Join us  

'आपल्याला मुलगी आहे तर काय..' समंथाने शेअर केली मुलीला वाढवताना आवश्यक महत्वाची गोष्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2021 2:22 PM

मुलींना वाढवताना केवळ त्याच गोष्टीची चिंता नको, तर त्यांना सक्षम करुन स्वत:च्या पायावर उभे करा सांगत समंथाने केले पालकांना आवाहन...

ठळक मुद्देमुलींना वाढवण्याबाबत काय म्हणते समंथा प्रभू...लग्न हेच आयुष्याचे ध्येय नाही तर मुलींना सक्षम करणे महत्त्वाचे

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री समंथा प्रभू मागील काही दिवसांपासून नागा चैतन्यसोबत होत असलेल्या घटस्फोटामुळे बरीच चर्चेत आहे. घटस्फोटाच्या धक्क्यातून सावरत आता ती काही प्रमाणात सामान्य आयुष्य जगायला लागली आहे. समंथा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असते. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील अपडेटस तिच्या चाहत्यांना कायमच मिळत असतात. नुकतीच पालकांनी मुलींना वाढविण्याबाबत तिने एक महत्त्वपूर्ण पोस्ट केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने याबाबत वक्तव्य केले आहे. यामध्ये समंथा म्हणते, पालक मुलींना वाढवताना नेहमीच तिच्या लग्नाबाबत खूप विचार करतात. कधी मुलगा कसा असावा याबाबत, तर कधी मुलीला लग्नात काय द्यायचे याबाबत ते चिंता करताना दिसतात. भारतासारख्या देशात मुलीचे लग्न म्हणजे ही पालकांसाठी एक मोठी जबाबदारी असते. 

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयावर समंथा आपले मत व्यक्त करते. ती म्हणते, पालकांनी मुलींच्या लग्नाबाबत जास्त काळजी करायची आवश्यकता नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलीला चांगले शिक्षण द्या, आत्मविश्वासू बनवा आणि जगातील गोष्टींचा सामना करण्यासाठी सक्षम बनवा. आपण मुलींना केवळ लग्नाचा विचार करायला शिकवायला नको. सगळ्या पालकांना ती एक विनंती करते की लग्नासाठी पैसे साठवण्यापेक्षा ते पैसे मुलीच्या शिक्षणावर खर्च करा आणि तिला सक्षम करा. मुलींमध्ये आत्मविश्वास असायला हवा तसेच त्यांनी स्वत:वर प्रेम करायला हवे. वेळ पडली तर एखाद्याला कानाखाली देण्याची हिम्मत त्यांच्यात असायला हवी असेही ती पुढे म्हणते. 

भारतासरख्या देशात मुलींनी हे सगळे शिकणे आवश्यक असल्याचेही ती म्हणते. मुलींना मुलांप्रमाणे न वाढवता दोघांमध्ये कायम भेद केला जातो. मात्र तसं न करता मुलींनाही स्वत:च्या पायावर उभ्या राहतील आणि समाजात आपले स्थान निर्माण करतील इतके सक्षम करायला हवे. त्यामुळे समंथासारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीने पालकत्वासारख्या एका महत्त्वाच्या विषयावर केलेल्या या वक्तव्याचा पालकांनी जरुर विचार करायला हवा. यामुळे पालकांचा दृष्टीकोन तर बदलेलच पण मुलींचाही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल. 

टॅग्स :सोशल व्हायरलसमांथा अक्कीनेनीपालकत्व