- माधुरी पेठकर
नवरा जर राजकीय क्षेत्रात मोठ्या पदावर असेल तर त्याच्या बायकोच्या वागण्यावरही लोकांच्या नजरा असतात. जरा इकडे तिकडे झालं की चर्चा होतात, वाद होतात. किम किओन. त्यांनाही आता जगभरातले लोक म्हणू लागलेत की, ‘अध्यक्षाच्या बायकोला हे शोभतं का?’ दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सूक येऊल यांच्या किम या पत्नी. किम यांचं वागणं कधीच तेथील अध्यक्षांच्या पत्नीसारखं पारंपरिक नव्हतं. त्या सतत चर्चेत असत. अनेक वर्षांपासून शैक्षणिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातील अफरातफरीचे आरोप त्यांच्यावर होत आहेत.
१९७२ मध्ये यांगपेयाॅंग येथे किम मेयाॅंग सिनचा जन्म झाला. क्योंगी विद्यापीठातून कलेची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी आपलं नाव किम किऑन ही असं बदललं. दक्षिण कोरियातील संस्कृती जागतिक पातळीवर नेण्यात किम यांचं मोठं योगदान मानलं जातं. किम यांनी दक्षिण कोरियातील प्रख्यात ‘सूकमयूंग वूमन युनिव्हर्सिटी’मधून १९९८ मध्ये कलेतील डाॅक्टरेट मिळवली होती. त्याच विद्यापीठाने त्यांच्यावर बनावट प्रबंध सादर केल्याचा आरोप केला आहे. २०२२ मध्ये कूकमिन युनिव्हर्सिटीने किम यांच्यावर बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र सादर केल्याचे आरोप केले होते. पण अनेक महिने चाललेल्या चौकशीनंतर त्यांना यात दोषमुक्त केले गेले.
शेअर मार्केटमधील आर्थिक व्यवहारात फेरफार, कला प्रदर्शनाच्या बदल्यात महागडी आणि बेकायदेशीर भेटवस्तू स्वीकारणे, दक्षिण कोरियात मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात हस्तक्षेप करणे असे अनेक आरोप किम यांच्यावर आहेत. किम यांनी देशाच्या ‘फर्स्ट लेडी’ या पदाचा सन्मान राखला नाही, अशी आता त्यांच्यावर टीका होतेय. अर्थात त्या कुणाला जुमानत नाहीत. पण त्यामुळे त्यांची जगभर सोशल मीडियात चर्चा मात्र आहे.