलेल्या आणि करणार असलेल्या कामाचा अहवाल तयार करायला सांगितला. हा अहवाल तयार करताना वेळोवेळी त्यानं तिला मदत करून हा अहवाल पर्यावरणपूरक कसा होईल याची दक्षता घेतली. हा अहवाल सरकार दरबारी सादर करायला सांगितला. तसेच अन्य खासगी संस्थांची मदत घेण्याचा तिला सल्ला दिला. IUCN  सरकार आणि अन्य खासगी संस्थांच्या मदतीनं तिनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आणि मँग्रोव पुनर्निर्मितीची सुरुवात केली. फामबरोबरच्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे त्या अधिक जोमानं काम करू लागल्या. इतकंच नाही तर झुआन नॅशनल पार्कसारख्या इतरही संरक्षित जागेवर अशा प्रकारचे प्रकल्प राबवण्यासाठी सरकार दरबारी विचारविनिमय सुरू झाला तेव्हा पहिलं नाव फामच होतं. ‘सरकारनं माझ्यावर ही जबाबदारी सोपवून जेव्हा असाच प्रकल्प इतर ठिकाणी राबवायची विनंती केली तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता. याआधी आम्हा महिलांवर खारफुटीची जंगलं नष्ट करणा-या महिला म्हणून गुन्हेगार असल्यासारखं बघायचे तेव्हा खूप वाईट वाटायचं. त्या वेळी कळत-नकळत का होईना आमच्याकडून पर्यावरणाचं नुकसान झालं याची आजही खंत वाटते. 
पण नॅशनल पार्क आणि त्याच्या आजूबाजूची संरक्षित क्षेत्नं आज आमच्याच सहभागामुळे सुरक्षित आहेत आणि सरकार दरबारी आमची ओळख पटलेली आहे. याचं सगळं श्रेय मी IUCN सारख्या संस्थेला देते’, असं फाम सांगते. 
आज तिच्या गावातल्या शेकडो बायका यासाठी काम करतात. कित्येक जणी लांब लांबच्या गावात जाऊनही काम करतात. अशिक्षित बायका एका निर्मितीच्या प्रक्रियेत सामील होऊन पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वी करतात हे फाम आणि तिच्यासोबतच्या महिलांनी जगाला दाखवून दिलं आहे.
पर्यावरण वाचवायचं असेल तर महिलाच चांगली कामगिरी करू शकतात हे उदाहरणानं सिद्ध करणा-या फामचा आदर्श जगभरातल्या महिलांनी घेतला तर हवामान बदलाची लढाई फारशी अवघड जाणार नाही.

(लेखिका तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक संचालक आहेत.)

saptevh@gmail.com

 

 

Web Title: A story about Women who came forward to save forest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.