Join us  

Tips For Making Home Cool In Summer : कडक उन्हाळ्यात घर ‘कूल’ रहण्यासाठी ४ सोपे उपाय; लाहीलाही कमी होण्यास होईल मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 1:10 PM

Tips For Making Home Cool In Summer : भर उन्हाळ्यातही फॅन आणि एसीबरोबरच काही सोपे उपाय केल्यास घर गार राहण्यास मदत होते, पाहूयात हे उपाय कोणते...

ठळक मुद्देभर उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही कमी व्हावी आणि घर जास्तीत जास्त गार राहावे यासाठी काही सोपे उपायसोप्या उपायांनी तळपत्या उन्हातही मिळू शकेल थंडावा, कसा ते जाणून घेऊया

उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो की पाऊस येण्याच्या काही दिवस आधी ते प्रत्यक्ष पावसास सुरुवात होईपर्यंत खूपच जास्त प्रमाणात उकडते. आता उन्हाचा दाह कमी झाला असला तरी हवेत एकप्रकारचा दमटपणा आलेला असल्याने अंगाची लाहीलाही होते. उन्हाचा तडाखा कमी होऊन घामाच्या धारा लागण्याच्या या काळात रात्री लवकर झोप तर येत नाहीच पण दिवसाही थकवा आणि ग्लानी कायम राहते. दिवसभर आपण ऑफीस आणि इतर कामांमध्ये बिझी असलो तरी संध्याकाळी घरी आल्यावर गरमीने पार हैराण व्हायला होते. फॅन कितीही मोठा केला तरी त्याचे वारे आपल्यापर्यंत पोहोचतच नाही असे वाटते. (Tips For Making Home Cool In Summer)  अशावेळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उकाड्याने काहीच सुधरत नाही. पण भर उन्हाळ्यातही फॅन आणि एसीबरोबरच काही सोपे उपाय केल्यास घर गार राहण्यास मदत होते, पाहूयात हे उपाय कोणते... 

(Image : Google)

१. पडदे लावताना लक्षात ठेवा...

उन्हाळ्यात खिडक्यांना किंवा घरातही सिंथेटीक, सिल्कचे किंवा डिझायनर पडदे लावण्यापेक्षा कॉटनचे पडदे वापरा. सुती आणि कॉटन कापडामुळे घरात थंडावा राहण्यास मदत होते. बाहेरच्या उन्हाच्या झळांचा त्रास होण्यापासून तुमचा बचाव होईल. तसेच हल्ली वाळ्याचे, बांबूच्या काड्यांचे पडदेही सहज मिळतात. उन्हाळ्यात या पडद्यांमुळे घरात गारवा टिकून राहण्यास मदत होते. तसेच पडद्याचा रंग फार गडद असेल तर त्यामुळे जास्त गरम होऊ शकते अशावेळी फिकट रंगांचे पडदे, बेडशीट वापरणे केव्हाही चांगले.

२. एक्झॉस्ट वापरा

घराच्या आतील गरम हवा काढून टाकण्यासाठी एक्झॉस्ट हा सर्वोत्तम पर्याय आहे. घरातील हवा आतल्या आत फिरत राहिल्याने घर आहे त्यापेक्षा जास्त गरम होते. अशावेळी एक्सॉस्टचा वापर केल्यास घरातील हवा बाहेर जाऊन घरात हवा खेळती राहील आणि घर गार राहण्यास मदत होईल. स्वयंपाकघरात गॅसमुळे आणि बाथरुम फार बंद असल्याने तिथे जास्त गरम होते. प्रामुख्याने स्वयंपाकघर, बाथरुम अशाठिकाणी एक्सॉस्टची सोय करुन घ्या. यामुळे घरातील वातावरण थंड राहण्यास खूप मदत होईल.

३. छतावर, गॅलरीत पाणी मारा

आपल्या घराला एखादी छोटीशी गॅलरी असेल तर किंवा आपल्या छतावर टेरेस असेल तर त्याठिकाणी आवर्जून पाणी मारा. खिडकीच्या बाहेर ग्रील किंवा मोकळी जागा असेल तर त्याठिकाणीही पाणी मारता येईल. पाण्यामुळे गरम हवेचा दाह कमी होण्यास मदत होईल आणि उन्हाळ्यात संध्याकाळनंतर घराच्या छतावर पाणी टाकले तर छताला थंडावा मिळेल आणि रात्री पंखा चालवला तर गरम हवेऐवजी थंड हवा खोलीत येईल. 

(Image : Google)

४.घराच्या आजुबाजूला हिरवाई राहील याची काळजी घ्या 

हिरवा रंग हा डोळ्यांना शीतलता देणारा असतो. त्यामुळे आपण सतत स्क्रीनसमोर असलो की थोड्या वेळाने झाडांच्या हिरव्या रंगाकडे पाहायला हवे असे आपल्याला आवर्जून सांगितले जाते. त्यामुळे घराच्या बाल्कनीत, खिडकीच्या ग्रीलमध्ये किंवा अगदी घराच्या दारात उन्हाळ्याआधी जास्तीत जास्त झाडे लावा. इतकेच नाही तर सध्या बाजारात अनेक इनडोअर प्लांटस पण मिळतात. किचनमध्ये हॉलमध्ये आणि बेडरुममध्येही ही झाडे आपण सहज लावू शकतो. त्यामुळे घर दिसायलाही छान दिसते आणि या झाडांमुळे आणि त्यातील मातीमुळे घरात काही प्रमाणात थंडावा राहण्यास मदत होते. 

टॅग्स :सोशल व्हायरलसमर स्पेशललाइफस्टाइलहोम रेमेडीसुंदर गृहनियोजन