Join us  

बाईनं रिक्षा चालवणं ‘त्यांना’ मान्य नाही! महिलेनं रिक्षा चालवण्यात कमीपणा वाटतो कारण..

By madhuri.pethkar | Published: April 04, 2024 8:00 AM

इंडोनेशियात एकटीने घर चालवणं बायकांसाठी फार अवघड, पण त्यांनी आता बंड पुकारले आहे.

ठळक मुद्देती एकटी नाही, अशा अनेकजणी आहेत. न बोलता बंड पुकारणाऱ्या..

माधुरी पेठकरएकवती तिचं नाव. ही ४२ वर्षांची महिला. एकल माता. इंडोनेशियातल्या जकार्ताच्या रस्त्यावर बेशिस्त गर्दीतून वाट काढत रिक्षा चालवते. तिच्या बाजूला तिची ३ वर्षांची मुलगी बसलेली असते. एकवतीच्या पहिल्या नवऱ्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्या नवऱ्यासोबत तिचा घटस्फोट झाला. ती एकटी ४ मुलांचा सांभाळ करते. मुलांचं संगोपन, त्यांचं शिक्षण, घरभाडे हा सर्व खर्च भागवण्यासाठी एकवतीला रिक्षा चालवण्यापलीकडे दुसरा पर्यायच दिसला नाही. तिने इतर बरीच कामं करुन पाहिली. पण, बरे पैसे फक्त रिक्षा चालवूनच मिळतात, हे लक्षात आल्यावर ती गेल्या १५ वर्षांपासून रिक्षा चालवते आहे.

आज इंडोनेशियात एकवतीप्रमाणे अशा अनेक महिला आहेत ज्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह एकटीच्या बळावर करतात. 'स्टॅटिस्टीक्स इंडोनेशिया'च्या आकडेवारीनुसार इंडोनेशियात अशा महिलांची संख्या १२.७२ टक्के आहे. कोविड १९ नंतर इंडोनेशियात औपचारिकरीत्या नोकरी करणाऱ्या महिलांच्या नोकऱ्यांवर गदा आली. त्यांची संख्या कमी होत गेली आणि दुसरीकडे गृहिणी असलेल्या महिलांची संख्या कमी होत गेली. त्या शेतमजुरी, रिक्षा चालवणे अशा अनौपचारिक कामांसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागल्या, असं वर्ल्ड बँकेचं सर्वेक्षण सांगतं.एकवतीचा मोठा मुलगा २० वर्षांचा आहे. तोही आता थोडं फार कमवायला लागला आहे. पण, अजूनही हातावर पोट असलेल्या एकवतीलाच कुटुंबाचा खर्च भागवावा लागतोय.  त्यामुळे तिच्याकडे रिक्षा चालवण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांचं नशीब बदलण्याचा प्रयत्न एकवती करते आहे.

(Image :google)

पण, इंडोनेशियातील पुरुषप्रधान संस्कृतीत एकवतीसारख्या महिलेने रिक्षा चालवणे ही सोपी आणि सुरक्षित गोष्ट नाही. येथे महिलांचा लैंगिक छळ करणे, खंडणी वसूल करणे हे प्रकार सर्रास होतात. एकवती म्हणते, एकदा रिक्षा चालवताना रिक्षातील प्रवाशाने ५ लाख रुपयांच्या बदल्यात त्याच्यासोबत येण्याचा आग्रह केला. तेव्हा न डगमगता रिक्षा थांबवली आणि त्याला खाली उतरवून दिले. एकवती म्हणते, ' इंडोनेशियात एक महिला म्हणून रस्त्यावर काम करताना स्वत:ला कमजोर ठेवून चालत नाही. शेवटी रस्त्यावर काम करूनच मला पोट भरायचं आहे!'ती एकटी नाही, अशा अनेकजणी आहेत. न बोलता बंड पुकारणाऱ्या.. 

टॅग्स :इंडोनेशियामहिला