घरात सतत घोंघावणाऱ्या माशा, डास असतील तर यांचा त्रास खरंच डोकेदुखी ठरतो. घरात जर माशा, डासांचे प्रमाण वाढले तर आरोग्याच्या अनेक समस्या देखील वरचेवर सतावतात. संध्याकाळ झाली की घरात येणारे डास डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियासारख्या गंभीर आजारांनाही आमंत्रण देतात. घरात डासांचा वाढता वावर असेल तर त्यांना पळवून लावण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारात डासांना पळवून लावण्यासाठी अनेक रासायनिक कॉइल, लिक्विड आणि स्प्रे उपलब्ध असतात, पण त्यातील विषारी घटक घरातील लहान मुले आणि पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतात(home remedy to repel mosquitoes naturally).
घरातील माशा, डासांना पळवून लावण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर अनेकदा हानिकारक ठरतो, त्यामुळे नैसर्गिक आणि घरगुती उपायांवर जास्त भर दिला जातो. कोणतेही हानिकारक रसायन न वापरता, तसेच आरोग्याला कोणताही धोका न पोहोचवता, डासांना नैसर्गिकरित्या कायमचे पळवून लावण्यासाठी आपण घरातील उपलब्ध पदार्थांपासून (cinnamon clove and mustard oil mosquito repellent) एक खास उपाय करु शकतो. घरातील डासांना पळवून लावण्यासाठी घरच्याघरीच कोणता नैसर्गिक आणि सोपा उपाय करता येतो ते पाहूयात...
घरांतील डासांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय...
घरांतील डासांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय करण्यासाठी, झाकण असणारी काचेची मध्यम आकाराची बरणी किंवा छोटा कंटेनर, कापूस, लवंग काड्या, दालचिनी, चहा पावडर, मोहरीचे तेल, पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. घरांतील डास, माशांना पळवून लावण्यासाठी हा खास घरगुती उपाय plantsandmore या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
नेमका उपाय काय आहे ?
घरांतील डास, माशांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय करताना, सर्वातआधी काचेच्या बरणीच्या झाकणाला बरोबर मधोमध छिद्र करून त्यात कापसाची वात ओवून घ्यायची आहे. त्यानंतर बरणीत दालचिनीचे काही तुकडे, लवंग काड्या, थोडे पाणी आणि दीड चमचा चहा पावडर घाला. शेवटी, मोहरीचे तेल टाकून मेणबत्तीप्रमाणे त्याची वात पेटवून घ्या. हा उपाय लगेच डासांना पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरतो.
थंडीतही तुळस राहील हिरवीगार, टवटवीत! कुंडीजवळ करा हे '५' घरगुती उपाय, रोपटे सुकणार नाही...
घरातील डास, माशांना पळवून लावण्यासाठी हा उपाय कसा फायदेशीर...
१. लवंग आणि दालचिनी या दोन्ही मसाल्यांच्या पदार्थांच्या तीव्र वासामुळे आणि त्यात असणाऱ्या नैसर्गिक तेलांमुळे शतकानुशतके कीटकांना दूर ठेवण्यासाठी हे दोन्ही पदार्थ फायदेशीर मानले जातात. लवंगमध्ये 'युजेनॉल' नावाचे संयुग असते, जे डासांसाठी एक नैसर्गिक न्यूरोटॉक्सिन म्हणून काम करते. या लवंग-दालचिनीच्या तीव्र वासामुळे डासांची वास घेण्याची क्षमता बाधित होते आणि त्यांना त्या भागापासून दूर राहण्यास भाग पाडते.
२. दालचिनीच्या काडीमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामध्ये 'सिनेमाल्डिहाइड' असते, जे अनेक अभ्यासांमध्ये डासांना पळवून लावण्यास आणि त्यांच्या अळ्यांना मारण्यास फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. लवंगसोबत दालचिनी एकत्र आल्यावर, एक शक्तिशाली वास तयार होतो, जो डासांना तुमच्या आजूबाजूला फिरण्यापासून थांबवतो.
३. चहा पावडरमध्ये टॅनिन फार मोठ्या प्रमाणावर असते. जेव्हा चहा पावडर लवंग आणि दालचिनीसोबत मिसळून जाळली जाते, तेव्हा ती जळण्याची प्रक्रिया नियंत्रित करते आणि हळू गतीने धूर तयार करण्यास मदत करते. हाच धूर इतर सामग्रीचा सुगंध हवेत दूरपर्यंत घेऊन जातो. तर, दुसरीकडे मोहरीचे तेल वात जाळण्याचे काम करते, तसेच आपल्या तीव्र वासाने डासांना दूर ठेवण्यास मदत करते.
