Join us

कोणी अचानक हल्ला केलाच तर काय कराल ? प्रत्येक महिलेला उपयोगी ५ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2022 18:06 IST

Safety Tips for Women सध्या कुठे काय घडेल सांगता येत नाही. महिलांनी सावध राहणे गरजेचं. ५ टिप्स पडतील उपयोगी..

आजकालची महिला एवढी सक्षम झालेली आहे, की ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने चालत आहे. प्रत्येक क्षेत्रात नाव गाजवत आहे. पण तरी सुद्धा विनयभंग, छेड काढणे, बलात्कार असे बऱ्याचश्या घटना तिच्यासोबत घडतात. ज्याने संपूर्ण देश हादरून जातो. महिलेला घर आणि संसार सांभाळत, नोकरी ही करावी लागते यासह स्वतःची रक्षा देखील करावी लागते. आज आपण असे काही टिप्ससंदर्भात जाणून घेणार आहोत. ज्याने महिलांना स्वतःची रक्षा स्वतः करण्यास अधिक बळ मिळेल.

आत्मविश्वास ही सर्वात मोठी ताकद

आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. परंतु, प्रत्येक घटनेला सामोरे जाण्यासाठी हिम्मत, बळ आणि निडरतेने सामना करण्याची ताकद ही हवीच. त्याचप्रमाणे महिलांनी प्रत्येक घटनेला सामोरे जाण्यासाठी निडर राहणे गरजेचं आहे. चेहऱ्यावर आत्मविश्वास हा हवाच. त्यांनी आपल्या देहबोलीतून आत्मविश्वास दाखवावा. जेणेकरून समोरचा व्यक्ती आपल्यासमोर अदबीने राहील. रस्त्यावरून एकटं चालत असताना घाबरलेल्या मुलीसारखे चालायचे नसून, एखाद्या सैनिकासारखे चालावे. याने चेहऱ्यासह देहबोलीवर आत्मविश्वास दिसेल.

हेडफोन लावून रस्त्यावरून चाला

असे अनेक प्रसंग येतात जेव्हा एखाद्याला घराबाहेर पडून निर्मनुष्य रस्त्यावरून चालावे लागते. अशा रस्त्यांवर चालत असाल तर कानात हेडफोन लावून चालत जा. हेडफोन लावणे म्हणजे तुम्ही चालत असताना गाणे ऐकत आहात असे नाही, जेव्हा तुम्ही चालत जाता तेव्हा अचानक कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे, असे वाटल्यास कोणाशी तरी फोनवर बोलणे सुरू करा. किंवा समोरच्या व्यक्तीला दाखवा की तुम्ही कोणाशी तरी बोलत आहात. अशाने पाठलाग करणारा व्यक्ती घाबरेल आणि पाठलाग करणार नाही.

पर्समध्ये ठेवा परफ्यूम आणि स्प्रे

जर कोणी तुमच्यावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा घाबरून न जाता धैर्याने सामोरे जा. यावेळी ठोसा, कोपर आणि लाथ यांचा वापर करा. अथवा परफ्युम, हिट किंवा ब्लॅक स्प्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे. स्वसंरक्षणासाठी या अतिशय उपयुक्त गोष्टी आहेत.

पेनापासून संरक्षण

पेन केवळ लिहिण्यासाठी उपयुक्त नाही तर ते संरक्षणाचा एक उत्तम साधन आहे. जर तुमच्याकडे पेन असेल आणि अचानक कोणी तुमच्यावर हल्ला केलाच तर, या पेनने तुम्ही त्याच्या हातावर, मानेवर किंवा मांडीवर हल्ला करू शकता. याने आपण स्वतःचे संरक्षण नक्की करू शकता.

...हे लक्षात ठेवा

कायदा आपलं काम करतेच परंतु, मुलींनी देखील स्वतःची काळजी घ्यायला हवी. कुठे काही गैरकृत्य झाल्याचा संशय आल्यास त्वरित पोलिसांना 100 क्रमांकावर कळवा. याशिवाय रस्त्यावरून चालत असाल तर मोबाईलवर बोलू नका. गर्दीच्या ठिकाणी दागिने घालणे टाळा. याशिवाय ऑटो किंवा कॅबमध्ये बसताना आधी ड्रायवरचा नंबर नोट करा आणि तो तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना पाठवा.

टॅग्स :महिलास्त्रियांचे आरोग्य