Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरोघर ‘गिफ्ट्स’ची बिनकामाची अडगळ, काय करायचं त्याचं- तुमच्या घरात माळ्यावर किती वस्तू आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2026 18:27 IST

तुमच्या घरात माळ्यावर किती वस्तू आहेत? कुणी गिफ्ट दिले, तुम्ही वापरले का?

ठळक मुद्देअनावश्यक भेटवस्तूंमध्ये कपडे, होम डेकोरेशन, किचन उपकरणे आणि खेळणी सर्वाधिक येतात. भेट वस्तू देणं केवळ औपचारिकता असते, समोरच्याच्या गरजांशी त्याचा काहीच संबंध नसतो.

डॉ. आरतीश्यामल जोशी

सुटीचा दिवस, नवीन वर्षही आलं म्हणून रंजिताने घर आवरायला घेतले. कपाटं आणि माळे आवरायला काढले. तिथे गेली कित्येक वर्षे वापराविना पडलेल्या वस्तू दिसल्या. कित्येक भेटवस्तू गिफ्ट पेपर न काढता तसेच पडलेले होते. भेट म्हणून मिळालेल्या पाण्याच्या बाटल्या, दिवे, पूजेचे ताट, पर्स, काचेच्या वस्तू, कापडी पिशव्या, प्लास्टिकचे विविध आकारातील डबे सगळे पोत्यात भरून ठेवलेले. यासोबत विविध मंगलकार्यात भेट म्हणून मिळालेल्या साड्या, बेडशीट, टॉवेल, चादरी, शाली, डिनर सेट, कपसेट, ग्लाससेट, तांब्याची भांडी, स्वयंपाकघरातील आधुनिक भांडी आणि शोपीसचीही गर्दी. करायचं काय या वस्तूंचं? धूळ पुसून परत तिनं ते ठेवून दिलं.

 

एकेकाळी गिफ्ट मिळाल्याचा आनंद काही काळानंतर असा पसाऱ्यात बदलतो. घरात गरज नसतानाही या वस्तू येतच राहतात. त्यात मॉल संस्कृतीमुळे वस्तू स्वस्त आणि आकर्षक झाल्या आहेत. ५०० रुपयांची वस्तू २५० रुपयांत किंवा एकावर एक फ्री मिळते. यामुळे लहान-सहान कार्यक्रमातही मोठ्या दिसणाऱ्या वस्तू दिल्या जातात. मोठे गिफ्ट देणे हा "मोठेपणा' दाखविण्यासारखे वाटते. ऑनलाईन शॉपिंगमुळे घरबसल्याही अनेक अनावश्यक वस्तू ऑर्डर केल्या जातात. ३३% भारतीय ऑनलाइन भेटी खरेदी करतात. यातील बहुतांशी वस्तू शेवटी अनेकांच्या माळ्यावर पोहोचतात. घरात जागा अडवतात. काही वस्तू परस्परांना फिरवत भेट देत या घरातून त्या घरात जातात.

 

यातही अनेकांना त्या पुढे सरकवताना प्रतिष्ठेची भीती वाटते. काहींना त्यांची किंमत कमी वाटते, तर काहींना जास्त वाटते. यामुळे त्या देण्याऐवजी घरातच ठेवल्या जातात. परिणामी "गिफ्ट वेस्ट' ही सुखवस्तू घरांमध्ये एक समस्या ठरत आहे. भेटवस्तू देताना ती खरंच उपयोगी आहे का याचा विचार करायला हवा. शक्यतो पर्यावरणपूरक उत्पादने, पुनर्वापरयोग्य शाश्वत भेटवस्तू द्यायला हव्यात. हातमाग, हस्तकलेच्या भेटवस्तू स्थानिक कारागीरांना सहकार्य करतात. कला-संस्कृतीच्या संवर्धनातही हातभार लावतात. दुसरा पर्याय म्हणजे समोरच्याला विचारून त्याच्या गरजेनुसार भेटवस्तू देणे. समोरच्याने सांगितलेल्या वस्तूचे बजेट जास्त असेल तर ३-४ नातेवाईक, मित्र, कार्यालयीन सहकाऱ्यांनी एकत्रित गिफ्ट देता येऊ शकते. तिसरा पर्याय आपल्या ऐपतीनुसार रोख स्वरूपातील भेट देणे. पाकिटातून मिळालेले पैसे कोणी अडगळीत टाकत नाही किंवा फेकत तर नाहीच नाही.त्यामुळे भेट देताना एकदा विचारा, ही वस्तू खरंच कामाची आहे?

 

कोण? का? कोणती भेट देतो?जुन्या वस्तू विकणारे संकेतस्थळ ओएलएक्स इंडिया आणि आयएमआरबी इंटरनॅशनलने काही वर्षांपूर्वी केलेल्या "क्रस्ट' सर्वेक्षणातून काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.सुमारे ७१% भारतीयांना वर्षभरात अजिबात उपयोगात नसणारी एकतरी भेटवस्तू मिळालेली असतेच.सरासरी चारपैकी तीन घरात किमान एक अनावश्यक भेटवस्तू येतेच.५० टक्क्याहून अधिक लोकांनी अनावश्यक भेटवस्तू घरात साठवून ठेवलेल्या असतात.२४% लोकांनी अशा भेटवस्तू रिगिफ्ट म्हणजेच दुसऱ्यांना भेट देऊन टाकल्या.७% लोकांनी विकल्या, ५% लोकांनी गरजूंना दान केल्या तर १% लोकांनी त्या फेकून दिल्या.अनावश्यक भेटवस्तूंमध्ये कपडे, होम डेकोरेशन, किचन उपकरणे आणि खेळणी सर्वाधिक येतात.भेट वस्तू देणं केवळ औपचारिकता असते, समोरच्याच्या गरजांशी त्याचा काहीच संबंध नसतो.

डॉ. आरतीश्यामल जोशीमुक्त पत्रकारaarteeshymal@gmail.com 

English
हिंदी सारांश
Web Title : Unwanted Gifts Pile Up: Decluttering Tips and Thoughtful Giving.

Web Summary : Unwanted gifts clutter homes. Consider recipients' needs, eco-friendly options, or cash gifts. Surveys reveal most receive useless presents, often re-gifted or stored, highlighting the 'gift waste' problem. Thoughtful gifts are key.
टॅग्स :सोशल व्हायरलगिफ्ट आयडिया