Speak to sweet but you should also be aware of the art of speaking like that! | बोलायचं गोड पण तसं बोलण्याची नेमकी कलाही अवगत असायला हवी!

बोलायचं गोड पण तसं बोलण्याची नेमकी कलाही अवगत असायला हवी!

-स्मिता पाटील

 

ती... भेटली की खळखळून हसते, बोलते. अगदी डोळ्यातून चांदणं सांडत असतं बोलताना. तिच्या बोलण्यात जादू आहे अगदी. लाघवी आहे. बोलण्यानं मन जिंकून घेते समोरच्याचं. जास्त-कमी असं बोलणं नाही, सगळं कसं अगदी मापात! ती... घुम्मणबसकी नुसती. घडाघडा बोलतच नाही. आपण कितीही बोला, घुम्मच. अस्सा संताप येतो ना? स्वतःहून बोलायचं नाही, विचारलं काही तर उत्तर द्यायचं नाही. चमत्कारिकच आहे ही.

 

ती... हिचा फोन आला की, तासाभराची निश्चिंती. बरं एवढा वेळ बोलून काही अर्थ कळेल तर शप्पथ! बोलणं कमी आणि खिदळणंच जास्त. फोन ठेवूनच द्यावा वाटतो.

ती... हिला भेटण्याची भीतीच वाटते. प्रचंड आक्रमक बोलणं आणि वागणं. सतत मला पाहा आणि फुलं वाहा प्रकार. ‘मी म्हणतेय ते खरंय ना, हो म्हण,’ असं समोरच्याकडून वदवूनच घेते अक्षरशः!

ती... कोणताही प्रश्न आला की, हिच्याशी बोलावं. आपले प्रश्न पटकन सुटतात. आपली समस्या एकदम छोटीच वाटायला लागते हिच्याशी बोलल्यावर. नेमकेपणानं उत्तर सांगते अगदी.

***

अशा सगळ्या प्रकारचं बोलणाऱ्या बाया आपल्या अवतीभोवती वावरत असतात. आपल्याला अनेक अर्थांनी समृद्ध करत असतात. अनेकांच्या बोलण्याचा कधी राग येतो, कधी हसू येतं, कधी कींव येते, कधी फार छान वाटतं, तर कधी चक्क हतबल वाटतं.

येत्या संक्रांतीच्या निमित्ताने दोन-चार दिवस आधीपासूनच ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’चे सगळीकडे मेसेजेस फिरतील. जुनी भांडणं विसरून नव्याने चांगलं नातं सुरू करू या, असे संदेशही येतील. मात्र, आपल्या सणांच्या परंपरेचा नव्याने विचार करताना, अर्थ लावताना, आपण जे काही नेहमी बोलतो, त्याचाच संक्रांतीच्या निमित्ताने विचार करायला लागावं, असं वाटतं. बायकांच्या बोलण्यावर तर सोशल मीडियावर खूप लिहिलं जातं. अनेक विनोद फिरत असतात. मात्र, बोलणं आणि मोकळं होणं ही खरंच एक ताकद असते. तिचा वापर नेमकेपणानं कसा करता येईल, याचा विचार केला पाहिजे, म्हणजे एक चांगला संवाद समोरच्याशी होऊ शकेल. बोलावं कसं तर नेमकेपणानं, वेळेवर, स्पष्टपणे आणि शांतपणे, पुरेशा गोड आवाजात. बोलण्याची ही कला माणसं जोडायला, टिकवायला नक्की मदत करते.

चांगलं बोलणं म्हणजे फक्त गोड गोड बोलणं, असा अर्थ नक्की नाही. बऱ्याच वेळा ऐकायलाही नको वाटतं, अगदी टोमणे मारायचे ते गोड बोलतच, पण सतत साखरपेरणी करत बोलणं म्हणजे योग्य बोलणं नव्हेच. आपलं म्हणणं योग्य त्या शब्दामध्ये, स्पष्टपणे मांडायला हवं. मुख्य म्हणजे वेळेवर बोलायला हवं. वेळ उलटून गेल्यावर मला असं म्हणायचं होतं खरं तर; या बोलण्याला काहीच अर्थ उरत नाही. स्पष्टपणे बोलतानाही समोरच्याचा अपमान होता कामा नये, याची खबरदारी नक्कीच घेतली गेली पाहिजे. मग ती कोणत्याही वयाची व्यक्ती असो. अगदी लहान मुलाशी बोलतानाही त्याचा आत्मसन्मान दुखावला जाणार नाही, याची काळजी घेतली पहिजे. आपण बोलतो कोणत्या स्वरात याचाही विचार केला पाहिजे. सतत तलवारी पाजळत बोलण्यानं काहीच साध्य होत नाही. आक्रमकपणे, ओरडून, तारस्वरात बोलण्याचा समोरच्या माणसाला त्रासच होत असतो. आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते शांतपणे, खालच्या पट्टीत आणि ठामपणे सांगता आलं, तर ते समोरच्यापर्यंत जास्त नीटपणे पोहोचतं आणि तितकंच ते परिणामकारक पण ठरतं. अति बडबड हे नक्कीच टाळायला हवं. खूप बोलणं हे जितकं घातक, तितकंच अजिबात न बोलणं हेही वाईटच. काहीच न बोलता, प्रतिकार न करता, अनेक बाया वर्षानुवर्षे सगळं निमूटपणे सोसत राहतात. इतरांशी, कधी स्वतःशीही न बोललेल्या गोष्टींचा ढीग त्यांच्या मनात साठत साठत राहतो आणि मग त्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम झाल्याचं दिसतं. आपल्याकडे सहनशील बाई याचं इतकं स्तोम माजवून ठेवलं आहे की, यापायी तिच्या माणूस म्हणून असणाऱ्या किमान गोष्टींकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचं दिसतं. स्वतःचा सन्मान जपत, इतरांचाही सन्मान जपत होणारा संवाद हा निश्चितच परिणामकारक असतो.

थोडक्यात काय, तर तिळगूळ घ्या आणि गोड बोला, पण त्यासोबतच नेमकं, मुद्देसूद, खरं, वेळेवर, स्पष्ट, थोडक्यातही बोलू!

‘शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी’ हे गाणं तर तुम्हाला माहिती आहेच!

(लेखिका मुक्त पत्रकार आहे.)

smita.patilv@gmail.com

Web Title: Speak to sweet but you should also be aware of the art of speaking like that!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.