Join us  

अमेरिकेन उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना अजूनही आवडतो इडली डोसा, पुस्तकात त्या सांगतात काही सिक्रेटस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 4:23 PM

जाणून घ्या काय आहे भारतीय पदार्थ आणि अमेरिकन महिला उपराष्ट्राध्यक्षांचे कनेक्शन

ठळक मुद्देभारतीय वंशाच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणतात...

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. नुकतेच त्यांचे पुस्तक ‘फिनॉमिनल वूमन कमला हॅरीस’ म्हणजेच प्रकाशित झाले. अमेरिकेत वॉशिंग्टन येथे राहणाऱ्या चिदानंद राजघट्ट या भारतीय पत्रकाराने हॅरीस यांच्या जीवनाचा वेध यानिमित्ताने घेतला आहे. आजपर्यंत सर्वांसमोर न आलेले हॅरीस यांचे पैलू सदर पुस्तकाच्या निमित्ताने सर्वांसमोर येणार आहेत. कृष्णवर्णीय तेही भारतीय वंशाची महिला उपराष्ट्राध्यक्षपदी येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने कमला हॅरीस यांचे नेहमीच अमेरिकेत आणि भारतातून सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले आहे. कमला यांच्या बालपणाबाबत सांगताना पुस्तकात भारतीय खाद्यपदार्थांचा उल्लेख झाला असून ही भारतीयांसाठी आनंदाची बाब आहे. कमला हॅरीस यांची आई तमिळ कुटुंबातील असल्याने दक्षिणेकडील इडली-डोसा हे पदार्थ कमला यांना विशेष आवडतात असे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे.  

( Image : Google)

या पुस्तकात लेखक कमला हॅरीस यांचे आई-वडिल, कमला यांचे लहानपण, करीयर आणि राजकीय कारकिर्द अशा सर्व गोष्टींवर प्रकाश टाकतात. लेखक लिहीतात, कमला हॅरीस यांच्या जन्मदाखल्यावर त्यांचे मधले नाव अय्यर असे होते, पण नंतर ते बदलून देवी असे करण्यात आले आहे. हॅरीस आता ५७ वर्षांच्या असून त्यांचा जन्म १९६४ मध्ये कॅलिफोर्निया येथे झाला. त्यांची आई शामला गोपालन तमिळ ब्राह्मण कुटुंबातून आलेली होती. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांची आई शिक्षणासाठी कॅलिफोर्नियात आली. त्यानंतर त्यांनी कॅन्सर विषयात संशोधन केले. शिक्षण घेत असतानाच शामला यांची कमला हॅरीस यांचे वडिल अफ्रिकन-अमेरिकन असलेल्या डोनाल्ड हॅरीस यांच्याशी भेट झाली. ते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षक आहेत. कमला हॅरीस आणि त्यांची धाकटी बहिण माया हॅरीस दोघी लहान असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. कमला हॅरीस यांनी हावर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले असून त्यापुढे त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्या वकिली व्यवसायात उतरल्या. मग त्या अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या कॅलिफोर्निया राज्याच्या अ‍ॅटर्नी जनरलपदी विराजमान झाल्या. कमला हॅरीस दोन वेळा अ‍ॅटर्नी जनरल होत्या. त्यानंतर २०१७ साली त्या खासदार म्हणून निवडून गेल्या.

( Image : Google)

हे पुस्तक म्हणजे कमला हॅरीस यांचे चरित्र असले तरीही त्यापलिकडे जात भारतीय-अमेरिकन समुदायाच्या इतिहासाचा आढावा यामध्ये घेण्यात आला आहे. ३०० पानांच्या या पुस्तकात मताधिकार चळवळ, राजकारणातील सत्ता आणि प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी महिलांना येणाऱ्या अडचणी यांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच कमला यांच्या वैयक्तिक जीवनावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इडली आणि डोशाचा उल्लेख पुस्तकात आला आहे. कमला यांच्यासाठी कुकींग ही एक थेरपी आणि कला असल्याचे लेखकाने पुस्तकात म्हटले आहे. तर कमला यांना लहानपणी खाल्लेले इडली-डोसा आणि दोन वेगळ्या प्रकारे केलेली भेंडीची भाजी आठवते. हे पदार्थ आपल्याला विशेष आवडत असल्याचा उल्लेखही पुस्तकात करण्यात आला आहे. 

टॅग्स :कमला हॅरिससामाजिकअन्नसोशल व्हायरल